जपानच्या आयची-नागोयामध्ये सुरू असलेल्या एशियन गेम्स २०२६ मधील भारताचा प्रवास संपला आहे. टीम इंडियाने यंदा २१ सुवर्ण, २७ रौप्य आणि ३७ कांस्य अशी एकूण ८५ पदके जिंकली आहेत. रविवारी या स्पर्धेचा समारोप होणार असून, भारताने पदकतालिकेत चौथे स्थान मिळवले आहे.

जपानच्या आयची-नागोयामध्ये सुरू असलेल्या एशियन गेम्स २०२६ मधील भारताचा प्रवास आता संपला आहे. टीम इंडियाने यंदा २१ सुवर्ण, २७ रौप्य आणि ३७ कांस्य अशी एकूण ८५ पदके जिंकली. उद्या, रविवारी या स्पर्धेचा समारोप होणार आहे. पदकतालिकेत चीन, यजमान जपान आणि दक्षिण कोरियाच्या पाठोपाठ भारताने चौथ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. शेवटच्या तीन दिवसांत सलग सुवर्णपदके जिंकत टीम इंडियाने दहाव्या स्थानावरून थेट चौथ्या स्थानावर मुसंडी मारली. पण, गेल्या एशियन गेम्सच्या तुलनेत यंदा भारताला २२ पदके कमी मिळाली आहेत.

गेल्या एशियन गेम्समध्ये भारताने जिंकली होती १०७ पदके आणि २८ सुवर्ण

गेल्या स्पर्धेच्या तुलनेत भारताला यंदा ७ सुवर्णपदके कमी मिळाली आहेत. २०२२ च्या हांगझोऊ एशियन गेम्समध्ये टीम इंडियाने एकूण १०७ पदके जिंकली होती. त्यात २८ सुवर्ण, ३८ रौप्य आणि ४१ कांस्य पदकांचा समावेश होता. यंदाच्या एशियन गेम्समध्ये ३६ खेळांमध्ये भारताचे ४९५ खेळाडू सहभागी झाले होते. दुसरीकडे, चीनने १५४ सुवर्णांसह एकूण २८८ पदके जिंकत पहिले स्थान पटकावले. तर यजमान जपानने ५९ सुवर्ण आणि एकूण २१७ पदके जिंकत दुसरे स्थान मिळवले.

यंदा कोणत्या खेळांमध्ये मिळाले सुवर्ण?

यंदाच्या एशियन गेम्समध्ये कबड्डी, क्रिकेट आणि हॉकीमध्ये पुरुष आणि महिला अशा दोन्ही संघांनी भारताला सुवर्णपदक जिंकून दिले. ट्रॅप शूटिंगसह काही इव्हेंट्समध्ये भारतीयांनी ऐतिहासिक सुवर्ण कामगिरी केली. तिरंदाजीत देशाच्या महिला खेळाडूंनी इतिहास रचत सुवर्णपदक पटकावले. अ‍ॅथलेटिक्समध्येही काही ऐतिहासिक पदके आली. पण हे खेळ सोडले तर बाकी सर्व ठिकाणी भारताच्या पदरी निराशाच पडली. टेनिससारख्या खेळातून यंदा भारताला रिकाम्या हाताने परतावे लागले. गेल्या वेळी टेनिसमध्ये भारताने १ सुवर्ण आणि १ रौप्य जिंकले होते.

कुठे झाली निराशा?

१० मीटर एअर पिस्तूलसारख्या भारताचा दबदबा असलेल्या इव्हेंटमध्येही यंदा निराशा झाली. दोन वेळची ऑलिम्पिक पदक विजेती मनू भाकरसारखी स्टार खेळाडू रिकाम्या हाताने परतली. वेटलिफ्टिंगमध्ये मीराबाई चानूचा अपवाद वगळता बाकी सर्वांनीच निराश केले. पीव्ही सिंधूसारखे दिग्गजही अपयशी ठरले. घोडेस्वारीत (इक्वेस्ट्रियन) गेल्या वेळी भारताने सुवर्ण जिंकले होते, पण यंदा तिथे एकही पदक आले नाही. बॉक्सिंगमध्ये ३ सुवर्णांसह एकूण ६ पदके मिळाली.

कोणत्या खेळातून किती सुवर्ण?

यंदाच्या एशियन गेम्समध्ये भारताला सर्वाधिक सुवर्णपदके तिरंदाजीतून मिळाली. जपानमध्ये भारतीयांनी तिरंदाजीत ५ सुवर्णांसह एकूण ९ पदके जिंकली. शूटिंग आणि बॉक्सिंगमधून प्रत्येकी ३ सुवर्णपदके आली. कुस्ती, क्रिकेट, हॉकी आणि कबड्डीमधून प्रत्येकी २ सुवर्णपदके मिळाली. अ‍ॅथलेटिक्स आणि गोल्फमधून प्रत्येकी १ सुवर्ण आले. स्क्वॉशमधून २, तर सेलिंग, वेटलिफ्टिंग आणि वुशूमधून भारतीयांनी प्रत्येकी १ रौप्यपदक जिंकले. बॅडमिंटन, कुराश, मिक्स्ड मार्शल आर्ट्स, रोइंग, सेपाकटक्रॉ, सॉफ्ट टेनिस आणि टेबल टेनिसमधून प्रत्येकी १ कांस्यपदक मिळाले.

गेल्या वेळच्या तुलनेत...

२०२२ च्या एशियन गेम्समध्ये भारताने शंभरहून अधिक पदके जिंकून सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. त्या स्पर्धेत भारताला सर्वाधिक सुवर्णपदके शूटिंगमधून (७ सुवर्णांसह २२ पदके) आणि अ‍ॅथलेटिक्स ट्रॅकमधून (६ सुवर्णांसह २९ पदके) मिळाली होती. गेल्या एशियन गेम्समध्ये भारताने एकूण १० खेळांमध्ये सुवर्णपदके जिंकली होती. यंदा मात्र केवळ ८ खेळांमधूनच सुवर्णपदके आली आहेत.