चीनमध्ये, पतीच्या मृत्यूनंतर तिला कळले की त्याचे अनेक वर्षांपासून एक गुप्त अफेअर होते आणि त्याने कौटुंबिक संपत्तीतून करोडो रुपये आपल्या प्रेयसीला दिले होते. त्यानंतर तिने प्रेयसीविरुद्ध कायदेशीर लढाई सुरू केली.
चीनमधील एका महिलेला तिच्या पतीच्या मृत्यूनंतर अशी काही रहस्ये कळली की तिला अक्षरशः धक्काच बसला. साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या वृत्तानुसार, तिच्या मृत पतीने अनेक वर्षे गुप्त संबंध ठेवले होते आणि सुमारे 20 दशलक्ष युआन (अंदाजे 23 कोटी रुपये) आपल्या प्रेयसीला दिले होते.
पतीचे गुप्त अफेअर
शांघायची रहिवासी असलेल्या शेन नावाच्या महिलेला 20 वर्षांच्या संसारानंतर आपली फसवणूक झाल्याचे समजले. मे 2022 मध्ये पती जिनच्या मृत्यूनंतर, तिने त्याची वैयक्तिक कागदपत्रे तपासली असता, 2015 पासून त्याचे 'ताओ' नावाच्या महिलेसोबत गुप्त संबंध असल्याचे उघड झाले. हे फक्त एक अफेअर नव्हते, तर जिनने कुटुंबाच्या एकत्रित संपत्तीतून 19 दशलक्ष युआनपेक्षा जास्त (अंदाजे 23 कोटी रुपये) गुपचूप ताओला दिल्याचेही शेनला समजले.
प्रकरण कोर्टात पोहोचले
आपल्या माहिती किंवा संमतीशिवाय झालेल्या या आर्थिक व्यवहारांविरोधात शेन आणि तिच्या मुलांनी कोर्टात जाण्याचा निर्णय घेतला. वैवाहिक जीवनात कमावलेली संपत्ती ही पती-पत्नीची संयुक्त मालमत्ता असते आणि जोडीदाराला न विचारता ती कोणालाही भेट म्हणून देता येत नाही, असा युक्तिवाद त्यांनी कोर्टात केला.
पत्नीच्या बाजूने निकाल
कोर्टाने या प्रकरणावर सुनावणी करून शेनच्या बाजूने निकाल दिला. जिनने आपल्या पत्नीला न कळवता एवढी मोठी रक्कम दुसऱ्या महिलेला देणे कायदेशीररित्या टिकणारे नाही, असे कोर्टाने नमूद केले. जिनच्या मृत्यूआधीच ताओने 5.4 दशलक्ष युआन त्याला परत केले होते. त्यामुळे उर्वरित 14 दशलक्ष युआन (अंदाजे 17 कोटी रुपये) तातडीने शेनला परत करण्याचे आदेश कोर्टाने दिले.
या निकालाविरोधात ताओने अपील केले, पण शांघाय फर्स्ट इंटरमीडिएट पीपल्स कोर्टाने ते फेटाळून लावले. खालच्या कोर्टाचा निर्णय कायम ठेवत, कुटुंबासोबत आणि जोडीदारासोबत केलेल्या अशा फसवणुकीला कोणताही कायदेशीर आधार नाही, असे कोर्टाने पुन्हा स्पष्ट केले. 20 वर्षांचे प्रेम हे एक खोटे होते हे समजल्यावरही, शेन आपल्या मुलांसोबत लढून आपला हक्क मिळवण्यात यशस्वी झाली.


