अनेक महिलांना लहान वयातच थायरॉईड, हार्मोनल संबंधित आजार होतात. पुरुषापेक्षा महिलांमध्ये ही समस्या जास्त आढळते. मासिक पाळी, गर्भधारणा आणि रजोनिवृत्ती या सर्वांचा थायरॉईड ग्रंथीच्या कार्यावर परिणाम होतो.त्याची कारणे पाहूया.

आजकाल महिलांमध्ये थायरॉईडची समस्या पुरुषापेक्षा अधिक प्रमाणात दिसून येत आहे. मानेच्या खालच्या भागात असलेली ही फुलपाखराच्या आकाराची लहान ग्रंथी अनेक शारीरिक कार्यांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावते. ही ग्रंथी चयापचय क्रिया नियंत्रित करण्यापासून ते मूड सुधारण्यापर्यंत अनेक कार्ये करते. हार्मोनल बदल, आनुवंशिकता आणि जीवनशैलीतील निवडी यासह अनेक कारणांमुळे पुरुषांपेक्षा महिलांना थायरॉईड समस्यांचा धोका जास्त असतो.

पुरुषांच्या तुलनेत महिलांमधील अंतःस्रावी प्रणाली अधिक गुंतागुंतीची असते, कारण जीवनाच्या विविध टप्प्यांवर हार्मोन्सची पातळी बदलत राहते. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डायबेटिस अँड डायजेस्टिव्ह अँड किडनी डिसीजेसच्या मते, मासिक पाळी, गर्भधारणा आणि रजोनिवृत्ती या सर्वांचा थायरॉईड ग्रंथीच्या कार्यावर परिणाम होऊ शकतो.

मासिक पाळीच्या दरम्यान, इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉनसारख्या हार्मोन्सची पातळी बदलते. या चढ-उतारांमुळे थायरॉईड हार्मोनच्या उत्पादनावर परिणाम होऊ शकतो. इस्ट्रोजेनची उच्च पातळी थायरॉईड हार्मोन्सचे उत्पादन आणि वापर कमी करू शकते.

"हाशिमोटो थायरॉइडायटिससारखे ऑटोइम्यून आजार महिलांमध्ये होण्याची शक्यता जास्त असते. या स्थितीत, रोगप्रतिकारशक्ती चुकून थायरॉईड ग्रंथीवर हल्ला करते. यामुळे महिलांना हायपोथायरॉईडीझमचा धोका अधिक असतो," असे फंक्शनल न्यूट्रिशनिस्ट मुग्धा प्रधान सांगतात.

थायरॉईडचे आरोग्य समजून घेण्यासाठी आनुवंशिकता महत्त्वाची आहे. कुटुंबात थायरॉईडचा इतिहास असल्यास धोका वाढू शकतो. केवळ आनुवंशिकता नाही, तर तणाव, आहार आणि विषारी पदार्थांच्या संपर्कात येणे यांसारखे पर्यावरणीय घटक देखील मोठी भूमिका बजावतात. 

योग, श्वासोच्छवासाचे व्यायाम किंवा ध्यान केल्याने कॉर्टिसोलची पातळी कमी होण्यास आणि हार्मोनचे उत्पादन संतुलित ठेवण्यास मदत होते. मध्यम स्वरूपाच्या शारीरिक हालचालींमुळे तुमचे शरीर ऊर्जेचा अधिक प्रभावीपणे वापर करते आणि इन्सुलिनच्या कार्यामध्ये सुधारणा होते.