Bank Holidays in August 2026 : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या 2026 च्या कॅलेंडरनुसार, ऑगस्ट महिन्यात बँकांना तब्बल 14 दिवस सुट्टी असणार आहे. यामध्ये रविवार, दुसरा-चौथा शनिवार, स्वातंत्र्य दिन, ओणम आणि रक्षाबंधन यांसारख्या सुट्ट्यांचा समावेश आहे. मात्र, सुट्ट्यांमध्येही डिजिटल बँकिंग सेवा सुरू राहतील.
मुंबई : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) 2026 सालासाठी बँकेच्या सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. यानुसार, ऑगस्ट महिन्यात एकूण 14 दिवस बँका बंद राहणार आहेत. यामध्ये राष्ट्रीय सुट्ट्या, सण-उत्सव आणि रविवार व शनिवारच्या सुट्ट्यांचा समावेश आहे. त्यामुळे बँकेत जाण्यापूर्वी ही यादी नक्की तपासा.
देशभरातील सुट्ट्या
ऑगस्ट महिन्यात २, ९, १६, २३ आणि ३० तारखेला रविवार असल्याने देशभरातील सर्व बँका बंद राहतील. याशिवाय, ८ ऑगस्टला दुसरा शनिवार आणि २२ ऑगस्टला चौथा शनिवार असल्याने बँकांना सुट्टी असेल. तसेच, १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त देशभरात बँका बंद राहतील.
राज्यानुसार विशेष सुट्ट्या, काही सुट्ट्या राज्यानुसार बदलतील
काही सुट्ट्या फक्त काही राज्यांपुरत्या मर्यादित आहेत. ४ ऑगस्ट रोजी 'खेर पूजा' निमित्त अगरतळामध्ये बँका बंद असतील. १३ ऑगस्टला 'पेट्रियट्स डे' मुळे इंफाळमधील बँकांना सुट्टी असेल. तर १९ ऑगस्ट रोजी महाराजा बीर बिक्रम किशोर माणिक्य बहादूर यांच्या जयंतीनिमित्त अगरतळामध्ये पुन्हा एकदा बँका बंद राहतील.
ओणम आणि मिलाद-उन-नबी
२५ ऑगस्ट रोजी मिलाद-उन-नबी, पहिला ओणम आणि मिलाद-इ-शरीफ निमित्त कोची, तिरुवनंतपुरम आणि विजयवाडा येथील बँकांना सुट्टी असेल. त्यानंतर २६ ऑगस्ट रोजी ईद-ए-मिलाद, बारावफात, मिलाद-उन-नबी आणि थिरुओणम या सणांमुळे बेलापूर, बंगळूर, भोपाळ, चेन्नई, डेहराडून, हैदराबाद, इंफाळ, जम्मू, कानपूर, कोची, लखनौ, मुंबई, नागपूर, नवी दिल्ली, पाटणा, रायपूर, रांची, श्रीनगर आणि तिरुवनंतपुरममधील बँका बंद राहतील.
रक्षाबंधन दिनीही सुट्टी
२८ ऑगस्ट रोजी रक्षाबंधन, पांग-लाबसोल, ईद-ए-मिलाद-उल-नबी नंतरचा शुक्रवार, श्री नारायण गुरु जयंती आणि अय्यंकाली जयंती या निमित्ताने अहमदाबाद, भोपाळ, डेहराडून, गंगटोक, जयपूर, जम्मू, कानपूर, कोची, लखनौ, शिमला, श्रीनगर आणि तिरुवनंतपुरममधील बँकांना सुट्टी असेल.
डिजिटल सेवा सुरू राहणार
बँकेच्या शाखा बंद असल्या तरी ग्राहकांना काळजी करण्याची गरज नाही. या सुट्ट्यांमध्ये ऑनलाइन बँकिंग, मोबाईल बँकिंग, UPI आणि ATM सेवा पूर्वीप्रमाणेच सुरू राहतील. त्यामुळे पैशांचे व्यवहार किंवा इतर डिजिटल कामं तुम्ही सहज करू शकता. बँकेत जाण्यापूर्वी आरबीआयच्या अधिकृत वेबसाइटवर सुट्ट्यांची यादी तपासणं सोयीचं ठरेल, कारण काही सुट्ट्या राज्यानुसार बदलू शकतात.


