Athletics Championships 2025 : भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रा आणि पाकिस्तानचा अर्शद नदीम यांच्यात जागतिक ॲथलेटिक चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. पहिल्या फेरीत नीरजने सहावे स्थान मिळवले आहे.
Athletics Championships 2025 : जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2025 च्या अंतिम फेरीत भारतीय भालाफेकपटू नीरज चोप्रा आणि पाकिस्तानच्या अर्शद नदीम यांच्याकडून चांगली कामगिरी पाहायला मिळाली नाही. जपानची राजधानी टोकियो येथे झालेल्या अंतिम सामन्यातून नीरज आणि नदीम दोघेही बाहेर पडले आहेत. पहिल्या थ्रोमध्ये गोल्डन बॉय नीरज चोप्राने 83.65 मीटर भाला फेकून सहावे स्थान मिळवले होते. नंतर दोघांचाही खेळ बिघडला आणि ते टॉप 6 मध्ये स्थान मिळवू शकले नाहीत. अशाप्रकारे नीरज आणि नदीम जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीतून बाहेर झाले आहेत.
पाकिस्तानचा अर्शद नदीम अंतिम फेरीतून बाहेर
या अंतिम सामन्यात पाकिस्तानचा स्टार खेळाडू अर्शद नदीमची कामगिरी अत्यंत खराब राहिली आणि तो बाहेर पडला आहे. अर्शदला फक्त 82.73 मीटर दूर भाला फेकण्यात यश आले. सध्या त्रिनिदादचा वॅलकॉट 88.16 मीटरसह पहिल्या क्रमांकावर आहे. तर, ग्रेनाडाच्या अँडरसन पीटर्सने 87.38 मीटर भाला फेकून दुसरे स्थान पटकावले आहे.
सचिन यादवने शेवटपर्यंत दम दाखवला
अंतिम फेरीच्या पहिल्या फेरीत एक विशेष गोष्ट म्हणजे भारताकडून दुसऱ्या क्रमांकावर सचिन यादव होता. पहिल्या फेरीत त्याने 86.27 मीटर दूर भाला फेकला. सचिनच्या कारकिर्दीतील ही आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे. पण त्याचे पदक अवघ्या 40 सेंटीमीटरने हुकले.
नीरजने सलग दुसऱ्यांदा सुवर्णपदक जिंकण्याची संधी गमावली
या स्पर्धेच्या अंतिम फेरीत गतविजेता नीरज चोप्राने सलग दुसऱ्यांदा आपले स्थान निश्चित केले होते. यापूर्वी 2023 मध्ये त्याने उत्कृष्ट कामगिरी करत देशासाठी सुवर्णपदक जिंकले होते. त्या स्पर्धेच्या अंतिम फेरीत नीरजने 88.17 मीटर भाला फेकला होता. मागच्या वेळी जेव्हा नीरजचा सामना पाकिस्तानच्या अर्शद नदीमशी झाला होता, तेव्हा त्याने बाजी मारली होती. पण यावेळी नीरजने ही संधी गमावली.
कोण बनला जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2025 चा विजेता?
त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या वॅलकॉटने जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत सुवर्णपदक जिंकले. त्याने 88.16 मीटर दूर भाला फेकला. तर, ग्रेनाडाचा पीटर्स 87.38 मीटर भालाफेकीसह दुसऱ्या क्रमांकावर राहिला. अमेरिकेच्या कर्टिस थॉम्पसनने 86.67 मीटरसह कांस्यपदक पटकावले.


