- Home
- Utility News
- PF Money Investment Options : पीएफचा पैसा कुठे गुंतवावा? सुरक्षित आणि जास्त परतावा देणारे 7 पर्याय
PF Money Investment Options : पीएफचा पैसा कुठे गुंतवावा? सुरक्षित आणि जास्त परतावा देणारे 7 पर्याय
पीएफचा पैसा हातात आल्यावर तो कुठे गुंतवावा हा प्रश्न अनेकांना पडतो. बँक एफडी, पीपीएफ, पोस्ट ऑफिस योजना आणि आरबीआय बाँड्ससारख्या ७ सुरक्षित गुंतवणूक पर्यायांबद्दल सविस्तर जाणून घ्या.

भविष्यातील गरजांना प्राधान्य
नोकरदार वर्गासाठी निवृत्तीनंतरचे आयुष्य आर्थिक अडचणींविना जगणे हे एक मोठे स्वप्न असते. यासाठीच दर महिन्याला पगारातील काही रक्कम कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) खात्यात जमा केली जाते. अनेक वर्षे साठवलेले हे पैसे नोकरी बदलताना, निवृत्त होताना किंवा विशेष कारणांसाठी हातात येतात. तेव्हा हे पैसे बँकेतच ठेवावेत की कुठेतरी गुंतवावेत, असा प्रश्न अनेकांना पडतो. विशेषतः मध्यमवर्गीय लोकांसाठी पीएफची रक्कम म्हणजे आयुष्याभराची कमाई असते. त्यामुळे जास्त नफ्याच्या आशेने घाईघाईत गुंतवणूक करण्यापेक्षा पैशांची सुरक्षा आणि भविष्यातील गरजांना प्राधान्य देणे गरजेचे आहे.

पीएफचे पैसे गुंतवण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा!
हातात आलेले सगळे पैसे लगेच गुंतवण्याची गरज नाही. घराचा मासिक खर्च, वैद्यकीय गरजा, मुलांचे शिक्षण आणि गृहकर्ज यासारख्या जबाबदाऱ्यांचा आधी विचार करा. किमान ६ महिन्यांचा घरखर्च चालेल एवढा आपत्कालीन निधी बाजूला काढून ठेवणे कधीही चांगले. तसेच, जर तुमच्यावर जास्त व्याजदराचे पर्सनल लोन किंवा क्रेडिट कार्डचे कर्ज असेल, तर ते आधी फेडणे शहाणपणाचे ठरेल. कारण गुंतवणुकीतून मिळणाऱ्या परताव्यापेक्षा कर्जावरील व्याज जास्त असेल, तर गुंतवणुकीचा काहीच फायदा होणार नाही.
बँक फिक्स्ड डिपॉझिट (FD)
शेअर बाजाराचा धोका नको असणाऱ्यांसाठी बँक एफडी हा एक उत्तम पर्याय आहे. यात ठराविक काळासाठी पैसे गुंतवल्यास निश्चित व्याजदराने परतावा मिळतो.
विशेषतः निवृत्त झालेले आणि गुंतवणुकीत कोणताही धोका न पत्करणारे लोक या पर्यायाचा विचार करू शकतात. सर्व पैसे एकाच मुदतीसाठी न गुंतवता १, ३ आणि ५ वर्षांसाठी विभागून ठेवल्यास पैशांची तरलता (Liquidity) टिकून राहते.
मात्र, बँक एफडीतून मिळणाऱ्या व्याजावर प्राप्तिकर (Income Tax) लागू शकतो हे लक्षात ठेवा. तसेच, DICGC नियमानुसार एका बँकेत एका ठेवीदाराला मुद्दल आणि व्याजासह जास्तीत जास्त ५ लाख रुपयांपर्यंतच संरक्षण मिळते.
पोस्ट ऑफिसच्या बचत योजना
सुरक्षित गुंतवणूक शोधणाऱ्यांसाठी सरकारी हमी असलेल्या पोस्ट ऑफिसच्या योजना खूप फायदेशीर ठरतात. यामध्ये नॅशनल सेव्हिंग्स सर्टिफिकेट (NSC), किसान विकास पत्र (KVP), पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिट आणि मंथली इन्कम स्कीम (MIS) असे अनेक पर्याय उपलब्ध आहेत.
प्रत्येक योजनेचा कालावधी, व्याज मिळण्याची पद्धत आणि पैसे काढण्याचे नियम वेगवेगळे असतात. उदाहरणार्थ, ठराविक मुदतीनंतर एकरकमी परतावा हवा असल्यास नॅशनल सेव्हिंग्स सर्टिफिकेटचा विचार करता येईल. तर दर महिन्याला ठराविक उत्पन्नाची गरज असणाऱ्यांनी पोस्ट ऑफिसच्या मासिक उत्पन्न योजनेत गुंतवणूक करावी.
सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF)
दीर्घकालीन बचतीसाठी पीपीएफ हा एक उत्तम सरकारी पर्याय आहे. याचा १५ वर्षांचा कालावधी असल्याने निवृत्तीसाठी पैसे साठवू पाहणाऱ्यांना याचा मोठा फायदा होतो.
