सुकन्या समृद्धी योजना (SSY) ही मुलीच्या भविष्यासाठी एक उत्तम गुंतवणूक योजना असून, सध्या 8.2% व्याजदर देत आहे. 50 लाख रुपयांचा निधी उभारण्यासाठी, पालकांना वार्षिक सुमारे 1.11 लाख रुपये गुंतवावे लागतील. ही योजना करसवलत आणि सुरक्षित परताव्यामुळे मुलीचे भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करते.
मुलीच्या भविष्यासाठी आर्थिक नियोजन करताना सुकन्या समृद्धी योजना (SSY) हा एक महत्त्वाचा पर्याय मानला जातो. केंद्र सरकारच्या या योजनेत मुलीच्या शिक्षणासाठी आणि भविष्यातील गरजांसाठी मोठी रक्कम जमा करता येते. सध्या या योजनेवर 8.2 टक्के वार्षिक चक्रवाढ व्याज दिले जात असल्याने दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी ती आकर्षक ठरत आहे.

खाते कधी उघडता येते?
या योजनेत मुलीचे वय 10 वर्षांपेक्षा कमी असताना खाते उघडता येते. एका आर्थिक वर्षात किमान 250 रुपये आणि कमाल 1.5 लाख रुपये जमा करण्याची परवानगी आहे. खाते उघडल्यानंतर 15 वर्षे गुंतवणूक करावी लागते, तर खात्याची मुदत 21 वर्षांची असते. अनेक पालकांच्या मनात मुलीच्या नावावर 50 लाख रुपयांचा निधी तयार करण्याचा प्रश्न असतो. आर्थिक गणितानुसार दरवर्षी केवळ 50 हजार रुपये जमा केल्यास मुदतपूर्तीवेळी सुमारे 23.94 लाख रुपयांचा निधी तयार होऊ शकतो. त्यामुळे 50 लाखांचा टप्पा गाठण्यासाठी अधिक मोठी वार्षिक गुंतवणूक आवश्यक ठरते.
एक लाख रुपयांपेक्षा जास्त ठेव ठेवावी
तज्ज्ञांच्या मते, सुमारे 50 लाख रुपयांचा निधी तयार करण्यासाठी वार्षिक गुंतवणुकीची रक्कम एक लाख रुपयांपेक्षा जास्त ठेवावी लागू शकते. काही गणनांनुसार दरवर्षी अंदाजे 1.11 लाख रुपयांची गुंतवणूक केल्यास 21 वर्षांनंतर जवळपास 50 लाख रुपयांचा फंड तयार होऊ शकतो. या योजनेचा आणखी एक मोठा फायदा म्हणजे करसवलत. सुकन्या समृद्धी योजनेतील गुंतवणुकीवर आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत सूट मिळते. तसेच मिळणारे व्याज आणि मुदतपूर्तीची रक्कमही करमुक्त असल्याने ही योजना ‘EEE’ श्रेणीत मोडते.
सुरक्षित निधी तयार करा
मुलीच्या उच्च शिक्षणासाठी किंवा लग्नासाठी सुरक्षित निधी तयार करण्याचा विचार करणाऱ्या पालकांसाठी सुकन्या समृद्धी योजना हा विश्वासार्ह पर्याय मानला जातो. नियमित आणि शिस्तबद्ध गुंतवणूक केल्यास दीर्घ कालावधीत मोठी रक्कम जमा होऊ शकते आणि मुलीच्या भविष्यातील आर्थिक गरजा पूर्ण करण्यास मदत मिळू शकते.


