आफ्रिकन देशांमध्ये प्रामुख्याने आढळणारा दुर्मिळ चंदनी रंगाचा (फिकट केशरी) बिबट्या राज्याच्या विजयनगर जिल्ह्यात सापडला आहे. भारतात अशा प्रकारचा बिबट्या दिसण्याची ही दुसरी वेळ आहे.

बंगळूर : आफ्रिकन देशांमध्ये प्रामुख्याने आढळणारा दुर्मिळ चंदनी रंगाचा (फिकट केशरी) बिबट्या राज्याच्या विजयनगर जिल्ह्यात सापडला आहे. भारतात अशा प्रकारचा बिबट्या दिसण्याची ही दुसरी वेळ आहे.

राज्यभरात संशोधन

होळेमत्ती नेचर फाऊंडेशनचे वन्यजीव तज्ज्ञ डॉ. संजय गुब्बी आणि त्यांची टीम बिबट्यांवर राज्यभरात संशोधन करत आहे. याचाच भाग म्हणून लावलेल्या कॅमेरा ट्रॅपमध्ये हा चंदनी रंगाचा बिबट्या कैद झाला आहे. राज्यात पहिल्यांदाच अशा फिकट केशरी रंगाचा बिबट्या दिसला आहे. साधारणपणे, बिबट्यांची त्वचा पिवळ्या आणि तपकिरी रंगाची असून त्यावर काळे ठिपके असतात. पण, विजयनगर जिल्ह्यात आढळलेल्या या दुर्मिळ बिबट्याची त्वचा चंदनासारख्या मंद केशरी रंगाची असून त्यावर तसेच ठिपके आहेत.

त्वचेमध्ये लाल रंगाचे जास्त उत्पादन आणि गडद रंगाच्या कमतरतेमुळे बिबट्याला हा दुर्मिळ रंग मिळाला असावा, असा अंदाज आहे. अशा रंगाचे बिबटे दक्षिण आफ्रिका, टांझानिया या देशांमध्ये आढळतात. जागतिक स्तरावर या रंगाच्या बिबट्याला 'स्ट्रॉबेरी लेपर्ड' म्हटले जाते. आता राज्यात दिसलेल्या या खास रंगाच्या बिबट्याला वन्यजीव तज्ज्ञ डॉ. संजय गुब्बी यांनी 'चंदन बिबट्या' असे नाव दिले आहे.

देशातील दुसरा बिबट्या:

अशा विशेष रंगाचा बिबट्या भारतात अत्यंत दुर्मिळ आहे. यापूर्वी नोव्हेंबर २०२१ मध्ये राजस्थानच्या रणकपूर परिसरात असा खास रंगाचा बिबट्या दिसला होता. आता विजयनगर जिल्ह्यात तसाच बिबट्या आढळला आहे. जगात आतापर्यंत अशा सात चंदनी रंगाच्या बिबट्यांची नोंद झाली आहे. विजयनगरमध्ये दिसलेली ही ६ ते ७ वर्षे वयाची मादी बिबट्या आहे.