गृहकर्ज फेडण्यासाठी पीएफमधून पैसे काढताना काही अटींची पूर्तता करणं आवश्यक आहे. जर तुम्हाला पीएफमधून मिळणाऱ्या व्याजापेक्षा गृहकर्जावर जास्त व्याज द्यावे लागत असेल, तर पीएफचे पैसे वापरणे फायदेशीर वाटू शकते. पण, पीएफ हा तुमच्या निवृत्तीकाळातील मोठा आधार आहे, हे विसरू नका.
मुंबई : गृहकर्जाचं ओझं कमी करण्यासाठी पीएफच्या पैशांचा वापर करावा का? कर्जाचा हप्ता भरताना अनेकांना असा प्रश्न पडतो. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) सदस्यांना काही अटींवर गृहकर्जाची परतफेड करण्यासाठी पीएफचे पैसे काढण्याची मुभा देते. पण, आजचं कर्ज कमी करण्यासाठी काढलेला हा पैसा, तुमच्या निवृत्तीनंतरच्या जमा रकमेवर कसा परिणाम करेल, याचाही विचार करायला हवा.
12 महिने सदस्यत्व; 75 टक्क्यांपर्यंत रक्कम काढता येते
ज्यांनी 12 महिने सदस्यत्व पूर्ण केलं आहे, ते घर किंवा गृहकर्ज फेडण्यासाठी पीएफमधील 75 टक्क्यांपर्यंत रक्कम काढू शकतात. घरासाठी पैसे काढण्याची ही सुविधा एकाच प्रवर्गात येते. पीएफ खात्यात किमान 25 टक्के रक्कम शिल्लक राहील, या अटीवर तुम्ही पाच वेळा या सुविधेचा लाभ घेऊ शकता.
पैसे तर मिळतील; पण टॅक्स वाचेल का?
सदस्यत्वाची अट 12 महिने केली असली, तरी टॅक्सबाबतची पाच वर्षांची अट रद्द झालेली नाही, असं कर तज्ज्ञांनी स्पष्ट केलं आहे. सलग पाच वर्षं काम केल्यानंतर पीएफचे पैसे काढल्यास त्यावर टॅक्स लागत नाही. पण, त्यापूर्वीच पैसे काढल्यास टॅक्स भरावा लागू शकतो. जर तुम्ही नोकरी बदलताना पीएफचे पैसे न काढता ते नव्या खात्यात वळवले असतील, तर जुन्या नोकरीतील काळही यात ग्राह्य धरला जातो. काढलेली रक्कम टॅक्सपात्र असेल आणि ती 50,000 रुपये किंवा त्याहून अधिक असेल, शिवाय पॅन कार्डचे तपशील दिले असतील, तर 10 टक्के टीडीएस (TDS) कापला जाऊ शकतो. पात्र सदस्य फॉर्म 121 भरून सवलतीची मागणी करू शकतात, असंही त्यांनी सांगितलं.
कर्ज फेडण्यासाठी पीएफचा वापर फायद्याचा आहे का?
पीएफमधून गृहकर्ज फेडण्यासाठी पैसे काढण्यापूर्वी तुम्ही सर्व अटींची पूर्तता करत आहात ना, हे तपासा. जर तुम्हाला पीएफमधून मिळणाऱ्या व्याजापेक्षा गृहकर्जावर जास्त व्याज द्यावे लागत असेल, तर पीएफचे पैसे वापरणे फायदेशीर वाटू शकते. पण, पीएफ हा तुमच्या निवृत्तीकाळातील महत्त्वाचा हिस्सा आहे, हे विसरू नका. हे पैसे दीर्घकाळ खात्यात राहिल्याने चक्रवाढ व्याजाचा (Compound Interest) मोठा फायदा मिळतो. पण जर तुम्ही लवकरच पैसे काढले, तर या व्याजावर आणि तुमच्या निवृत्तीनंतरच्या बचतीवर मोठा परिणाम होऊ शकतो.











