९ ऑगस्ट रोजी रक्षाबंधन साजरे केले जाणार आहे. या खास दिवशी काय खास गोड पदार्थ बनवायचे याचा विचार करणाऱ्यांसाठी काही गोड पदार्थांच्या पाककृती येथे आहेत.
मुंबई - रक्षाबंधनाच्या दिवशी (Raksha Bandhan) बनवलेल्या गोड पदार्थांचे (Sweets) माधुर्य बहिण भावाचे नाते अधिकच घट्ट करते. यावेळी ९ ऑगस्ट रोजी रक्षाबंधन साजरा केला जाणार आहे. दरवेळी तेच गुलाब जामुन, पेढे खाऊन कंटाळा आला असेल तर यावेळी रक्षाबंधनासाठी नवीन गोड पदार्थ बनवून तुमच्या भावाला आश्चर्यचकित करा. तुमच्यासाठी काही गोड पदार्थांच्या पाककृती येथे आहेत.
रक्षाबंधनासाठी खास गोड पदार्थ :
खजूर आणि ड्रायफ्रूट्स लाडू : खजुरात पुरेसा गोडवा असल्याने यात साखर घालण्याची गरज नाही. हे आरोग्यासाठी खूप चांगले आहे.
खजुराचे लाडू बनवण्यासाठी लागणारे साहित्य :
१ कप खजूर
१/२ कप बारीक केलेले बदाम
१/२ कप बारीक केलेले अक्रोड
१/४ कप खोबरा किस
१ टीस्पून वेलची पूड
खजुराचे लाडू बनवण्याची पद्धत :
• प्रथम खजुराचे बी काढून त्याची गुळगुळीत पेस्ट करा.
• यात बारीक केलेले बदाम, बारीक केलेले अक्रोड आणि वेलची पूड घालून मिक्स करा.
• हाताला तूप लावून मिश्रणाचे छोटे छोटे गोळे करा.
• हे गोळे खोबऱ्याच्या किसाने लाटून घ्या.
• हे गोळे ३० मिनिटे फ्रीजमध्ये ठेवा.
• चविष्ट आणि आरोग्यदायी लाडू तयार.
बेक्ड सफरचंद खीर : ही सामान्य खीरपेक्षा थोडी वेगळी असते. दूध आणि सफरचंद, खीरची चव वाढवतात
बेक्ड सफरचंद खीर बनवण्यासाठी लागणारे साहित्य :
२ मध्यम आकाराचे सफरचंद
२ कप दूध
१/४ कप गुळ किंवा मध
१/४ कप तांदूळ
१/४ टीस्पून वेलची पूड
सुका मेवा (बदाम, पिस्ता)
१ टीस्पून तूप
बेक्ड सफरचंद खीर बनवण्याची पद्धत :
• ओव्हन १८०°C (३५०°F) वर प्रीहीट करा. सोलून कापलेली सफरचंदे बेकिंग ट्रेमध्ये ठेवा. तूप/खोबरेल तेल शिंपडा आणि मऊ होईपर्यंत २०-२५ मिनिटे बेक करा.
• अगदी कमी पाणी घालून, गॅसवरही तुम्ही बेक करू शकता.
• एका पॅनमध्ये तांदूळ दुधाबरोबर घालून शिजवा. तांदूळ मऊ व्हायला हवेत.
• तांदूळ नको असतील तर तांदूळ टाकू नका.
• शिजलेल्या दुधाच्या भातात बेक्ड सफरचंदे घालून चांगले मिक्स करा.
• यात गुळ/मध आणि वेलची घालून मिक्स करा.
• कमी आचेवर थोडा वेळ शिजवा आणि नंतर त्यात सुका मेवा घाला.
ओट्स आणि बदाम बर्फी : ओट्स आणि बदाम बर्फीलाही साखरेची गरज नाही
ओट्स आणि बदाम बर्फीसाठी लागणारे साहित्य :
१ कप रोल्ड ओट्स
१/२ कप बदाम पीठ
१/४ कप मध
१/४ कप खोबरा तेल
१ टीस्पून व्हॅनिला एक्सट्रॅक्ट
चिमुटभर मीठ
सजावटीसाठी बारीक केलेले बदाम
ओट्स बदाम बर्फी बनवण्याची पद्धत :
• ओट्स गॅसवर ठेवून सोनेरी रंग येईपर्यंत भाजा. नंतर गॅस बंद करून बाजूला ठेवा.
• ओट्स थंड झाल्यावर त्याची पूड करा.
• एका भांड्यात ओट्स पूड, बदाम पीठ, मध, खोबरेल तेल, व्हॅनिला एक्सट्रॅक्ट आणि मीठ घाला.
• हे चांगले मिक्स करा. नंतर ते तूप लावलेल्या ट्रेमध्ये ओता. सजावटीसाठी त्यावर बदाम घाला.
• हे १-२ तास फ्रीजमध्ये ठेवा.
• नंतर फ्रीजमधून काढून तुम्हाला हव्या त्या आकारात कापून सर्व्ह करा.


