दक्षिण भारतातील शेतकरी आता पारंपरिक शेती सोडून फायदेशीर ॲव्होकॅडो शेतीकडे वळत आहेत. युट्यूबसारख्या आधुनिक माध्यमांमधून माहिती मिळवून आणि आंतरपीकसारख्या नवीन पद्धती वापरून ते चांगलं यश मिळवत आहेत. यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारत आहे.
शहरांमधल्या मोठ्या कॉफी शॉप्स आणि हाय-टेक रेस्टॉरंटमध्ये 'ॲव्होकॅडो टोस्ट' खाणं आजकाल एक ट्रेंड बनला आहे. पण एक काळ असा होता की, आपल्या देशात या फळाचं नावही अनेकांना माहीत नव्हतं. त्याला ना मागणी होती, ना बाजारात किंमत. पण आता सगळं चित्रंच पालटलंय. लोकांच्या डायनिंग टेबलपासून ते डाएट प्लॅनपर्यंत, सगळीकडे हे परदेशी फळ दिसू लागलं आहे. हाच बदल दक्षिण भारतातील शेतकऱ्यांनी अचूक ओळखला आणि ते पारंपरिक पिकांऐवजी ॲव्होकॅडोच्या शेतीतून मोठा नफा कमावत आहेत. त्यांच्या या नव्या प्रयोगाचं कौतुक पंतप्रधान मोदींनीही केलं आहे.
या परदेशी फळाने बदललं दक्षिण भारतातील शेतकऱ्यांचं आयुष्य!
आंध्र प्रदेशच्या YSR जिल्ह्यातील वरदराज नावाच्या एका तरुण शेतकऱ्याने युट्यूब बघून एक मोठी कामगिरी केली आहे. तो अनेक वर्षांपासून आपल्या शेतात टोमॅटो आणि केळीची शेती करत होता. पण एकाच प्रकारच्या पिकातून त्याला फारसा फायदा होत नव्हता. काहीतरी नवीन प्रयोग करायचा विचार त्याच्या डोक्यात होता. एके दिवशी त्याने मित्राच्या शेतात ॲव्होकॅडोचं फळ पाहिलं आणि त्याला त्याबद्दल कुतूहल वाटलं. वेळ न घालवता त्याने थेट युट्यूबवर ॲव्होकॅडो शेतीबद्दल माहिती गोळा करायला सुरुवात केली. युट्यूबच्या माध्यमातूनच त्याने शेतीच्या सगळ्या पद्धती शिकून घेतल्या. सुरुवातीला छोट्या प्रमाणात प्रयोग करून पाहिला आणि त्याला तब्बल चार टन उत्पन्न मिळालं. विशेष म्हणजे, कोणत्याही मध्यस्थाशिवाय त्याने थेट स्थानिक व्यापाऱ्यांना ही फळं विकली आणि कल्पनाही केली नसेल एवढा नफा कमावला.

कॉफीच्या मळ्यात ॲव्होकॅडोची शेती
फक्त आंध्र प्रदेशच नाही, तर कर्नाटक आणि तामिळनाडूमध्येही ॲव्होकॅडो शेतीची लाट आली आहे. तामिळनाडूच्या कोडाईकनालमधील चंद्रशेखर नावाच्या शेतकऱ्याने फक्त अर्धा एकर जमिनीवर ॲव्होकॅडोचं पीक घेऊन चांगला नफा मिळवला आहे.
कर्नाटकच्या चिकमंगळूरमधील एका शेतकऱ्याने तर याच्याही पुढे एक पाऊल टाकलं आहे. त्याने कॉफी आणि मिरीच्या मळ्यात 'आंतरपीक' म्हणून ॲव्होकॅडोची झाडं लावली आहेत. अगदी आपल्याकडे कोकणात जशी नारळाच्या बागेत सुपारी किंवा मसाल्याची झाडं लावतात, तसंच काहीसं. यामुळे त्याला वेगळ्या जमिनीची गरज भासली नाही आणि पारंपरिक पिकांसोबतच अतिरिक्त उत्पन्नही मिळू लागलं.
शहरी लोकांच्या खाण्यापिण्याच्या सवयी ओळखून आपल्या शेतकऱ्यांनी केलेला हा बदलच त्यांचं खरं यश आहे. आज शहरातल्या रेस्टॉरंटमध्ये मिळणाऱ्या ॲव्होकॅडो टोस्टच्या चवीमागे आपल्या शेतकऱ्यांचे कष्ट, त्यांची नवी विचारसरणी, आधुनिक शेती पद्धती आणि थेट बाजारात माल विकण्याचं कौशल्य आहे. यातूनच दक्षिण भारतातील शेतकऱ्यांची ताकद संपूर्ण देशाला दिसून येत आहे.
