उन्हाळ्यात झाडांची काळजी कशी घ्यायची? झाडांना पाणी देण्याची योग्य पद्धत कोणती? झाडांची मुळं मजबूत करून त्यांना हिरवंगार ठेवणाऱ्या नैसर्गिक आणि थंड खतांबद्दल जाणून घ्या.

एप्रिल-मे महिन्यातील कडक ऊन झाडांसाठी खूप त्रासदायक ठरतं. तीव्र सूर्यप्रकाश आणि गरम हवेमुळे झाडं अनेकदा खराब होतात. जमिनीवर लावलेल्या झाडांपेक्षा कुंड्यांमध्ये लावलेल्या झाडांचं जास्त नुकसान होतं. कुंड्यांमधील ओलावा आणि पाणी संपल्यामुळे मुळं कमकुवत होऊन सुकतात. जसं माणसांना उन्हात फिरणं कठीण होतं, तसंच झाडांचंही आहे. जर तुम्हाला बागकामाची (Gardening) आवड असेल, तर हा लेख तुमच्यासाठीच आहे. इथे आम्ही उन्हाळ्यात झाडांची काळजी घेण्यासाठी काही खास टिप्स आणि झाडांना थंडावा देणाऱ्या खतांची यादी दिली आहे, ज्यामुळे तुमची बाग हिरवीगार राहील.

उन्हाळ्यात झाडांना वाचवण्याचे सोपे उपाय

झाडांना पाणी कधी द्यावे?

हिवाळ्याच्या तुलनेत उन्हाळ्यात झाडांना जास्त पाण्याची गरज असते. पण याचा अर्थ असा नाही की दररोज पाणी द्यायलाच हवं. कुंडीतील माती पूर्णपणे सुकल्यावरच झाडांना पाणी द्या.

झाडांना कडक उन्हापासून कसे वाचवावे?

तुमच्याकडे झाडं सावलीत ठेवायला जागा नसेल, तर तुम्ही शेड नेट (Shed Net) लावू शकता. बाजारात २५% ते ९०% पर्यंत ऊन अडवणारी शेड नेट मिळते. तुम्ही तुमच्या गरजेनुसार ती निवडू शकता. यामुळे झाडांवर थेट ऊन पडणार नाही आणि ती जळणार नाहीत.

हे पण वाचा- घरातल्या छोट्या जागेतही बनवा सुंदर बाग, या ६ स्मार्ट आयडिया वापरून बदला लुक

मल्चिंग (Mulching) कसे करतात?

उन्हाळ्यात झाडं निरोगी ठेवण्यासाठी मल्चिंग करणं फायद्याचं ठरतं. यामुळे मातीतील ओलावा टिकून राहतो आणि मुळांना थंडावा मिळतो. यासाठी तुम्ही वाळलेलं गवत, पालापाचोळा, लाकडी भुसा किंवा कोकोपीट (Cocopeat) वापरू शकता.

झाडांवर मिस्टिंग (Misting) करण्याची पद्धत

मिस्टिंग म्हणजे झाडांच्या पानांवर पाण्याचा फवारा मारणे. यामुळे पानांना थंडावा मिळतो आणि त्यांच्यावरची धूळही स्वच्छ होते. जर तुमच्या घरात जास्त दमट हवामानात वाढणारी झाडं असतील, तर उन्हाळ्यात त्यांना ताजतवानं ठेवण्यासाठी दिवसातून २-३ वेळा मिस्टिंग नक्की करा.

कुंड्यांच्या आसपास ओलावा ठेवा

झाडांसोबतच कुंड्यांनाही उष्णतेपासून वाचवणं गरजेचं आहे. यासाठी एका मोठ्या ट्रेमध्ये पाणी भरून त्यात कुंड्या ठेवा (कुंडी थेट पाण्यात ठेऊ नका). यामुळे कुंड्यांच्या आजूबाजूला ओलावा टिकून राहतो.

उन्हाळ्यात झाडांना कोणते खत द्यावे?

जेव्हा सूर्य आग ओकत असतो, तेव्हा आपल्याला जसं थंड पेय प्यावंसं वाटतं, तसंच झाडांनाही थंडाव्याची गरज असते. यासाठी झाडांमध्ये ओलावा टिकवून ठेवणारी हलकी आणि सेंद्रिय (Organic) खतं वापरा.

  1. केळ्याच्या सालीचे द्रवरूप खत: यात भरपूर पोटॅशियम असतं. हे खत झाडांना मजबूत बनवतं आणि उष्णता कमी करतं. केळ्याची सालं कापून १० दिवस पाण्यात भिजवून ठेवा. नंतर ते पाणी गाळून झाडांना घाला.
  2. कांदा, संत्री आणि केळ्याच्या सालीचे खत: तिन्ही फळांची सालं कापून पाण्यात भिजत ठेवा. काही दिवसांनी हे पाणी गाळून झाडांना द्या. हे खत तुम्ही दर महिन्याला वापरू शकता.
  3. शेणखत: झाडांना नैसर्गिकरित्या थंडावा देण्यासाठी शेणखताचा वापर करू शकता. ते मातीतील ओलावा नैसर्गिकरित्या टिकवून ठेवतं.
  4. मातीत ताक घाला: शरीराला थंडावा देणारं ताक झाडांसाठीही फायदेशीर आहे. ताक पाण्यात मिसळून मातीत घाला. यामुळे जमिनीत चांगले बॅक्टेरिया वाढतात आणि झाडं ताजी राहतात.
  5. कोरफडीचे द्रवरूप खत: कोरफडीचा गर (Aloe Vera Gel) पाण्यात मिसळून झाडांना घाला. हे खत मुळांना थंडावा देतं आणि त्यांना मजबूत बनवतं.