एसबीआय कार्डने 1 डिसेंबरपासून इंधन आणि प्रवासाच्या मोठ्या व्यवहारांवर 1 टक्का अतिरिक्त चार्ज लावण्याचा निर्णय घेतलाय. एका ट्रान्सपोर्ट ट्रान्झॅक्शनचे बिल 30,000 रुपयांच्या पुढे गेल्यास किंवा एका बिलिंग सायकलमध्ये इंधनाचा खर्च 50,000 रुपयांच्या वर गेल्यास हा एक्स्ट्रा चार्ज द्यावा लागेल.
तुम्ही जर एसबीआय क्रेडिट कार्ड (SBI Credit Card) वापरून पेट्रोल-डिझेल भरत असाल किंवा प्रवासासाठी खर्च करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. एसबीआय कार्डने मोठ्या रकमेच्या इंधन आणि ट्रान्सपोर्ट व्यवहारांवर 1 टक्का अतिरिक्त चार्ज (Extra charge) लावण्याचा निर्णय घेतलाय. हे नवीन नियम 1 डिसेंबरपासून लागू होतील. बँकेच्या सर्व प्रकारच्या क्रेडिट कार्ड्सना हे नवीन दर लागू असणार आहेत.
इंधन आणि प्रवासाच्या खर्चासाठी बँकेने वेगवेगळ्या लिमिट्स ठरवल्या आहेत. ट्रान्सपोर्टच्या बाबतीत एका व्यवहाराच्या रकमेवर हा अतिरिक्त चार्ज ठरेल. पण इंधनाच्या बाबतीत मात्र एका संपूर्ण बिलिंग सायकलमधील एकूण खर्चाचा विचार केला जाईल. क्रेडिट कार्डच्या दोन स्टेटमेंट तारखांमधला 28 ते 31 दिवसांचा काळ म्हणजे बिलिंग सायकल. या काळात केलेली खरेदी, पेमेंट, कॅश विथड्रॉल आणि इतर फी या सगळ्याची नोंद यात होते.
प्रवासाचा खर्च 30,000 च्या पुढे गेल्यास 1 टक्का चार्ज
1 डिसेंबर 2026 पासून एका ट्रान्सपोर्ट ट्रान्झॅक्शनची रक्कम 30,000 रुपयांच्या पुढे गेल्यास त्यावर 1 टक्का अतिरिक्त चार्ज लागेल. प्रवासी वाहतूक सेवा, टोल, ब्रिज फी आणि बस सेवा यांचा समावेश असलेल्या 4111, 4784 आणि 4131 या मर्चंट कॅटेगरी कोड्सना (MCC) हा नियम लागू होईल. उदाहरणार्थ, तुम्ही प्रवासासाठी क्रेडिट कार्डवरून 35,000 रुपये खर्च केले, तर तुम्हाला 350 रुपये एक्स्ट्रा चार्ज द्यावा लागेल. यावर लागू होणारे टॅक्स वेगळे असतील. पण जर तुमचा एका वेळचा ट्रान्सपोर्ट खर्च 30,000 रुपये किंवा त्यापेक्षा कमी असेल, तर कोणताही अतिरिक्त चार्ज लागणार नाही. यासाठी संपूर्ण बिलिंग सायकलचा खर्च नाही, तर प्रत्येक व्यवहाराची रक्कम पाहिली जाईल.
इंधनाचा खर्च 50,000 च्या वर गेल्यास एकूण रकमेवर 1 टक्का फी
इंधनाच्या व्यवहारांसाठी मात्र नियम थोडा वेगळा आहे. एका बिलिंग सायकलमध्ये तुम्ही इंधनावर केलेला एकूण खर्च 50,000 रुपयांच्या पुढे गेला, तर त्या संपूर्ण रकमेवर 1 टक्का फी द्यावी लागेल. इथे फक्त 50,000 च्या वरच्या रकमेवर नाही, तर संपूर्ण इंधन खर्चावर हा चार्ज लागेल.
उदाहरणार्थ, एका बिलिंग सायकलमध्ये तुम्ही 60,000 रुपयांचे इंधन भरले, तर तुम्हाला 600 रुपये अतिरिक्त चार्ज द्यावा लागेल. यासोबतच लागू होणारे टॅक्सही द्यावे लागतील. इंधन डीलर्स, पेट्रोल पंप आणि फ्युएल डिस्पेन्सर्स यांचा समावेश असलेल्या 5172, 5542, 5541 आणि 5983 या मर्चंट कॅटेगरी कोड्सना हा नियम लागू होतो.
एसबीआय क्रेडिट कार्डधारकांनी काय करावं?
कार्डधारकांनी सर्वात आधी प्रत्येक बिलिंग सायकलमध्ये इंधनावर होणाऱ्या खर्चावर लक्ष ठेवणं गरजेचं आहे. बिलिंग सायकल सुरू होण्याची आणि संपण्याची तारीख तपासून आपल्या खर्चाचा अचूक हिशोब ठेवा. तसेच, आपण करत असलेले व्यवहार कोणत्या मर्चंट कॅटेगरीमध्ये नोंदवले जात आहेत, याकडेही लक्ष द्या.




