टाटा मोटर्स आता हायब्रीड कार मार्केटमध्ये उतरत आहे. कंपनी लवकरच आपल्या तीन प्रसिद्ध गाड्यांचे हायब्रीड व्हेरिएंट लाँच करणार आहे. यामुळे मारुती सुझुकीसारख्या कंपन्यांची चिंता वाढली आहे.
मुंबई (२७ जुलै): भारतीय कार बाजारात टाटा मोटर्स सध्या चांगलाच धुमाकूळ घालत आहे. गेल्या १५ वर्षांत मोठे बदल करत आणि नवनवीन गाड्या आणत टाटाने मार्केटमध्ये आपलं स्थान पक्कं केलं आहे. इलेक्ट्रिक गाड्यांच्या सेगमेंटमध्ये तर टाटा आज भारतात नंबर वन ब्रँड आहे. आता कंपनी हायब्रीड गाड्यांच्या मार्केटमध्ये धमाकेदार एन्ट्री करत आहे. टाटा मोटर्स आपल्या तीन लोकप्रिय गाड्या हायब्रीड व्हेरिएंटमध्ये लाँच करणार आहे. यातून टाटाने सुरक्षिततेसोबतच जास्त मायलेज आणि कमी मेंटेनन्सलाही महत्त्व दिल्याचं दिसतंय.
मारुती सुझुकीसह इतर कंपन्यांचं टेन्शन वाढलं
टाटा मोटर्स सध्या पेट्रोल, सीएनजी आणि इलेक्ट्रिक गाड्या विकते. आता कंपनी हायब्रीड मार्केटमध्येही उतरत आहे. हायब्रीड सेगमेंटमध्ये सध्या मारुती सुझुकी, टोयोटा आणि ह्युंदाई या कंपन्या पुढे आहेत. या तिन्ही ब्रँड्सच्या हायब्रीड गाड्यांची विक्री चांगली होत आहे. आता टाटा आपल्या ग्राहकांना हायब्रीडचा पर्याय देऊन व्यवसायाचा विस्तार करत आहे. टाटाच्या या निर्णयामुळे मारुती सुझुकी, टोयोटा आणि ह्युंदाईचं टेन्शन वाढलं आहे. कारण पेट्रोल, सीएनजी आणि ईव्ही मार्केटमध्ये टाटा हळूहळू सगळ्यांना मागे टाकत आहे. आता हायब्रीड मार्केटमध्येही टाटा नवीन धमाका करण्याच्या तयारीत असल्याने स्पर्धकांची चिंता वाढली आहे.
या तीन गाड्या हायब्रीडमध्ये येणार
पहिल्या टप्प्यात टाटा आपल्या तीन गाड्या हायब्रीड व्हेरिएंटमध्ये लाँच करणार आहे. यामध्ये टाटा सिएरा, टाटा हॅरियर आणि टाटा सफारी या गाड्यांचा समावेश आहे. यानंतर टाटा कर्व्ह (Curvv) सारख्या इतर गाड्याही हायब्रीड पर्यायात आणल्या जातील. याची तयारी आधीच सुरू झाली असून लवकरच याबाबत अधिकृत माहिती समोर येईल.
पेट्रोल महाग झालंय, तर इलेक्ट्रिक गाड्यांना चार्जिंगची समस्या आणि प्रवासात चार्जिंग संपण्याची भीती वाटते. त्यामुळेच पेट्रोल आणि इलेक्ट्रिक मोटर अशा दोन्हीवर चालणाऱ्या हायब्रीड गाड्यांकडे लोकांचा कल वाढतोय. जास्त मायलेज आणि चार्जिंगचं फारसं टेन्शन नसल्यामुळे हायब्रीड गाड्या भविष्यात एक महत्त्वाचा पर्याय म्हणून समोर येतील. आता टाटासुद्धा याच मार्केटमध्ये उतरत आहे.
टाटाची हायब्रीड टेक्नॉलॉजी कशी असेल?
टाटा मोटर्सच्या हायब्रीड कारबद्दल उत्सुकता वाढत आहे. कंपनी प्लग-इन हायब्रीड (Plug-in Hybrid) आणणार की स्ट्रॉंग हायब्रीड (Strong Hybrid), की दोन्ही व्हेरिएंटमध्ये गाडी उपलब्ध होईल, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. किंवा टाटा काहीतरी नवीन टेक्नॉलॉजी आणून सगळ्यांना चकित करणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. हायब्रीड गाड्यांमुळे प्रदूषण कमी होतं आणि मायलेजही चांगलं मिळतं. शहरातल्या रोजच्या वापरासाठी किंवा लांबच्या प्रवासासाठी, दोन्हीसाठी या गाड्या एक उत्तम पर्याय ठरतात.


