उरलेल्या भाताचं काय करायचं? ट्राय करा ही सोपी रेसिपी, पोटही मस्त, होईलही फस्त!
मुंबई - अनेकदा रात्री केलेला भात शिल्लक राहतो. दुसऱ्या दिवशी तो गरम करुन खाण्याची इच्छा होत नाही. त्यामुळे त्यात घरचे काही पदार्थ मिसळून छान कुरकुरीत डोसे बनवता येतात. म्हणजे भातही वापरला जातो आणि सकाळचा फ्रेश ब्रेकफास्टही खाता येतो.

बनेल कुरकुरीत डोसा
जेवणानंतर उरलेला भात कसा वापरायचा हा अनेकांचा प्रश्न असतो. काही लोक तो भात कोणाला तरी देतात किंवा तो खराब झाला तर फेकून देतात. पण आज आम्ही तुम्हाला उरलेल्या भातापासून नवीन पदार्थ बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत. ती बनवणंही खूप सोपं आहे.
उरलेल्या भातापासून तुम्ही आधीच अनेक रेसिपी ट्राय केल्या असतील. पण डोसे ट्राय करणारे खूप कमी असतात. हो. डोसा करण्यासाठी तांदूळ भिजवून, वाटून, खमीर येऊन द्यायची गरज नाही. अशा प्रकारेही डोसे बनवता येतात. हे एक चविष्ट आणि पौष्टिक पदार्थ आहे.
तुमच्या घरीच आहे साहित्य
हे बनवणं खूप सोपं आहे आणि त्यात वापरले जाणारे साहित्यही सहज उपलब्ध होतात. त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा तुमचा भात उरला तर डोसे बनवायला विसरू नका, संपूर्ण कुटुंबासोबत या चविष्ट पदार्थाचा आस्वाद घ्या.
लागणारे साहित्य १ वाटी उरलेला भात १ वाटी रवा, १ वाटी दही, चवीनुसार मीठ, गरजेनुसार पाणी, १/४ टीस्पून बेकिंग सोडा.
जाणून घ्या सोपी पद्धत
बनवण्याची पद्धत १. उरलेला भात, रवा आणि दही एका मोठ्या भांड्यात घ्या. २. आता हे मिश्रण ब्लेंडर किंवा मिक्सरच्या भांड्यात घाला. ३. चवीनुसार मीठ आणि थोडे पाणी घाला. ४. गुळगुळीत आणि घट्ट पीठ होईपर्यंत ते वाटून घ्या. ५. वाटलेले पीठ परत भांड्यात काढा. ६. आता बेकिंग सोडा घालण्याची वेळ आहे. त्यात आता बेकिंग सोडा घालून चांगले मिसळा.
डोसा भाजण्यासाठी नॉन-स्टिक तवा किंवा पॅन गरम करा. थोडे तेल किंवा तूप लावा. तवा गरम झाला की एका मोठ्या चमच्याने पीठ घेऊन पसरवा. त्याला गोल आकार दिल्यानंतर, कडांना थोडे तेल लावा. मध्यम आचेवर एका बाजूने सोनेरी तपकिरी रंग येईपर्यंत भाजू द्या. नंतर तो पलटून दुसरी बाजूही भाजून घ्या.

