What IMD's Weather Warnings Mean : पावसाळ्यात हवामान खात्याकडून जाहीर होणारे 'रेड', 'ऑरेंज' आणि 'येलो' अलर्टचा अर्थ, त्यामागचा धोका आणि खबरदारीच्या उपाययोजना समजून घेणे महत्त्वाचे आहे.
मुंबई : पावसाळ्याच्या काळात हवामान खात्याच्या अलर्टबाबत आपण नेहमी वाचतो. "रेड अलर्ट", "ऑरेंज अलर्ट", किंवा "येलो अलर्ट" जाहीर झाला आहे. पण हे वेगवेगळे रंग कोड्स नेमके काय दर्शवतात? त्यामागचा अर्थ, त्याचा आपल्यावर काय परिणाम होतो, आणि प्रशासन व नागरिकांनी या अलर्टनुसार कोणती खबरदारी घ्यावी हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे.
भारतीय हवामान विभाग (IMD) विविध हवामानाशी संबंधित धोक्यांच्या सूचनेसाठी चार रंग-कोडचा वापर करतो. ग्रीन, येलो, ऑरेंज आणि रेड. हे अलर्ट हवामान स्थिती आणि संभाव्य आपत्ती यांचं गांभीर्य लक्षात घेऊन दिले जातात.
रेड अलर्ट (Red Alert) “सर्वाधिक धोका, अत्यंत सतर्कता आवश्यक!”
रेड अलर्ट हा सर्वात गंभीर हवामान इशारा मानला जातो. जर एखाद्या भागात अतिमुसळधार पाऊस, अतिवृष्टी किंवा ढगफुटीसारखी घटना होण्याची शक्यता असेल, तर हवामान विभाग रेड अलर्ट जारी करतो.
रेड अलर्ट याचा अर्थ
अत्यधिक मुसळधार पाऊस होणार असल्याची शक्यता.
पूर, भूस्खलन, झाडे कोसळणे, वाहतूक ठप्प होणे यासारख्या घटना संभव्य.
नागरिकांना घरातच थांबण्याचा सल्ला.
प्रशासनाला आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्याचे निर्देश.
दैनंदिन जीवन पूर्णपणे विस्कळीत होण्याची शक्यता.
रेड अलर्ट असतो तेव्हा त्याचा भाग म्हणजे संभाव्य जीवित आणि मालमत्तेच्या मोठ्या नुकसानीची शक्यता. म्हणूनच, सरकार आणि प्रशासनाने वेळेवर योग्य उपाययोजना करणं अत्यावश्यक असतं.
ऑरेंज अलर्ट (Orange Alert) “सतर्कतेचा इशारा”
ऑरेंज अलर्ट म्हणजे मुसळधार पावसाचा धोका असून तो थोड्या वेळात किंवा एका विशिष्ट भागात घडू शकतो.
ऑरेंज अलर्ट याचा अर्थ
मध्यम ते अत्यंत जोरदार पावसाची शक्यता.
वीजपुरवठा, वाहतूक यंत्रणा, जलनिचरा यांवर परिणाम होण्याची शक्यता.
नागरिकांना अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर न पडण्याचा सल्ला.
प्रशासनाने सावधगिरी बाळगणे आवश्यक.
ऑरेंज अलर्ट हा संकटाच्या तयारीचा इशारा मानला जातो. तो म्हणजे धोका घोंगावत आहे, पण त्याची तीव्रता रेड अलर्टसारखी गंभीर नाही.
येलो अलर्ट (Yellow Alert) – “सावध राहा!”
येलो अलर्ट म्हणजे हवामान विभागाचा प्रारंभिक इशारा की, हवामान बदलाच्या शक्यतेमुळे जनजीवनावर परिणाम होऊ शकतो.
येलो अलर्ट याचा अर्थ
काही भागांत मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता.
नागरिकांनी सामान्य खबरदारी घ्यावी.
प्रशासनाने हलकी तयारी ठेवावी.
वाहतूक, वीज, शालेय/कार्यालयीन कामांवर थोडासा परिणाम होऊ शकतो.
येलो अलर्ट म्हणजे धोका कमी पण दुर्लक्षित करू नये असा इशारा.
ग्रीन अलर्ट (Green Alert) “सर्व काही सामान्य”
ग्रीन अलर्ट असतो तेव्हा हवामान सामान्य असतं. कोणताही विशेष धोका नसतो, आणि सामान्य जीवनक्रम चालू ठेवण्यास कोणतीही अडचण नसते.
ग्रीन अलर्ट याचा अर्थ
पावसाची शक्यता नाही किंवा अत्यंत कमी.
कोणताही हवामानाशी संबंधित अलर्ट नाही.
नागरिक आणि प्रशासन सामान्य पद्धतीने कार्य करू शकतात.
पावसाच्या अंदाजातील महत्त्वाचे शब्द आणि त्यांचे अर्थ
हवामान विभाग पावसाचा अंदाज व्यक्त करताना वेगवेगळ्या संज्ञा वापरतो. त्याचा अर्थ खालीलप्रमाणे.
पावसाचा प्रकार पावसाचे प्रमाण (24 तासांत)
अति हलका पाऊस (Very Light Rain) 0.1 – 2.4 मिमी
हलका पाऊस (Light Rain) 2.5 – 15.5 मिमी
मध्यम पाऊस (Moderate Rain) 15.6 – 64.4 मिमी
जोरदार पाऊस (Heavy Rain) 64.5 – 115.5 मिमी
अति जोरदार पाऊस (Very Heavy) 115.6 – 204.4 मिमी
अत्यधिक जोरदार (Extremely Heavy) 204.5 मिमी किंवा त्यापेक्षा अधिक
याकडे विशेष लक्ष द्या
जोरदार पाऊस: प्रवास टाळा, वाहतूक ठप्प होऊ शकते.
अति जोरदार व अत्यधिक जोरदार पाऊस: घरात राहणेच उत्तम. पुराचा, भूस्खलनाचा धोका वाढतो.
हवामान खात्याच्या अधिकृत अॅप, वेबसाइट किंवा स्थानिक प्रशासनाकडून मिळणाऱ्या माहितीवर विश्वास ठेवावा.
हवामान अलर्ट म्हणजे काय घ्यावं आणि काय टाळावं हे समजून घेणं महत्त्वाचं
भारतीय हवामान विभागाकडून दिले जाणारे रंगीत अलर्ट हे केवळ माहितीपुरते नसून आपत्ती व्यवस्थापन, वैयक्तिक सुरक्षितता आणि प्रशासनाच्या तयारीचा भाग असतात. त्यामुळे हे अलर्ट गांभीर्याने घेणं आपल्यासाठी, आपल्या कुटुंबासाठी आणि समाजासाठी अत्यावश्यक आहे.


