व्हॉल्वोने त्यांच्या लोकप्रिय XC60 आणि XC90 या कार्सचे नवीन प्लग-इन हायब्रिड मॉडेल्स ग्लोबल मार्केटमध्ये लाँच केले आहेत. मोठ्या बॅटरीमुळे या कार्सना अनुक्रमे २०० किमी आणि १६२ किमीची इलेक्ट्रिक रेंज मिळते. ४६१ bhp पॉवर देणाऱ्या या कार्स सध्या भारतात उपलब्ध नाहीत.

मुंबई : व्हॉल्वोने त्यांच्या नवीन प्लग-इन हायब्रिड SUV कार्स मोठ्या बॅटरी आणि दमदार इलेक्ट्रिक रेंजसह आणल्या आहेत. कंपनीने त्यांच्या लोकप्रिय XC60 आणि XC90 या मॉडेल्सचे अपडेटेड प्लग-इन हायब्रिड व्हर्जन्स जागतिक बाजारात सादर केले आहेत. या दोन्ही SUV मध्ये आधीच्या मॉडेल्सपेक्षा मोठी बॅटरी दिली आहे. त्यामुळे पेट्रोल इंजिन न वापरताही तुम्ही या कार्समधून लांबचा प्रवास करू शकता.

२०० किलोमीटरपर्यंतची इलेक्ट्रिक रेंज

XC60 प्लग-इन हायब्रिड कार सिंगल चार्जवर फक्त इलेक्ट्रिक पॉवरवर २०० किलोमीटरपर्यंत धावू शकते. तर, XC90 प्लग-इन हायब्रिडची इलेक्ट्रिक रेंज १६२ किलोमीटर इतकी आहे. याआधी दोन्ही मॉडेल्समध्ये १९ kWh ची बॅटरी होती. आता ती वाढवून ४१.२ kWh इतकी करण्यात आली आहे. यापैकी जवळपास ३७.९ kWh बॅटरी वापरता येते. सोप्या भाषेत सांगायचं तर, बॅटरीची क्षमता आता दुप्पट झाली आहे.

रेंजमध्ये मोठी वाढ

जुन्या XC60 प्लग-इन हायब्रिडची इलेक्ट्रिक रेंज फक्त ७९ किलोमीटर होती. नवीन मॉडेलमध्ये ती थेट २०० किलोमीटरवर गेली आहे. म्हणजेच रेंजमध्ये १२१ किलोमीटरची वाढ झाली आहे. दुसरीकडे, XC90 प्लग-इन हायब्रिडची रेंज आधी ६६ किलोमीटर होती, ती आता १६२ किलोमीटर झाली आहे. रोजच्या ऑफिसच्या प्रवासासाठी किंवा शहरातील छोट्या कामांसाठी तुम्हाला पेट्रोल इंजिनची गरजच पडणार नाही, एवढी ही रेंज पुरेशी आहे.

४६१ bhp ची जबरदस्त पॉवर

या दोन्ही SUV मध्ये २.० लिटर, ४-सिलेंडर पेट्रोल इंजिन दिलं आहे. हे इंजिन पुढच्या चाकांना पॉवर देतं, तर मागच्या बाजूला असलेली इलेक्ट्रिक मोटर ऑल-व्हील ड्राईव्ह (AWD) सिस्टीम चालवते. XC60 प्लग-इन हायब्रिड ४६१ bhp पॉवर आणि ७५९ Nm टॉर्क जनरेट करते. ही कार अवघ्या ४.८ सेकंदात ० ते १०० किमी प्रति तास वेग पकडते. XC90 प्लग-इन हायब्रिडसुद्धा ४६१ bhp पॉवर देते, पण तिचा टॉर्क ७५१ Nm आहे. हिला ० ते १०० किमीचा वेग पकडायला ५.२ सेकंद लागतात.

भारतात कधी येणार?

व्हॉल्वो XC60 आणि XC90 चे हे नवीन प्लग-इन हायब्रिड मॉडेल्स सध्या भारतात विक्रीसाठी उपलब्ध नाहीत. सध्या भारतात मिळणाऱ्या XC60 आणि XC90 मॉडेल्समध्ये ४८V माईल्ड-हायब्रिड सिस्टीम असलेलं २.० लिटर इंजिन मिळतं. हे इंजिन २५० bhp पॉवर आणि ३६० Nm टॉर्क देतं. भारतात XC60 ची एक्स-शोरूम किंमत ₹७०.९० लाख आणि XC90 ची किंमत ₹९८.८० लाखांपासून सुरू होते.