एका पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीला बिर्याणीत झोपेच्या गोळ्या मिसळून ठार मारले. नंतर हा नैसर्गिक मृत्यू असल्याचे भासवण्याचा प्रयत्न केला, पण मृत व्यक्तीच्या मित्रांच्या संशयामुळे पोलिसांनी तपास करून सत्य उघड केले.

हैदराबाद: प्रियकराच्या मदतीने पतीचा जीव घेतल्याची घटना आंध्र प्रदेशातील गुंटूरच्या दुग्गीराला मंडळातील चिलुवूर गावात घडली आहे. हत्येनंतर महिलेने हा नैसर्गिक मृत्यू असल्याचे भासवण्याचा प्रयत्न केला, अशी माहिती पोलिसांनी दिली. मृत व्यक्तीचे नाव लोकम शिव नागराजू असून तो कांद्याचा व्यवसाय करत होता. 2007 मध्ये नागराजूने लक्ष्मी माधुरी नावाच्या महिलेशी लग्न केले होते. या जोडप्याला दोन मुले आहेत, असे मंगलगिरी ग्रामीणचे सीआय व्यंकटब्रह्मम आणि दुग्गीरालाचे एसआय व्यंकट रवी यांनी सांगितले.

नागराजूची पत्नी लक्ष्मी माधुरी विजयवाडामधील एका चित्रपटगृहाच्या तिकीट काउंटरवर काम करत होती. यावेळी तिची ओळख सत्तेनपल्ली येथील कारचालक असलेल्या गोपी नावाच्या व्यक्तीशी झाली. पती असूनही माधुरीचे गोपीसोबत अनैतिक संबंध होते.

कामाला न जाता घरीच राहिला!

अनैतिक संबंधांमुळे माधुरीने पतीला कांद्याचा व्यवसाय करण्यापासून रोखले आणि त्याला कामासाठी हैदराबादला पाठवले. पण नागराजू हैदराबादहून परत आला आणि चिलुवूरमध्येच राहू लागला. यामुळे पती-पत्नीत मतभेद निर्माण झाले होते.

बिर्याणीत झोपेच्या गोळ्या मिक्स!

18 जानेवारी रोजी माधुरीने घरी बिर्याणी बनवली. बिर्याणीत 20 झोपेच्या गोळ्या मिसळल्यामुळे, ती खाल्ल्यानंतर नागराजू झोपी गेला. नागराजू गाढ झोपेत असताना रात्री सुमारे 11.30 वाजता माधुरीने गोपीला बोलावून घेतले. यावेळी दोघांनी मिळून नागराजूचा श्वास थांबवला.

गोपी नागराजूच्या छातीवर बसला आणि त्याचे शरीर हलू नये म्हणून त्याला घट्ट पकडले. माधुरीने उशीने तोंड दाबून पतीची हत्या केली, असे पोलिसांनी सांगितले. नागराजूच्या मृतदेहाशेजारी बसून दोघांनी अश्लील चित्रपट पाहिले. नागराजूचा मृत्यू झाल्याची खात्री होताच गोपी तेथून पळून गेला. पहाटे चारच्या सुमारास माधुरीने शेजाऱ्यांना उठवून पतीच्या मृत्यूची माहिती दिली.

कान, नाकातून रक्तस्राव झाल्याचे मित्रांच्या लक्षात आले

नागराजू आणि माधुरी यांच्यात नेहमी भांडणे होत असत. माधुरीच्या अनैतिक संबंधांबद्दल माहिती असल्यामुळे स्थानिकांना नागराजूच्या मृत्यूबाबत सुरुवातीपासूनच संशय होता. अंत्यसंस्कारावेळी नागराजूच्या मित्रांनी त्याच्या नाकातून आणि कानातून रक्त येत असल्याचे पाहून त्याच्या वडिलांना माहिती दिली. मुलाच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त करत नागराजूच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. अंत्यसंस्कार थांबवून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.

शवविच्छेदनात बरगड्या तुटल्याचे आणि गुदमरून मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. संशयावरून माधुरीला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, तिने गुन्ह्याची कबुली दिली. प्रियकर गोपीसोबत मिळून हे कृत्य केल्याचे तिने मान्य केले. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.