पूर्व चीनमधील १०१ वर्षांचे एक आजोबा सध्या इंटरनेटवर चांगलेच व्हायरल होत आहेत. गोड पेये टाळण्याचा सल्ला दिला जात असतानाही, या आजोबांना कोका-कोला आणि स्प्राइट पिण्याची प्रचंड आवड आहे.

मुंबई : पूर्व चीनमधील १०१ वर्षांचे एक आजोबा सध्या त्यांच्या अनोख्या फूड्सच्या सवयींमुळे इंटरनेटवर चर्चेचा विषय बनले आहेत. डॉक्टर सहसा गोड पेये न पिण्याचा सल्ला देतात, पण या आजोबांना कोका-कोला आणि स्प्राइटची भलतीच आवड आहे. त्यांचा रोजचा निवांत दिनक्रम, उत्तम भूक आणि दीर्घायुष्य पाहून सोशल मीडिया युजर्सही थक्क झाले आहेत.

'साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट'च्या रिपोर्टनुसार, झेजियांग प्रांतात राहणारे लू शिझेंग हे पणजोबा दीर्घायुष्याबाबत स्वतःचेच नियम पाळताना दिसतात. आजकाल लोक डाएट आणि शुगर-फ्री पदार्थांकडे वळत असताना, लू मात्र त्यांच्या आवडीची कोल्ड्रिंक्स मजेत पितात आणि आपल्या बचतीचा मोठा हिस्सा खाण्यापिण्यावर खर्च करतात.

ग्रामीण भागात राहणारे लू दर पाच दिवसांनी रिक्षाने स्थानिक बाजारात जाऊन किराणा सामान आणतात. त्यांच्या पिशवीत सहसा मासे, कोळंबी आणि खेकडे यांसारखे सीफूड, तसेच डुकराचे मांस आणि ताज्या भाज्या असतात.

गेल्या वर्षापर्यंत हे शंभरी पार केलेले आजोबा स्वतःची तीन चाकी सायकल चालवून बाजारात जायचे. पण एकदा ते पडल्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना सायकल चालवण्यास मनाई केली. तेव्हापासून ते प्रवासाबाबत थोडी काळजी घेतात.

कोक, स्प्राइट आणि उत्तम जेवणाची आवड

लू यांच्या लाइफस्टाइलमध्ये त्यांच्या कोल्ड्रिंक्सच्या आवडीची सर्वात जास्त चर्चा होते. ते नेहमी कोका-कोला आणि स्प्राइटचा साठा करून ठेवतात. विशेषतः थंड स्प्राइटमध्ये व्हाईट वाईनचे काही थेंब मिसळून पिणे त्यांना खूप आवडते.

त्यांची भूकही तितकीच दांडगी आहे. त्यांच्या केअरटेकरच्या (नॅनी) सांगण्यानुसार, लू एका जेवणात अर्धी वाटी भात आणि खेकड्यांची अख्खी प्लेट फस्त करतात. त्यांना गोड पदार्थही आवडतात, ज्यात कलिंगड, नाशपाती आणि संत्री यांसारख्या फळांचा समावेश असतो.

त्यांची योग्य काळजी घेतली जावी यासाठी त्यांच्या दोन मुलांनी एका केअरटेकरची नेमणूक केली आहे. त्यांचा एक मुलगा बीजिंगमध्ये राहतो, तर दुसरा जवळच एक फॅक्टरी चालवतो.

शिस्तबद्ध झोपेमुळे टिकून आहे फिटनेस

खाण्यापिण्याच्या अशा सवयी असूनही, लू यांचा रोजचा दिनक्रम अतिशय शिस्तबद्ध आहे. ते संध्याकाळी ५ च्या सुमारास जेवतात आणि रात्री ८ वाजता झोपायला जातात. पहाटे ४ वाजता त्यांना जाग येते, पण ते सकाळी ६ वाजेपर्यंत अंथरुणातच आराम करतात आणि स्ट्रेचिंग करतात.

दुपारी १२ च्या सुमारास ते थोडा वेळ वामकुक्षीही घेतात. यामुळे त्यांचा संपूर्ण दिवस अतिशय निवांत आणि ठरलेला असतो.

लू यांना आपल्या उत्तम आरोग्याचा अभिमान आहे. आपल्याला क्वचितच सर्दी होते, असे ते सांगतात. त्यांची स्मरणशक्तीही खूप तीक्ष्ण आहे, ज्यामुळे त्यांना तरुणपणीच्या अनेक गोष्टी आजही लख्ख आठवतात. याशिवाय, आपला रक्तदाबही नियंत्रणात असल्याचे ते सांगतात.

हे १०१ वर्षांचे आजोबा त्यांना मिळणाऱ्या मासिक वृद्धापकाळ भत्त्यावर समाधानी आहेत. झेजियांग प्रांतात १०० वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या लोकांना दरमहा ८०० युआन (सुमारे १२० डॉलर्स) मिळतात, तर ९० ते ९९ वयोगटातील लोकांना १०० युआन दिले जातात.

कोल्ड्रिंक्स पिऊनही १०१ वर्षे कसे जगले? इंटरनेटला पडलाय प्रश्न

लू यांच्या गोड कोल्ड्रिंक्सच्या आवडीमुळे इंटरनेटवर अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. आरोग्यासाठी हानिकारक मानली जाणारी पेये रोज पिऊनही हे आजोबा १०१ वर्षे कसे जगले, याचे अनेक युजर्सना आश्चर्य वाटत आहे.

काही सोशल मीडिया युजर्सच्या मते, त्यांचा आनंदी स्वभाव आणि झोपेचे योग्य वेळापत्रक हे त्यांच्या दीर्घायुष्याचे रहस्य असू शकते. तर काहींचे म्हणणे आहे की, दीर्घायुष्य हे अनुवांशिकतेसह अनेक गोष्टींवर अवलंबून असते. त्यामुळे एका व्यक्तीच्या सवयींवरून ती जीवनशैली योग्य आहे की नाही, हे ठरवता येत नाही.