हिंदू धर्मात जन्मापासून मृत्यूपर्यंत अनेक प्रथा पाळल्या जातात. संस्कार केले जातात. मृत्यूनंतरही काही परंपरा प्रचलित आहेत. अंत्यसंस्काराच्या वेळी पांढरे कपडे घालण्यापासून ते अंत्ययात्रेत वापरल्या जाणाऱ्या प्रत्येक गोष्टीला महत्त्व आहे.
या पृथ्वीवर जन्माला आल्यानंतर मृत्यू निश्चित आहे. काहीजण लहान वयातच जगाचा निरोप घेतात, तर काहीजण शंभरी ओलांडल्यानंतर निधन पावतात. जन्माची आणि मृत्यूची तारीख, वेळ सांगता येत नाही. मृत्यू कधीही, कोणालाही येऊ शकतो. अनेकदा कोणतीही पूर्वसूचना न देता आपले प्रियजन आपल्याला सोडून जातात. मृत व्यक्तीला तसेच सोडून देता येत नाही. आत्मा सोडून गेलेल्या शरीरावर अंत्यसंस्कार केले जातात. अंत्यसंस्कार व्यवस्थित न केल्यास आत्म्याला शांती मिळत नाही, असे मानले जाते. हिंदू परंपरेत अंत्यसंस्काराला खूप महत्त्व आहे. प्रत्येक जातीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने अंत्यसंस्कार केले जातात. काहीजण मृतदेहाला अग्नी देतात, तर काहीजण मृतदेह दफन करतात. अंत्यसंस्कारापूर्वी अंत्ययात्रा काढली जाते. अंत्ययात्रेवेळी 'राम नाम सत्य है' असे म्हणत रामाचे स्मरण केले जाते. आज आपण अंत्ययात्रेवेळी रामाचे स्मरण का करतात, हे जाणून घेणार आहोत.
राम (Rama) नामाची तुलना कशाशीही होऊ शकत नाही. कलियुगात राम नामाच्या जपाला विशेष महत्त्व आहे. रामनामाचा जप केल्याने सर्व संकटे दूर होतात. केवळ जिवंतपणीच नाही, तर मृत्यूनंतरही आपल्यासोबत फक्त रामाचे नाव येते.
मनुष्याला एक ना एक दिवस मृत्यू (Death) येणार आहे हे माहीत असूनही, तो पैसा, मालमत्ता, पद आणि प्रतिष्ठेसाठी आयुष्यभर धावत राहतो. तो लोकांची फसवणूक करतो, विश्वासघात करतो, गुन्हे करतो. पण मृत्यूनंतर तो मालमत्ता, पैसा यासह सर्व काही सोडून जातो. जेव्हा एखादी व्यक्ती या पृथ्वीवर (Land) जन्माला येते, तेव्हा तिला पृथ्वीचे नियम पाळावे लागतात. जिवंतपणी तो देवाचे (God) नाव घेवो वा न घेवो, पण शेवटी तरी राम त्याच्यासोबत असावा.
'राम नाम सत्य है' याबद्दल पहिल्यांदा कोणी सांगितले? :
'राम नाम सत्य है' याचा अर्थ महाभारतातील मुख्य पात्र युधिष्ठिराने एका श्लोकात पहिल्यांदा सांगितला आहे. युधिष्ठिराने या श्लोकाद्वारे सांगितले आहे की, माणूस मरतो आणि त्याचे कुटुंबीय फक्त त्याच्या संपत्तीची इच्छा धरतात. आपण या जगात एकटेच आलो होतो आणि एकटेच जाणार आहोत. फक्त श्रीरामच सत्य आहेत, हे यातून सूचित होते.
या श्लोकाचा अर्थ काय? :
अहन्यहनि भूतानि गच्छन्तीह यमालयम् |
शेषाः स्थावरमिच्छन्ति किमाश्चर्यमतः परम् || महाभारत, वनपर्व ||
जेव्हा आपण मृतदेह स्मशानात घेऊन जातो, तेव्हा आपण रामाचे नाव घेतो. पण अंत्यसंस्कार करून परत आल्यावर आपण भ्रम आणि संपत्तीची चिंता करू लागतो. माणूस शाश्वत नाही हे माहीत असूनही आपण मालमत्तेची हाव धरतो, हा युधिष्ठिराच्या या श्लोकामागील उद्देश आहे.
'राम नाम सत्य है' म्हणण्याचा उद्देश काय? : 'राम नाम सत्य है' हे मृत व्यक्तीसाठी म्हटले जाते, असे आपण मानतो. पण त्याचा उद्देश तसा नाही. हे जिवंत माणसांना सांगितले जाते. रामाचे नाव सत्य आहे, बाकी सर्व मिथ्या आहे. एक ना एक दिवस तुम्हालाही मरायचे आहे. तुम्हाला तुमचे सर्व काही इथेच सोडून जायचे आहे, हे यातून सांगितले जाते. रामाचे नाव घेतल्याने आत्म्याला मुक्ती मिळते. आत्मा परमात्म्यात विलीन होतो. वाईट सवयींपासून मुक्ती मिळते. मृत व्यक्तीच्या कुटुंबाला मनःशांती मिळते, असा लोकांचा विश्वास आहे.


