अचानक पाहुणे येणार आहेत? काळजी नको! फक्त २० मिनिटांत घर कसं स्वच्छ आणि फ्रेश करायचं, यासाठी या ५ सोप्या टिप्स नक्की वाचा. पसारा आवरण्यापासून ते किचन-बाथरूमच्या सफाईपर्यंत, या टिप्समुळे घर लगेचच टापटीप दिसेल.

Quick House Cleaning Hacks: अचानक पाहुणे येणार असल्याची बातमी कळताच आपल्या डोक्यात पहिला विचार येतो तो म्हणजे घराच्या साफसफाईचा. पण घाबरून जाण्याचं काहीच कारण नाही. योग्य नियोजन आणि स्मार्ट ट्रिक्स वापरून तुम्ही फक्त 20 मिनिटांत संपूर्ण घर फ्रेश आणि टापटीप करू शकता. प्रत्येक कोपरा चमकवलाच पाहिजे असं नाही - फक्त त्या जागांवर लक्ष द्या ज्या पाहुण्यांच्या जास्त नजरेत येतात. चला, जाणून घेऊया इन्स्टंट क्लिनिंगच्या ५ सोप्या स्टेप्स.

सर्वात आधी 'पसारा' आवरा (५ मिनिटं)

सगळ्यात आधी ड्रॉइंग रूम आणि घरात येण्याच्या जागेवर लक्ष द्या. इकडे-तिकडे पसरलेल्या वस्तू जसं की वर्तमानपत्र, खेळणी, कपडे किंवा रिकाम्या बाटल्या पटकन एका टोपलीत भरा. सोफ्यावरच्या उशा (cushions) सरळ ठेवा, सेंटर टेबल पुसून घ्या आणि सोफ्याचं कव्हर झटकून टाका. घरात जेवढा कमी पसारा दिसेल, तेवढं घर जास्त स्वच्छ वाटेल.

किचनला द्या इन्स्टंट फ्रेश लूक (५ मिनिटं)

  • पाहुणे अनेकदा किचनपर्यंत पोहोचतातच.
  • सिंकमध्ये पडलेली भांडी लगेच धुवा किंवा एका मोठ्या टबमध्ये ठेवून झाका.
  • किचनचा ओटा ओल्या फडक्याने पुसून घ्या.
  • गॅस शेगडीवरचे डाग पटकन पुसून काढा.
  • कचऱ्याचा डबा रिकामा करा किंवा त्यावर झाकण ठेवा.
  • किचनमध्ये छान सुगंध यावा यासाठी तुम्ही लिंबाची सालं पाण्यात उकळू शकता.

बाथरूमची झटपट साफसफाई (४ मिनिटं)

  • बाथरूम स्वच्छ दिसणं खूप गरजेचं आहे.
  • वॉश बेसिन आणि नळ टिश्यू पेपर किंवा फडक्याने पुसून घ्या.
  • टॉयलेट सीटवर क्लिनर स्प्रे करा.
  • एक नवीन किंवा स्वच्छ टॉवेल लावा.
  • हँडवॉश आणि टिश्यू पेपर जागेवर ठेवा.
  • फक्त या छोट्या गोष्टींनीही बाथरूम एकदम फ्रेश दिसू लागेल.

फरशी आणि डस्टिंगचा फास्ट राऊंड (४ मिनिटं)

पूर्ण घरात झाडू मारण्याऐवजी फक्त त्या भागांवर लक्ष द्या जिथे पाहुणे बसणार आहेत. त्या जागेवर पटकन झाडू किंवा व्हॅक्युम क्लिनर फिरवा. टेबल, टीव्ही युनिट आणि शेल्फवरची धूळ हलक्या हाताने झटकून घ्या. वेळ कमी असेल तर फक्त दिसणारे भाग स्वच्छ करा.

शेवटचा टच-अप: सुगंध आणि लाईटिंग (२ मिनिटं)

खोलीच्या खिडक्या उघडून ताजी हवा येऊ द्या. रूम फ्रेशनर स्प्रे करा किंवा अगरबत्ती/सुगंधी मेणबत्ती लावा. घरात मंद प्रकाश आणि व्यवस्थित ठेवलेल्या गोष्टींमुळे घर लगेचच प्रसन्न आणि आकर्षक वाटतं.