कुठे प्रवास करायचा म्हटले की पाळी अनेकदा अनियमितपणे महिलांना त्रास देते. नको असलेल्या वेळीच पीरियड येण्याचे प्रकार जास्त घडतात. याची अनेक कारणे आहेत. प्रवासादरम्यान तुम्हालाही पाळी येत असेल, तर त्याचे कारण काय आहे, हे येथे जाणून घेऊया…
आपल्या आवडत्या ठिकाणी जायचे, तिथे मनसोक्त पर्यटन व फिरण्याचा आनंद घ्यायचा, अशी अनेक स्वप्ने तुम्ही पाहिली असतील. पण तुमची ही सगळी स्वप्ने पाळीमुळे विरून जातात. प्रवासाला सुरुवात करताच पाळी येते. 'माझ्यासोबत नेहमीच असे होते' असे म्हणणाऱ्या महिला तुम्ही पाहिल्या असतील. पाळी यायला अजून चार-पाच दिवस बाकी असताना इतक्या लवकर कशी आली, म्हणून महिला गोंधळून जातात. तर काहीजणींची पाळी चार-पाच दिवस आधीच यायला हवी होती, पण ती मुद्दाम उशिरा आता आली, म्हणून त्रस्त होतात.
प्रवासादरम्यान (Travel) पाळी (Periods) का येते आणि प्रवास व पाळी यांचा काय संबंध आहे, हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. मासिक पाळी कशी कार्य करते हे तुम्हाला माहीत आहे का? : मेंदूचा (Brain) भाग असलेल्या पिट्यूटरी ग्रंथी आणि हायपोथालेमसमधून स्रवणारे हार्मोन्स मासिक पाळीचे नियमन करतात. याचा अर्थ, तुमच्या शारीरिक किंवा भावनिक स्थितीत कोणताही बदल झाल्यास, आहारात बदल झाल्यास आणि शारीरिक थकवा, तणाव जाणवल्यास तुमच्या हार्मोन्सच्या स्रावामध्ये बदल होतो. यामुळे पाळी कधीही येण्याची शक्यता असते.
ओव्हुलेशनसाठी (अंडोत्सर्ग) योग्य प्रमाणात हार्मोन्स स्रवणे महत्त्वाचे असते. यात गडबड झाल्यास पाळीवर परिणाम होतो. प्रवासादरम्यानच पाळी का येते, या तुमच्या प्रश्नाचे उत्तर द्यायचे झाल्यास, प्रवास आणि पाळी यांचा थेट संबंध नाही. पण प्रवासातील काही घटक आपल्या शरीरावर परिणाम करतात, ज्याचा अप्रत्यक्ष परिणाम पाळीच्या हार्मोन्सवर दिसून येतो.
तणाव (Stress) : वेगवेगळ्या ठिकाणी प्रवास करताना तणाव निर्माण होतो. यामुळे शरीराच्या नैसर्गिक सर्कॅडियन लयमध्ये अडथळा येतो. तणाव आणि जेट लॅगमुळे हार्मोन्सच्या पातळीवर परिणाम होतो, ज्यामुळे मासिक पाळी अनियमित होते.
आहार आणि व्यायामातील बदल (Differ in Food and exercise) : घरी जसे नियमित दिनक्रम असतो, तसे प्रवासात राहणे शक्य नसते. कधीकधी प्रवासाला जाण्यापूर्वी दोन दिवस आधीपासूनच तयारी सुरू झाल्यामुळे आहार आणि व्यायामात बदल होतो. बाहेरचे अन्न खाणे आणि विश्रांतीशिवाय प्रवास करणे यामुळे हार्मोन्सच्या संतुलनावर परिणाम होतो, ज्यामुळे पाळीच्या नियमिततेत अडथळा येतो.
बदललेले हवामान (Climate Change) : प्रवासादरम्यान हवामान बदलते. उदाहरणार्थ, उष्ण प्रदेशातून थंड हवामानात गेल्यावर शरीराला जुळवून घेण्यासाठी वेळ लागतो. याचा परिणाम शरीरातील हार्मोन्सच्या स्रावावर होतो. त्यामुळे पाळी लवकर किंवा उशिरा येऊ शकते.
दैनंदिन कामांमधील बदल (Differ in Routine Work) : आपले शरीर एका वेळापत्रकाला सरावलेले असते. योग्य वेळी जेवणासोबतच झोपही महत्त्वाची असते. पण प्रवासादरम्यान सर्व काही वेळेवर करणे शक्य होत नाही. याचा अप्रत्यक्ष परिणाम पाळीच्या हार्मोन्सवर होतो. त्यामुळे प्रवासात अचानक पाळी येऊ शकते.
प्रवासाला जाण्यापूर्वी : प्रवासाला जाण्यापूर्वी, तुमची पाळीची तारीख जवळ असो किंवा दूर, बॅगेत पॅड ठेवायला विसरू नका. जर तुम्हाला जास्त पोटदुखीमुळे गोळ्या घ्याव्या लागत असतील, तर त्याही सोबत ठेवा. अनोळखी ठिकाणी पॅड आणि गोळ्या शोधत फिरण्याचा त्रास वाचेल.


