- Home
- Utility News
- Warranty vs Guarantee : वॉरंटी आणि गॅरंटीमध्ये नेमका फरक काय? वस्तू खरेदी करताना काय तपासाल?
Warranty vs Guarantee : वॉरंटी आणि गॅरंटीमध्ये नेमका फरक काय? वस्तू खरेदी करताना काय तपासाल?
आपण टीव्ही, फ्रीज, फोन किंवा वॉशिंग मशीन खरेदी करायला जातो, तेव्हा दुकानदार आपल्याला एक-दोन वर्षांची वॉरंटी किंवा गॅरंटी देतात. पण या दोन्हीमध्ये नेमका फरक काय असतो? नवीन वस्तू खरेदी करताना आपण कोणती काळजी घेतली पाहिजे?

वॉरंटी म्हणजे काय?
वॉरंटी (Warranty) म्हणजे वस्तू खरेदी केल्यानंतर ठराविक काळासाठी कंपनीने दिलेले वचन. या काळात वस्तूत काही बिघाड झाल्यास, कंपनी ती मोफत दुरुस्त करून देते. उदाहरणार्थ, तुमच्या टीव्हीवर दोन वर्षांची वॉरंटी असेल आणि त्यात मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट आला, तर कंपनी तो मोफत दुरुस्त करेल किंवा खराब पार्ट बदलेल. पण लक्षात ठेवा, प्रत्येक समस्येवर मोफत सर्व्हिस मिळत नाही. वस्तू हातातून पडून फुटली, पाण्यात पडली किंवा ग्राहकाच्या चुकीमुळे खराब झाली, तर ती वॉरंटीमध्ये कव्हर होत नाही.

गॅरंटी म्हणजे काय?
गॅरंटी (Guarantee) म्हणजे वस्तूच्या दर्जा आणि कामगिरीबाबत कंपनीने दिलेली खात्री. गॅरंटी असलेली वस्तू ठराविक वेळेत खराब झाली, तर कंपनी तुम्हाला थेट नवीन वस्तू देते (Replacement) किंवा तुमचे पैसे परत करते (Refund). वॉरंटी म्हणजे फक्त दुरुस्ती आणि गॅरंटी म्हणजे नवीन वस्तू, असा सरसकट नियम नसतो. या शब्दांचे अर्थ आणि फायदे कंपनीच्या अटींवर अवलंबून असतात. त्यामुळे फक्त नावावर जाऊ नका, नियम नक्की वाचा.
वस्तू खरेदी करताना काय तपासाल?
वस्तू खरेदी करण्यापूर्वी काही गोष्टी नक्की तपासा. वॉरंटी किंवा गॅरंटी किती महिन्यांची किंवा वर्षांची आहे, हे आधी विचारा. ही वॉरंटी संपूर्ण वस्तूवर आहे की फक्त मोटर, कॉम्प्रेसर किंवा बॅटरीवर आहे, हे स्पष्ट करून घ्या. सुटे भाग, सर्व्हिस चार्ज आणि ट्रान्सपोर्टचा खर्च मोफत आहे का, हेही विचारा. कोणत्या कारणांमुळे वॉरंटी रद्द होऊ शकते, हे आधीच वाचा. खरेदीचे बिल, वॉरंटी कार्ड आणि ऑनलाइन खरेदीचे डिटेल्स नेहमी जपून ठेवा.
जास्त पैसे देऊन 'एक्स्टेंडेड वॉरंटी' घेत असाल, तर त्याचे फायदे आणि नियम तपासा. भारत सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागाच्या सूचनेनुसार, वस्तूचा दर्जा, किंमत आणि गॅरंटीचे नियम समजून घेतल्यानंतरच खरेदीचा निर्णय घ्या.
समस्या आल्यास काय करावे?
वस्तूत बिघाड झाल्यास सर्वात आधी कंपनीच्या अधिकृत सर्व्हिस सेंटरशी संपर्क साधा. तक्रार क्रमांक, बिल आणि दुरुस्तीचे डिटेल्स जपून ठेवा. जर प्रश्न सुटला नाही, तर तुम्ही 'नॅशनल कन्झ्युमर हेल्पलाइन' १९१५ (1915) वर तक्रार करू शकता. वॉरंटी आहे की गॅरंटी, यापेक्षा त्याअंतर्गत आपल्याला कोणते फायदे मिळतात, हे जास्त महत्त्वाचे आहे.







