तुमचा पगार दरमहा ३० हजार रुपये आहे का? ऑनलाइन शॉपिंग, EMI आणि वीकेंडच्या खर्चामुळे महिन्याच्या शेवटी हातात काहीच उरत नाही का? मग ३० हजारांच्या पगारातही बचत कशी करायची? Gen Z म्हणजेच आजच्या तरुण पिढीसाठी पैसे वाचवण्याचे ५ सोपे आणि प्रभावी मार्ग जाणून घ्या.
Monthly Saving Plans for Gen Z: महागाई, EMI, ऑनलाइन शॉपिंग आणि वीकेंडची लाइफस्टाइल... या सगळ्या गदारोळात महिन्याला ३० हजार रुपये कमावणाऱ्या Gen Z साठी पैसे वाचवणं हे एक मोठं आव्हान बनलं आहे. महिन्याच्या सुरुवातीला अकाउंटमध्ये पैसे दिसतात, पण २५ तारीख येईपर्यंत बॅलन्सचा स्क्रीनशॉट काढण्यासारखी परिस्थितीही राहत नाही. पण खरं तर चांगली बचत करणं हे फक्त जास्त पगारवाल्यांचंच काम नाही. योग्य नियोजन, थोडी शिस्त आणि काही प्रॅक्टिकल निर्णय घेतले, तर ३० हजार रुपये कमावणारा तरुणही दर महिन्याला ५ ते १० हजार रुपयांपर्यंत सहज बचत करू शकतो. चला, Gen Z साठी असेच ५ जबरदस्त सेव्हिंग प्लॅन्स जाणून घेऊया.

आधी बचत, मग खर्च... हा फॉर्म्युला वापरा
Gen Z ची सर्वात मोठी चूक हीच आहे की, ते आधी महिनाभर खर्च करतात आणि जे काही उरतं, त्याला बचत समजतात. पण हुशार लोक पगार आल्याबरोबर सर्वात आधी बचतीची रक्कम बाजूला काढतात.
कशी कराल बचत?
- पगार खात्यात जमा होताच, त्यातली २०% रक्कम दुसऱ्या बँक अकाउंटमध्ये ट्रान्सफर करा.
- तुमचा पगार ३० हजार असेल, तर किमान ६ हजार रुपये ऑटो-सेव्हिंग मोडमध्ये टाका.
- ज्या अकाउंटला UPI लिंक आहे, त्यात मर्यादित पैसे ठेवा.
- जेव्हा पैसा नजरेसमोर नसतो, तेव्हा तो खर्चही कमी होतो. ही ट्रिक सगळ्यात जास्त प्रभावी ठरते.
फक्त १००० रुपयांपासून का होईना, पण SIP सुरू करा
आजच्या Gen Z ला प्रत्येक गोष्टीचा रिझल्ट लवकर हवा असतो, पण गुंतवणुकीच्या लांबच्या शर्यतीसाठी SIP हा सर्वात सोपा आणि विश्वासार्ह मार्ग आहे.
किती गुंतवणूक करावी?
- नोकरीच्या सुरुवातीला १००० ते ३००० रुपयांची SIP पुरेशी आहे.
- दरवर्षी पगार वाढल्यावर SIP ची रक्कमही वाढवा. यामुळे हळूहळू एक मोठा फंड तयार होतो आणि गुंतवणुकीची शिस्त लागते. भविष्यात बाईक घेणं, फिरायला जाणं किंवा घराचं डाउन पेमेंट करणं यांसारखे मोठे खर्च सोपे होऊ शकतात.
'नो-कॉस्ट EMI' च्या जाळ्यात अडकू नका
Gen Z च्या कमाईचा मोठा हिस्सा गॅजेट्स आणि ऑनलाइन शॉपिंगमध्ये जातो. त्यातही 'नो-कॉस्ट EMI' ची मानसिकता बचतीची सर्वात मोठी शत्रू बनली आहे. खरं तर, हे छोटे-छोटे EMI एकत्र येऊन एक मोठा बोजा बनतात. दर महिन्याला पगारातून एक ठराविक रक्कम कापली गेल्यामुळे बचतीला ब्रेक लागतो. गरज आणि इच्छा यातील फरकच संपून जातो. हे टाळण्यासाठी '३० दिवसांचा नियम' वापरा. कोणतीही महागडी वस्तू खरेदी करण्यापूर्वी ३० दिवस थांबा. त्यानंतरही ती वस्तू गरजेची वाटली, तरच खरेदी करा.
एक इमर्जन्सी फंड तयार ठेवाच
आजकाल Gen Z च्या नोकरीत पूर्वीसारखी स्थिरता राहिलेली नाही. ले-ऑफ (Layoff), मेडिकल इमर्जन्सी किंवा अचानक येणारे खर्च कधीही दारात उभे राहू शकतात. अशा परिस्थितीसाठी तुमच्याकडे किमान ३ महिन्यांच्या पगाराएवढा इमर्जन्सी फंड तयार हवा. म्हणजेच, ३० हजार पगार असणाऱ्या व्यक्तीने साधारण ९० हजार रुपयांचा इमर्जन्सी फंड बनवला पाहिजे.
कशी कराल सुरुवात?
- दर महिन्याला २०००-३००० रुपये बाजूला काढा.
- ही रक्कम सेव्हिंग अकाउंट किंवा लिक्विड फंडमध्ये ठेवा.
- हे पैसे फिरायला जाण्यासाठी किंवा शॉपिंगसाठी वापरू नका.
खर्च कुठे होतोय, हे लिहून ठेवा, तरच पैसा वाचेल
अनेक तरुणांना महिन्याच्या शेवटी हेच कळत नाही की, नेमका पैसा गेला कुठे? कॉफी, फूड डिलिव्हरी, कॅब आणि ऑनलाइन सबस्क्रिप्शन हे खर्च छोटे वाटतात, पण तेच खिसा रिकामा करतात. हे टाळण्याचा सोपा मार्ग म्हणजे:
- प्रत्येक खर्चाची नोंद ठेवा.
- दर रविवारी UPI हिस्ट्री तपासा.
- जे सबस्क्रिप्शन वापरत नाही, ते बंद करा.
- फक्त अनावश्यक खर्च टाळूनही तुम्ही महिन्याला ३ ते ५ हजार रुपये सहज वाचवू शकता.
Gen Z साठी सर्वात महत्त्वाची गोष्ट
बचत म्हणजे फक्त पैसे जमा करणं नाही, तर आर्थिक स्वातंत्र्य (Financial Freedom) मिळवणं आहे. ३० हजारांच्या पगारात करोडपती होण्याची स्वप्नं कदाचित दूरची वाटतील, पण बचतीच्या चांगल्या सवयी लवकर लावल्या, तर भविष्यातील आर्थिक ताण नक्कीच कमी होऊ शकतो. आजच्या Gen Z ने लोकांना इम्प्रेस करण्यापेक्षा स्वतःला आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करण्यावर लक्ष केंद्रित केलं, तर कमी पगारातही एक मजबूत आर्थिक आयुष्य घडवता येतं.

