लंडनच्या साउथएंड विमानतळावर रविवारी दुपारी एक लहान विमान उड्डाण घेत असताना काही सेकंदातच कोसळले. या अपघातामुळे विमान पूर्णपणे जळून खाक झाले असून, सुरक्षेच्या दृष्टिकोनातून संपूर्ण परिसर सील करण्यात आला आहे.
लंडन - साउथएंड विमानतळावर एक भीषण अपघात घडला आहे. एका विमानाच्या अपघातामुळे संपूर्ण परिसरात प्रचंड खळबळ माजली आहे. सोशल मीडियावर समोर आलेल्या दृश्यांमध्ये आकाशात उंच उसळणारी आग आणि काळ्या धुराचे लोट दिसून येत आहेत. विमानाने उड्डाण केल्यानंतर लगेच ते कोसळले आहे. अहमदाबाद विमानतळावर घडलेल्या विमान कोसळल्याच्या घटनेशी या घटनेचे साम्य दिसून येत आहे.
लंडनच्या साउथएंड विमानतळावर रविवारी दुपारी एक लहान विमान उड्डाण घेत असताना काही सेकंदातच कोसळले. या अपघातामुळे विमान पूर्णपणे जळून खाक झाले असून, सुरक्षेच्या दृष्टिकोनातून संपूर्ण परिसर सील करण्यात आला आहे. अद्याप विमानात किती प्रवासी होते आणि ते कोठे जात होते याची अधिकृत माहिती मिळालेली नाही.
घटनेचा थरार
या दुर्घटनेचा प्रत्यक्षदर्शी जॉन जॉन्सन यांनी सांगितले की, "मी माझ्या कुटुंबासोबत विमानतळावर होतो. विमानाने उड्डाण घेतल्यानंतर तीन-चार सेकंदातच ते डावीकडे झुकू लागले. काही क्षणांतच ते उलटे झाले आणि नाक झुकवत जमिनीवर आदळले. त्यानंतर मोठा स्फोट झाला आणि आगीचा एक मोठा गोळा आकाशात उसळला."
विमान सुमारे १२ मीटर (३९ फूट) लांब होते. हे एक 'जनरल एव्हिएशन एअरक्राफ्ट' होते, म्हणजे प्रवासी वाहतुकीसाठी नव्हे तर खासगी किंवा प्रशिक्षण हेतूने वापरले जाणारे छोटे विमान. यामध्ये नेमके किती लोक होते, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.
आपत्कालीन सेवांची तत्काळ कारवाई
विमान कोसळताच साउथएंड विमानतळावरील अग्निशमन सेवा तात्काळ घटनास्थळी पोहोचली. दोन अग्निशमन इंजिन तात्काळ घटनास्थळी पाठवण्यात आले. त्यानंतर पोलिस, रुग्णवाहिका आणि अन्य आपत्कालीन सेवाही घटनास्थळी दाखल झाल्या.
एसेक्स पोलिसांनी अधिकृत निवेदनात सांगितले की, "आम्हाला दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास ही गंभीर घटना कळविण्यात आली. सध्या घटनास्थळी आपत्कालीन सेवा कार्यरत आहेत आणि ही मदत कार्ये पुढील काही तास चालणार आहेत."
ही घटना लंडनपासून सुमारे ७२ किलोमीटर अंतरावर असलेल्या विमानतळावर घडली. या विमानतळावरील हवाई वाहतूक तुलनेने कमी असते, त्यामुळे अपघातग्रस्त विमान उड्डाण करणाऱ्या मोजक्या फ्लाइट्सपैकी एक होते.
परिसरातील नागरिकांची सुरक्षितता
दुर्घटनास्थळी झालेल्या स्फोटामुळे आसपासच्या परिसरालाही धोका निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी विमानतळाजवळील गोल्फ क्लब आणि रग्बी क्लब तात्काळ रिकामे केले. हे दोन्ही क्लब अपघाताच्या अगदी जवळ आहेत आणि धुरामुळे तसेच संभाव्य स्फोटांमुळे तेथील नागरिकांना धोका होऊ शकतो, असे पोलिसांनी स्पष्ट केले.
लोकप्रतिनिधींचे अपील
घटनेनंतर स्थानिक खासदार डेव्हिड बर्टन-सॅम्पसन यांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आणि आपत्कालीन सेवांना आपले काम करू देण्याचे आवाहन केले. त्यांनी ट्विट करत म्हटले, "या भीषण घटनेतील सर्व पीडितांच्या प्रती माझ्या भावना आहेत. कृपया कोणीही घटनास्थळी जाण्याचा प्रयत्न करू नये. आपत्कालीन सेवेच्या कामात व्यत्यय येऊ नये, याची काळजी घ्या."
फ्लाइट्सवर परिणाम
या अपघातामुळे रविवारी दुपारी नियोजित असलेल्या चार फ्लाइट्स रद्द करण्यात आल्या. साउथएंड विमानतळाच्या अधिकृत संकेतस्थळावर ही माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामुळे प्रवाशांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते, मात्र विमानतळ प्रशासनाने सर्व प्रवाशांना शांत राहण्याचे आवाहन केले आहे.
असेच अहमदाबाद विमानतळावर कोसळले होते एअर इंडियाचे विमान
Air India Flight AI 171, एक Boeing 787‑8 Dreamliner, १२ जून २०२५ रोजी अहमदाबाद विमानतळावरून लंडन गॅटविककडे उड्डाण भरल्यानंतर काही क्षणांत कोसळले होत. AAIB च्या प्राथमिक अहवालानुसार, इंजिनांसाठी इंधन पुरवठा अचानक बंद झाला (फ्यूल स्विच RUN मधून CUTOFF मध्ये गेले), ज्यामुळे दोन्ही इंजिन बंद पडले आणि विमान जमिनीवर लगेच कोसळले. कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डिंगमध्ये पायलटांचा संभ्रम स्पष्ट झाला. “एक पायलट दुसऱ्या कडे विचारतो, ‘इंधन पुरवठा का बंद झाला?’ आणि दुसर्याने ते केले नाही, असे उत्तर दिले”
कोसळलेल्या विमानात २४२ प्रवासी व कर्मचारी होते; त्यात २४१ जणांना मृत्यू झाला, तर एकच प्रवासी जखमी अवस्थेत वाचला आहे. अपघातामुळे जवळच्या मेडिकल कॉलेज हॉस्टेलवर विमान आदळले, ज्यामध्ये विद्यार्थी व परिसरातील काही नागरिकांचा मृत्यू झाला, तर अनेक जखमी झाले.


