मेजर लीग क्रिकेटमध्ये (MLC) वॉशिंग्टन फ्रीडम टीमने MI न्यूयॉर्कविरुद्ध २६७ धावांचा यशस्वी पाठलाग करत T20 क्रिकेटच्या इतिहासात नवा विश्वविक्रम रचला आहे. स्टीव्ह स्मिथ आणि अँड्रिस गॉस यांच्या शानदार शतकांमुळे हा ऐतिहासिक विजय शक्य झाला.
T20 क्रिकेट म्हणजे फलंदाजांची तुफान फटकेबाजी आणि गोलंदाजांची धुलाई, हे आता जणू समीकरणच झालं आहे. हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय अमेरिकेच्या मेजर लीग क्रिकेट (MLC) स्पर्धेत. वॉशिंग्टन फ्रीडम टीमने T20 क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करून विश्वविक्रम केला आहे. त्यांनी MI न्यूयॉर्कविरुद्ध तब्बल २६७ धावांचं लक्ष्य सहज पार केलं.
याआधी T20 क्रिकेटमधील सर्वात मोठ्या यशस्वी पाठलागाचा विक्रम आयपीएल २०२६ मध्ये पंजाब किंग्सच्या नावावर होता. त्यांनी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध २६५ धावांचं लक्ष्य गाठलं होतं. पण आता वॉशिंग्टन फ्रीडमने हा विक्रम मोडीत काढला आहे.
मेजर लीग क्रिकेटमधील या सामन्यात MI न्यूयॉर्क आणि वॉशिंग्टन फ्रीडम आमनेसामने होते. आधी MI न्यूयॉर्कच्या निकोलस पूरनने फक्त ३१ चेंडूत शतक झळकावून T20 क्रिकेटमधील सर्वात वेगवान शतकाचा विक्रम केला. पण त्याचा हा विक्रम वॉशिंग्टन फ्रीडमच्या फलंदाजांनी केलेल्या अविश्वसनीय कामगिरीमुळे झाकोळला गेला. वॉशिंग्टनकडून स्टीव्ह स्मिथ आणि अँड्रिस गॉस यांनी धडाकेबाज शतकं झळकावून आपल्या टीमला ऐतिहासिक विजय मिळवून दिला.
बुधवारी झालेल्या या एलिमिनेटर सामन्यात वॉशिंग्टन फ्रीडमची बॅटिंग इतकी स्फोटक होती की, त्यांनी २६७ धावांचं मोठं लक्ष्य तब्बल ८ चेंडू शिल्लक असतानाच गाठलं. या विजयामुळे वॉशिंग्टन फ्रीडमचं MLC कप जिंकण्याचं स्वप्न अजूनही जिवंत आहे, तर दुसरीकडे दोन वेळचा चॅम्पियन असलेल्या MI न्यूयॉर्कचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे. आता वॉशिंग्टन फ्रीडमचा सामना चॅलेंजर फेरीत सॅन फ्रान्सिस्को युनिकॉर्न्सशी होईल. या सामन्यात जो जिंकेल, तो शनिवारी होणाऱ्या फायनलमध्ये शाहरुख खानच्या लॉस एंजेलिस नाईट रायडर्सशी भिडेल.
MLC लीगमधील निकोलस पूरनचं सर्वात वेगवान शतक:
नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या MI न्यूयॉर्कने स्फोटक सुरुवात केली. निकोलस पूरनने फक्त ३१ चेंडूत शतक ठोकत MLC लीगच्या इतिहासातील सर्वात वेगवान शतक नोंदवलं. पूरनने आपल्या खेळीत ३३ चेंडूंचा सामना करताना ५ चौकार आणि १३ षटकारांसह ३२१.२१ च्या स्ट्राइक रेटने १०६ धावा केल्या.
त्याला क्विंटन डी कॉकने २४ चेंडूत ५१ धावा करून चांगली साथ दिली, तर बिग हिटर कायरन पोलार्डने २५ चेंडूत ८ षटकारांसह ६४ धावांची तुफानी खेळी केली. यामुळे MI न्यूयॉर्कने २० ओव्हर्समध्ये ९ विकेट्स गमावून २६६ धावांचा डोंगर उभारला.
विद्यमान चॅम्पियन MI न्यूयॉर्कला धक्का
एवढी मोठी धावसंख्या उभारल्यावर MI न्यूयॉर्कला विजयाची खात्री होती. त्यातच वॉशिंग्टन फ्रीडमची सुरुवात खराब झाली आणि १० धावांवरच त्यांचे दोन फलंदाज बाद झाले. पण त्यानंतर तिसऱ्या विकेटसाठी आलेल्या स्टीव्ह स्मिथ आणि अँड्रिस गॉस यांनी तब्बल २४१ धावांची स्फोटक भागीदारी करून सामना पूर्णपणे फिरवला.
स्टीव्ह स्मिथने फक्त ४८ चेंडूत ७ चौकार आणि ९ षटकारांसह नाबाद ११० धावा केल्या. तर दुसरीकडे अँड्रिस गॉसने ५१ चेंडूत १० चौकार आणि १२ षटकारांसह १३२ धावांची वादळी खेळी केली. या दोघांनी अशक्य वाटणारं लक्ष्य अगदी सहजसोपं करून टाकलं आणि MI न्यूयॉर्कच्या प्रत्येक गोलंदाजाची धुलाई केली.


