Xiaomi 18 : शाओमी 18 या फ्लॅगशिप स्मार्टफोनबद्दल नवी माहिती समोर आली आहे. या फोनमध्ये 7,200mAh क्षमतेची मोठी बॅटरी, 200 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा आणि 2K डिस्प्ले असू शकतो, असं रिपोर्ट्समध्ये म्हटलं आहे. हा फोन या वर्षाच्या अखेरीस बाजारात येण्याची शक्यता आहे.
Xiaomi 18 : टेक जगतात सध्या शाओमीच्या आगामी Xiaomi 18 या फ्लॅगशिप स्मार्टफोनची जोरदार चर्चा सुरू आहे. या फोनच्या फीचर्सबाबत रोज नवे खुलासे होत आहेत. आता समोर आलेल्या ताज्या माहितीनुसार, शाओमी या फोनमध्ये अशा एका तंत्रज्ञानावर काम करत आहे, ज्यामुळे दिग्गज स्मार्टफोन कंपन्यांचे धाबे दणाणले आहेत. शाओमी आपल्या एका कॉम्पॅक्ट (लहान आकाराच्या) फोनमध्ये तब्बल ७,२००mAh क्षमतेची प्रचंड बॅटरी देण्याच्या तयारीत आहे.

या नव्या माहितीनुसार, शाओमी 18 च्या प्रोटोटाइपमध्ये 7,200mAh क्षमतेची बॅटरी तपासली जात आहे. याआधीच्या शाओमी 17 मध्ये 7,000mAh बॅटरी होती, असं म्हटलं जातं. म्हणजेच, नव्या मॉडेलमध्ये 200mAh जास्त क्षमतेची बॅटरी मिळणार आहे. एका कॉम्पॅक्ट फोनमध्ये एवढी मोठी बॅटरी देणं, हे शाओमीचं एक मोठं पाऊल ठरू शकतं.
सध्या काही स्मार्टफोन कंपन्या 8,000mAh ते 10,000mAh क्षमतेच्या बॅटरीवर काम करत असल्याच्या बातम्या येत आहेत. पण तुलनेने लहान आकारात 7,200mAh बॅटरी देणं हे नक्कीच विशेष असेल. डिस्प्लेच्या बाबतीतही शाओमी 18 मध्ये मोठे बदल अपेक्षित आहेत. या फोनमध्ये 6.4-इंचाचा 2K रिझोल्यूशनवाला डिस्प्ले असेल, ज्याचा अस्पेक्ट रेशो 19.5:9 असेल. याशिवाय, फोनला कर्व्ह कॉर्नर आणि चारही बाजूंना अतिशय पातळ बेझल्स मिळतील, असंही बोललं जातंय.
कॅमेरा डिपार्टमेंटमध्येही मोठे बदल होण्याची शक्यता आहे. टिपस्टरच्या मते, शाओमी 18 मध्ये 1/1.28-इंचाच्या मोठ्या सेन्सरसह 200 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा दिला जाऊ शकतो. इतकंच नाही, तर शाओमी 18 सीरिजच्या काही मॉडेल्समध्ये ड्युअल 200 मेगापिक्सेल कॅमेरा सेटअप असू शकतो, अशीही एक चर्चा आहे.
याउलट, मागच्या वर्षी आलेल्या शाओमी 17 प्रो आणि शाओमी 17 प्रो मॅक्स मॉडेल्समध्ये 50MP प्रायमरी कॅमेरा, 50MP टेलीफोटो लेन्स आणि आणखी एक 50MP सेन्सर असा ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप होता.
शाओमी 18 सीरिज सप्टेंबरमध्ये चीनमध्ये लाँच होईल, असा अंदाज आहे. गेल्या वर्षी शाओमी 17 सीरिजही सप्टेंबरमध्येच लाँच झाली होती. त्या सीरिजमध्ये शाओमी 17, शाओमी 17 प्रो आणि शाओमी 17 प्रो मॅक्स हे मॉडेल्स होते. त्यांची सुरुवातीची किंमत अनुक्रमे 4,499 युआन, 4,999 युआन आणि 5,999 युआन होती. मात्र, ही सर्व माहिती लीक झालेल्या रिपोर्ट्सवर आधारित आहे. कंपनीने अजूनही अधिकृतपणे काहीही जाहीर केलेलं नाही. त्यामुळे, फोन लाँच झाल्यावर त्याच्या अंतिम फीचर्समध्ये बदल होण्याची शक्यता आहे.


