महागड्या शोभेच्या वस्तू विकत घेण्याऐवजी फोटो फ्रेम्स वापरा. लिव्हिंग रूम, हॉल किंवा बेडरूम... कुठेही लावा, तुमच्या घराला एक सुपर क्लासी लुक मिळेल.

Home Decor with photo frame: फोटो म्हणजे काय, तर जुन्या आठवणींना उजाळा देणारी एक गोष्ट. पण हेच फोटो तुमच्या घराला एक नवीन आणि स्टायलिश लुक देऊ शकतात, तेही जास्त खर्च न करता. एका योग्य फोटो फ्रेममुळे तुमचं घर एखाद्या आर्ट गॅलरीसारखं दिसू शकतं. तुम्हालाही कोणताही मोठा खर्च न करता घराला एक लक्झरी फील द्यायचा असेल, तर या आयडिया खूप कामी येतील.

घरातच बनवा 'गॅलरी वॉल'

हॉल किंवा रूममधल्या एखाद्या रिकाम्या भिंतीला तुम्ही 'गॅलरी वॉल' बनवू शकता. यासाठी वेगवेगळ्या आकाराच्या फ्रेम्स एकत्र लावा, जसं या फोटोत दाखवलं आहे. तुम्हाला मॉडर्न लुक हवा असेल, तर काळ्या-पांढऱ्या (Black & White) रंगाच्या फ्रेम्स निवडा. तर विंटेज आणि रेट्रो लुकसाठी लाकडी (Wooden) फोटो फ्रेम्स हा एक उत्तम पर्याय आहे.

जिन्याच्या भिंतीचा वापर

तुमचं घर दुमजली असेल, तर जिन्याच्या बाजूची भिंत सजावटीसाठी एकदम परफेक्ट आहे. इथे तुम्ही जिन्याच्या उताराप्रमाणे तिरकस पॅटर्नमध्ये फोटो फ्रेम लावू शकता. यामुळे घराला एक क्लासी आणि शानदार लुक येतो. इथे तुम्ही जुने, फॅमिली टाइमलाइन किंवा मुलांचे फोटो लावू शकता.

लिव्हिंग रूम डेकोरेशन

लिव्हिंग रूममध्ये एकदम स्वच्छ आणि टापटीप सजावट हवी असेल, तर ग्रिड ले-आउट ट्राय करा. यासाठी ६ ते ९ फोटो फ्रेम्सचा सेट अगदी परफेक्ट आहे. या फ्रेम्स तुम्ही चौकोनी किंवा आयताकृती आकारात लावू शकता. सोफ्याच्या वरच्या बाजूला हे खूपच क्लासी दिसतं.

दरवाजा फ्रेम डेकोरेशन

घरात जास्त जागा नसेल, तर भिंतीऐवजी तुम्ही रूमच्या दारावरही सजावट करू शकता. यासाठी हँगिंग फोटो फ्रेम्सची गरज लागेल. या फ्रेम्स तुम्हाला ऑनलाइन किंवा बाजारात २०० ते ५०० रुपयांपर्यंत सहज मिळतील. इथे तुम्ही फॅमिली किंवा स्वतःचे फोटो लावू शकता. ही आयडिया युनिक आहे आणि जागाही वाचवते.

हँगिंग फोटो फ्रेम

तुमची रूम किंवा हॉल लहान असेल आणि शोभेच्या वस्तू (Decorative Showpiece) ठेवायला जागा नसेल, तर तुम्ही मिरर स्टाइल हँगिंग फोटो फ्रेम्स वापरू शकता. कमी जागेत फॅन्सी आणि डेकोरेटिव्ह लुक देण्यासाठी ही आयडिया सध्या खूप ट्रेंडमध्ये आहे.