WhatsApp हा सोशल मीडियाचा सर्वाधिक लोकप्रिय प्लॅटफॉर्म आहे. WhatsApp च्या iOS आवृत्तीमध्ये आता वैयक्तिक अकाऊंटवरही कव्हर फोटो जोडण्याचे फीचर येत आहे. वैयक्तिक WhatsApp खात्यांसाठी आतापर्यंत ही सुविधा उपलब्ध नव्हती. 

(WhatsApp)कॅलिफोर्निया : आजच्या घडीला सोशल मीडिया हा एकमेकांना जोडण्याचे प्रभावी साधन बनले आहे. एकीकडे नातेसंबंध दृढ करण्याबरोबरच आपल्या जुन्या मित्रांना आणि आप्तांना कनेक्ट करण्याची किमचा या सोशल मीडियाने साधली आहे. यात फेसबुक, इन्स्टाग्रॅम, एक्स (ट्विटर), शेअर चॅट असे अनेक प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत. पण सर्वात प्रभावी प्लॅटफॉर्म आहे तो, WhatsApp. वापरकर्त्याच्या सोयीनुसार या प्लॅटफॉर्ममध्ये वेळोवेळी अपग्रेडेशन केले जाते आणि त्याद्वारे ते अधिक युझर फ्रेंडली केले जाते.

सतत अपडेट होत असलेल्या WhatsApp मध्ये लवकरच आणखी एक नवीन फीचर येणार आहे. रिपोर्टनुसार, फेसबुकप्रमाणेच कव्हर फोटो लावण्याची सोय WhatsApp च्या iOS व्हर्जनमध्ये येत आहे. म्हणजेच, आयफोन वापरकर्त्यांच्या WhatsApp मध्ये कव्हर फोटो फीचर सर्वात आधी दिसेल. त्यानंतर अँड्रॉइड आवृत्त्यांमध्ये हे फीचर येईल. WABetaInfo ने दिलेल्या रिपोर्टनुसार, WhatsApp च्या नवीन iOS 26.1.10.71 बीटा व्हर्जनमध्ये कव्हर फोटो फीचर दिसले आहे. WABetaInfo हे WhatsApp अपडेट्सबद्दल अचूक माहिती देणारे एक प्लॅटफॉर्म आहे.

नवीन व्हॉट्सॲप फीचर

मेटा (Meta) आता व्हॉट्सॲप खात्यांमध्ये प्रोफाइल कस्टमायझेशनचा विस्तार करत आहे. डीपी व्यतिरिक्त कव्हर फोटो आल्याने व्हॉट्सॲप खात्यांचे प्रोफाइल अधिक सुंदर दिसेल. सध्या फेसबुक आणि एक्स (X) वर असे कव्हर फोटोचे पर्याय उपलब्ध आहेत. सध्या व्हॉट्सॲप खात्यांमध्ये फक्त प्रोफाइल फोटोंना प्राधान्य दिले जाते. कव्हर फोटो आल्याने प्रोफाइल अधिक आकर्षक होईल.

प्रोफाइल इंटरफेसमध्ये कव्हर फोटोसाठी व्हॉट्सॲप एक विशेष विभाग तयार करेल. मिळालेल्या माहितीनुसार, हा कव्हर फोटो प्रोफाइलच्या सर्वात वर, म्हणजेच डीपी, नाव आणि बायोच्या वर दिसेल. बीटा आवृत्तीवरून असे सूचित होते की व्हॉट्सॲप या प्रोफाइल इंटरफेसचे डिझाइन सोपे ठेवेल. हे प्रोफाइल स्क्रीनवर कोणताही परिणाम करणार नाही. सध्या जसे प्रोफाइल फोटो एडिट किंवा बदलले जातात, त्याचप्रमाणे व्हॉट्सॲपच्या सेटिंग्जमध्ये जाऊन प्रोफाइल इंटरफेस ॲक्सेस करावा लागेल. त्यानंतर कॅमेऱ्यातून थेट किंवा फोटो लायब्ररीमधून फोटो निवडता येईल. या फोटोची पोझिशन ॲडजस्ट करून तो सेट करता येईल.

पूर्वी फक्त बिझनेस खात्यांसाठी

व्हॉट्सॲप कव्हर फोटो हे व्हॉट्सॲपसाठी काही नवीन नाही. हे फीचर व्हॉट्सॲप बिझनेस खात्यांमध्ये आधीपासूनच उपलब्ध आहे. ब्रँडिंग, लोगो आणि इतर महत्त्वाची माहिती हायलाइट करण्यासाठी लोक व्हॉट्सॲप बिझनेसमध्ये कव्हर इमेज फीचर वापरतात. परंतु, वैयक्तिक व्हॉट्सॲप खात्यांमध्ये कव्हर फोटो समाविष्ट करण्याचे फीचर नवीन आहे. फेसबुकवर प्रोफाइलच्या सर्वात वर जसा कव्हर फोटो येतो, त्याचप्रमाणे व्हॉट्सॲपमध्येही कव्हर फोटो दिसेल. व्हॉट्सॲप कव्हर फोटो खातेधारकांना आणि त्यांच्या प्रोफाइलला भेट देणाऱ्या इतर लोकांना पाहता येईल.