Alpine Divorce: सोशल मीडियावर रोज नवीन ट्रेंड्स आणि हॅशटॅग येत असतात. पण सध्या 'अल्पाइन डिव्होर्स' (Alpine Divorce) हा शब्द खूप चर्चेत आहे. हा काही गंमतीचा विषय नाही, तर नात्यांमधल्या क्रूरपणा आणि बेजबाबदारपणाचं प्रतीक म्हणून याकडे पाहिलं जातंय.

सोशल मीडियावर रोज नवीन ट्रेंड्स आणि हॅशटॅग येत असतात. पण सध्या 'अल्पाइन डिव्होर्स' (Alpine Divorce) हा शब्द खूप चर्चेत आहे. हा काही गंमतीचा विषय नाही, तर नात्यांमधल्या क्रूरपणा आणि बेजबाबदारपणाचं प्रतीक म्हणून याकडे पाहिलं जातंय. जेव्हा कपल्स किंवा प्रेमी ट्रेकिंगला किंवा डोंगर चढायला जातात, तेव्हा पुरुष आपल्या पार्टनरला अर्ध्यातच सोडून पुढे निघून जातो. याच प्रकाराला 'अल्पाइन डिव्होर्स' असं म्हटलं जात आहे.

'अल्पाइन डिव्होर्स' हा काही कायदेशीर घटस्फोट नाही. या शब्दाचा उगम रॉबर्ट बार यांच्या १८९३ सालच्या 'ॲन अल्पाइन डिव्होर्स' नावाच्या एका लघुकथेतून झाला आहे. स्विस आल्प्स पर्वतरांगेत आपल्या पत्नीची हत्या करण्याची योजना आखणाऱ्या एका पतीची ही कथा आहे. आज हा शब्द हत्येसाठी नाही, तर पार्टनरला धोकादायक परिस्थितीत एकटं सोडून देण्याच्या मानसिकतेसाठी वापरला जातो.

हा ट्रेंड व्हायरल कसा झाला?

टिकटॉक आणि इन्स्टाग्रामवर शेअर झालेल्या काही व्हिडिओंमुळे ही चर्चा सुरू झाली. अनेक महिलांनी असे व्हिडिओ शेअर केले, ज्यात डोंगर चढताना त्यांचा पार्टनर वेगामुळे त्यांना मैलोन् मैल मागे सोडून पुढे निघून गेला. जिथे जंगली प्राणी किंवा खराब हवामानाचा धोका असतो, अशा अनोळखी ठिकाणी आपला सांभाळ करणाराच आपल्याला सोडून जातो, हे किती वेदनादायी आहे, हे या महिलांनी आपल्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे.

हा फक्त 'स्पीड'चा प्रॉब्लेम आहे का?

ट्रेकिंगमध्ये प्रत्येकाचा वेग वेगवेगळा असू शकतो, हे खरं आहे. पण 'अल्पाइन डिव्होर्स' हा वेगाबद्दल नाही, तर जबाबदारीबद्दल आहे. डोंगर किंवा निर्जन जंगलात एकटं पडणं जीवावर बेतू शकतं. अशावेळी पार्टनरला मदत करण्याऐवजी फक्त स्वतःचं ध्येय गाठणं हे नात्यातल्या दुराव्याचं लक्षण आहे, असं रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. तज्ज्ञ याला एक 'रेड फ्लॅग' म्हणजेच धोक्याची सूचना मानत आहेत. कठीण परिस्थितीत जोडीदाराला सोडून जाणारी व्यक्ती आयुष्यभर साथ देऊ शकत नाही, असं अनेकजण सोशल मीडियावर लिहित आहेत.

धोकादायक वास्तव

सोशल मीडियावरील विनोदांपलीकडे, या ट्रेंडमुळे खऱ्या आयुष्यात दुर्घटनाही घडल्या आहेत. याचंच एक उदाहरण म्हणजे जानेवारी २०२५ मध्ये ऑस्ट्रियातील ग्रोसग्लॉक्नर पर्वतरांगेत घडलेली घटना. ट्रेकिंगला गेलेल्या एका तरुणीचा थंडीमुळे मृत्यू झाला. अनुभवी गिर्यारोहक असलेल्या तिच्या प्रियकराने, कमी वेगाने चालणाऱ्या प्रेयसीला एकटं सोडून पुढे कूच केली. यामुळे थंडीने गारठून तिचा मृत्यू झाला. नंतर तपासात असंही समोर आलं की, या तरुणाने आधीही एका दुसऱ्या मुलीला असंच डोंगरावर एकटं सोडलं होतं.

पुरुष असं का करतात?

मानसशास्त्रज्ञांच्या मते, पुरुषांमधील अति-स्पर्धात्मक वृत्ती आणि 'इगो' यामागे असू शकतो. पार्टनरच्या सुरक्षेपेक्षा स्वतःच्या कामगिरीला महत्त्व देणाऱ्या अशा लोकांना नात्यापेक्षा त्यांचं ध्येय मोठं वाटतं. असा अनुभव आलेल्या महिला सांगतात, 'तो मला पार्टनर म्हणून नाही, तर त्याच्या कामगिरीची साक्षीदार म्हणून बघत होता.'

'अल्पाइन डिव्होर्स' हा फक्त ट्रेकिंगपुरता मर्यादित विषय नाही. नात्यामध्ये एकमेकांची काळजी आणि संरक्षण किती महत्त्वाचं आहे, याची आठवण हा ट्रेंड करून देतो. जोडीदाराला निर्जन डोंगरावर एकटं सोडून जाणारी व्यक्ती तुमच्या आयुष्यात किंवा तुमच्या आनंदात फारसा रस घेत नसेल, हाच बोध यातून मिळतो, असं रिपोर्ट सांगतात.