स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मधील असिस्टंट मॅनेजरची नोकरी सोडून स्निग्धा बोसने स्वतःच्या मानसिक आरोग्याला प्राधान्य दिलं. सततचा कामाचा ताण आणि डोकेदुखीला कंटाळून तिने मेरठमध्ये 'तुला वेलनेस स्टुडिओ' नावाचा स्वतःचा योगा स्टुडिओ सुरू केला आहे.

मेरठ : स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मधली असिस्टंट मॅनेजरची नोकरी सोडलेल्या एका तरुणीने उत्तर प्रदेशच्या मेरठ शहरात स्वतःचा योगा स्टुडिओ सुरू केला आहे. स्निग्धा बोस असं तिचं नाव असून, मानसिक थकवा आणि कामाच्या सततच्या ताणामुळे आपण हा निर्णय घेतल्याचं तिने सांगितलं. स्निग्धा आता 'तुला वेलनेस स्टुडिओ' (Tulaa Wellness Studio) चालवते. तिने स्पष्ट केलं की, तिचा पगार चांगला होता आणि नोकरीही सुरक्षित होती. पण कामाच्या दबावाचा तिच्या रोजच्या जगण्यावर आणि मानसिकतेवर परिणाम होऊ लागला होता.

आपल्याकडे सरकारी नोकरीला चांगली प्रतिष्ठा आणि सुरक्षिततेची हमी मानली जाते. त्यामुळे अशी नोकरी सोडण्याच्या तिच्या निर्णयावर लोक प्रश्न विचारतील हे स्निग्धाला माहीत होतं. ती म्हणाली, "स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये माझी नोकरी स्थिर होती. करिअर सुरक्षित होतं. असिस्टंट मॅनेजर म्हणून पगारही चांगला होता. अशी नोकरी सोडू नकोस, असा सल्ला अनेकजण देतात."

स्निग्धा सांगते की, या सगळ्या सुरक्षेच्या भावनेनंतरही ती तिच्या रोजच्या जगण्यात आनंदी आणि समाधानी नव्हती. अखेर तिने ठरवलं की, ही नोकरी तिच्या आरोग्यासाठी आणि मानसिक शांततेसाठी हानिकारक ठरत आहे. तिला रोज डोकेदुखीचा त्रास व्हायचा आणि हा ताण असह्य झाला होता. तिच्या व्हिडिओमध्ये ती म्हणते, "मी स्टेट बँक ऑफ इंडियामधील नोकरी सोडली आणि आता माझा स्वतःचा योगा स्टुडिओ आहे."

या निर्णयामागील कारण सांगताना ती म्हणाली, "मला प्रचंड दडपण जाणवत होतं, रोज डोकं दुखायचं, मी रोज पेनकिलर घ्यायचे आणि ते आयुष्य मला अजिबात आवडत नव्हतं. मला स्वतःमध्ये काहीतरी बदलण्याची गरज आहे हे लक्षात आल्यावर मी स्वतःसाठी हे मोठं पाऊल उचललं."

तिने व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, कामाचा ताण, तासनतास एकाच जागी बसून काम करणं आणि मानसिक थकवा या गोष्टी तिने तिच्या आयुष्याचा एक सामान्य भाग म्हणून स्वीकारायला सुरुवात केली होती. तिला असंही वाटत होतं की, ती स्वतःच्या शरीराकडे पुरेसं लक्ष देत नाहीये.

आपला अनुभव सांगताना स्निग्धाने हेही स्पष्ट केलं की, प्रत्येकाने आपली नोकरी सोडायलाच हवी असं नाही. तणावपूर्ण नोकरीतही लोक आपल्या आरोग्यासाठी वेळ काढू शकतात, असं तिने नमूद केलं.

व्हायरल व्हिडिओ पहा

View post on Instagram

सोशल मीडियावर काय प्रतिक्रिया आल्या?

स्निग्धाच्या पोस्टवर अनेक लोकांनी तिला पाठिंबा देणाऱ्या कमेंट्स केल्या आहेत. तणावपूर्ण नोकरी सोडण्याची तिची इच्छा ते समजू शकतात असं अनेकांनी म्हटलं आहे.

एका युजरने लिहिलं, "तुम्हाला अधिक शक्ती मिळो. आयुष्यात यशस्वी व्हा." दुसऱ्याने लिहिलं, “माझी इच्छा आहे की मी पण एक दिवस असं काहीतरी करू शकेन.” आणखी एकाने कमेंट केली, "तुम्ही मनःशांती मिळवली आहे." तर एका युजरने लिहिलं, "व्वा!! तुम्ही खूप भाग्यवान आहात! मलाही असंच करायचं आहे."