यात एका वर्षात किमान ५०० रुपये आणि जास्तीत जास्त १.५ लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येते. पीएफ खात्यातून मिळालेले पैसे थेट पीपीएफ खात्यात वळवता येत नाहीत. पण नियमांच्या अधीन राहून तुम्ही हातात आलेल्या पैशांमधून दरवर्षी यात गुंतवणूक करू शकता. सरकारकडून याच्या व्याजदरात वेळोवेळी बदल केला जातो.
रिझर्व्ह बँक सेव्हिंग बाँड्स
सुरक्षेला प्राधान्य देणारे गुंतवणूकदार रिझर्व्ह बँकेच्या फ्लोटिंग रेट सेव्हिंग बाँड्सचा (Floating Rate Savings Bonds) देखील विचार करू शकतात. याचा व्याजदर ठराविक काळानंतर बदलत असतो. हा सर्वसाधारणपणे दीर्घकालीन गुंतवणुकीचा प्रकार आहे, त्यामुळे ज्यांना पैशांची तातडीने गरज नाही त्यांनीच या पर्यायाचा वापर करणे योग्य ठरेल.
म्युच्युअल फंड आणि शेअर बाजार
महागाईपेक्षा जास्त परतावा हवा असल्यास तुम्ही म्युच्युअल फंडचा विचार करू शकता. पण यात गुंतवणूक करण्यापूर्वी जोखीम समजून घेणे महत्त्वाचे आहे. इक्विटी फंड, स्मॉल कॅप फंड किंवा मिड कॅप फंड्समधील गुंतवणुकीवर बाजारातील चढ-उतारानुसार नफा किंवा तोटा होऊ शकतो.
त्यामुळे पीएफचे संपूर्ण पैसे शेअर बाजाराशी संबंधित योजनांमध्ये गुंतवणे टाळा. जोखीम पत्करण्याची क्षमता बघूनच यातील काही रक्कम गुंतवावी. तसेच, गुंतवणुकीवर दरवर्षी १२ ते १५ टक्के परतावा मिळेलच असे गृहीत धरू नका.
नॅशनल पेन्शन सिस्टीम (NPS)
निवृत्तीनंतर दरमहा निश्चित उत्पन्न हवे असल्यास राष्ट्रीय पेन्शन योजना (NPS) हा एक चांगला पर्याय आहे. यामध्ये गुंतवणूकदाराच्या आवडीनुसार इक्विटी, सरकारी बाँड्स आणि कॉर्पोरेट डेब्टमध्ये पैशांची विभागणी केली जाते. शेअर बाजाराच्या स्थितीनुसार याचा परतावा बदलत असतो. यात गुंतवणूक करण्यापूर्वी पैसे काढण्याचे नियम आणि टॅक्स संदर्भातील अटी अगोदरच समजून घ्या.
सोने आणि रिअल इस्टेटमधील गुंतवणूक
अनेक लोक आपल्या पैशांचा काही भाग सोन्यात गुंतवण्यास पसंती देतात. मात्र, दागिने विकत घेताना घडणावळ आणि घसारा यांसारखे खर्च होतात. त्यामुळे गुंतवणुकीच्या उद्देशाने सोने खरेदी करताना सॉवरेन गोल्ड बाँड्स (SGB) किंवा गोल्ड ईटीएफ (Gold ETF) सारख्या पर्यायांचा विचार करा. सोन्याच्या किमतीतही चढ-उतार होत असतात.
तसेच, रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी मोठी रक्कम लागते. फक्त पीएफच्या पैशांवर प्रॉपर्टी घेण्याचा विचार करत असाल, तर स्टॅम्प ड्युटी, कायदेशीर कागदपत्रे, नोंदणी आणि देखभालीचा खर्च या गोष्टींचा विचार नक्की करा.
शेवटी गुंतवणूक कुठे करावी?
पीएफचे पैसे गुंतवण्यासाठी सर्वांना एकच नियम लागू होत नाही. तरुणांसाठी दीर्घकालीन गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध असतात. तर निवृत्तीच्या उंबरठ्यावर असणाऱ्यांनी सुरक्षित गुंतवणुकीला जास्त महत्त्व द्यावे. ज्यांना दरमहा उत्पन्नाची गरज आहे, ते त्यांच्या गरजेनुसार योग्य योजना निवडू शकतात.
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, आपत्कालीन निधी बाजूला ठेवून उरलेले पैसे बँक एफडी, पोस्ट ऑफिसच्या योजना, पीपीएफ आणि सरकारी बाँड्समध्ये आपल्या गरजेनुसार विभागून गुंतवणे हा एक उत्तम दृष्टिकोन ठरेल.
पीएफ म्हणजे तुमच्या अनेक वर्षांच्या कष्टाचे फळ आहे. त्यामुळे एकाच दिवसात जास्त नफा देणाऱ्या योजनेत पैसे गुंतवण्यापेक्षा सुरक्षा, तरलता, परतावा आणि टॅक्स या चार गोष्टींचा विचार करूनच निर्णय घ्या. यामुळे तुमचे भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित राहील.
