पोस्ट ऑफिसच्या मंथली इन्कम स्कीममध्ये (MIS) गुंतवणूक करणाऱ्यांना दर महिन्याला मिळणाऱ्या व्याजावर कोणतेही अतिरिक्त व्याज मिळत नाही. हे व्याज थेट बँक खात्यात जमा करण्यासाठी ऑटो-क्रेडिट सुविधा उपलब्ध आहे.
मुंबई : नियमित मासिक उत्पन्नाच्या अपेक्षेने 'पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीम'मध्ये (Post Office Monthly Income Scheme - MIS) गुंतवणूक करणाऱ्यांनी एक महत्त्वाचा नियम लक्षात ठेवला पाहिजे. दर महिन्याला जमा होणारे व्याज जर तुम्ही न काढता (Unclaimed) तसेच खात्यात सोडून दिले, तर त्या पैशांवर तुम्हाला कोणतेही अतिरिक्त व्याज मिळणार नाही.
साधारणपणे आरडी (RD) किंवा फेरगुंतवणुकीचा पर्याय असलेल्या एफडी (FD) खात्यांमध्ये व्याजावर चक्रवाढ व्याज (Compound interest) मिळते. पण, पोस्ट ऑफिस MIS योजनेत मासिक व्याजाची फेरगुंतवणूक करण्याची कोणतीही सोय नाही. त्यामुळे खातेदारांनी न काढलेले व्याज निष्क्रिय राहते आणि तुमच्या गुंतवणुकीचा एकूण नफा कमी होतो.
सरकारच्या पाठिंब्यावर चालणारी ही अल्पबचत योजना सध्या वार्षिक ७.४ टक्के व्याजदर देते आणि दर महिन्याला व्याज दिले जाते. ५ वर्षांचा लॉक-इन पिरियड असलेली ही योजना भांडवलवाढीपेक्षा स्थिर उत्पन्न हवं असणाऱ्यांसाठी उत्तम आहे. राष्ट्रीय बचत (मासिक उत्पन्न खाते) योजना, २०१९ च्या नियमांनुसार, खाते उघडल्याच्या तारखेपासून प्रत्येक महिना पूर्ण झाल्यावर व्याज दिले जाते; पण न काढलेल्या व्याजावर कोणतेही अतिरिक्त व्याज दिले जाणार नाही, असे नियमात स्पष्ट केले आहे.
किती व्याज मिळतं? न काढल्यास काय होतं?
वैयक्तिक खाते (Single-holder account) - यामध्ये जास्तीत जास्त ९ लाख रुपये गुंतवण्याची परवानगी आहे. सध्याच्या ७.४ टक्के व्याजदराने वार्षिक ६६,६०० रुपये व्याज मिळते, म्हणजेच दर महिन्याला ५,५५० रुपये हातात येतात. जर गुंतवणूकदारांनी हे ५,५५० रुपये काढले नाहीत, तर त्या रकमेवर कोणतेही अतिरिक्त व्याज मिळणार नाही.
संयुक्त खाते (Joint account) - यामध्ये जास्तीत जास्त १५ लाख रुपये गुंतवता येतात. ७.४ टक्के व्याजदराने वार्षिक १,११,००० रुपये म्हणजेच दर महिन्याला ९,२५० रुपये व्याज मिळते. इथेही व्याजाचे पैसे तसेच सोडले तर ते वाढणार नाहीत.
मासिक व्याजाचे पैसे सहज कसे मिळवायचे?
महिन्याचं व्याज मिळवण्यासाठी गुंतवणूकदारांना दर महिन्याला पोस्ट ऑफिसमध्ये खेटे मारण्याची गरज नाही. भारतीय टपाल विभागाने (India Post) इलेक्ट्रॉनिक क्रेडिट सुविधेद्वारे दर महिन्याचं व्याज थेट तुमच्या पोस्ट ऑफिस बचत खात्यात (Savings Account) किंवा बँक खात्यात जमा करण्याचा पर्याय दिला आहे.
निवृत्तांसाठी वरदान - घरभाडे, औषधे आणि रोजच्या खर्चासाठी या पैशांवर अवलंबून असलेल्या ज्येष्ठ नागरिक आणि निवृत्तांसाठी ऑटो-क्रेडिट सुविधा अत्यंत फायदेशीर आहे.
फेरगुंतवणूक योजना - तुम्हाला दर महिन्याला या पैशांची गरज नसल्यास, पैसे तसेच ठेवण्यापेक्षा ऑटो-ट्रान्सफरद्वारे दुसऱ्या बचत किंवा गुंतवणूक योजनेत वळवणे शहाणपणाचे ठरेल. (पण पर्यायी गुंतवणुकीचा नफा हा तिच्या व्याजदर, जोखीम आणि कराच्या नियमांवर अवलंबून असतो).
पैसे न काढले तरी मासिक व्याजावर कर लागतो का?
MIS गुंतवणूकदारांनी जाणून घ्यावा असा आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे टॅक्स. पोस्ट ऑफिस MIS योजनेत मिळणारे व्याज हे गुंतवणूकदाराच्या प्राप्तिकर स्लॅबनुसार (Income tax slab) पूर्णपणे करपात्र असते. या योजनेला प्राप्तिकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत कोणतीही कर सवलत मिळत नाही.
"मी महिन्याचे व्याज न काढता तसेच सोडले तर टॅक्स वाचवू शकेन किंवा पुढे ढकलू शकेन" असा गैरसमज बाळगू नका. उदाहरणार्थ, ९ लाख रुपयांच्या ठेवीवर वार्षिक ६६,६०० रुपये व्याज मिळाले, तर पैसे काढले काय किंवा नाही काढले काय, तुमच्या एकूण करपात्र उत्पन्नाच्या गणनेत ही रक्कम दाखवावीच लागेल. ७.४ टक्के हा करपूर्व (Pre-tax) व्याजदर आहे.
गुंतवणूक करण्यापूर्वी हे नियम लक्षात ठेवा
मुदतीपूर्व खाते बंद करणे (Premature Closure) - या योजनेचा कालावधी ५ वर्षांचा असल्याने तुमच्या पैशांच्या तातडीच्या गरजांचा आधीच अंदाज घ्या. खाते उघडल्याच्या पहिल्या १ वर्षाच्या आत खाते बंद करता येत नाही. १ वर्षानंतर आणि ३ वर्षांच्या आत खाते बंद केल्यास जमा रकमेतून २ टक्के दंड कापला जातो. ३ वर्षानंतर आणि ५ वर्षांच्या आत बंद केल्यास १ टक्के कपात लागू होते.
स्थिर व्याजदर - सरकार दर तिमाहीला अल्पबचत योजनांच्या व्याजदरांचा आढावा घेत असली तरी, तुम्ही खाते उघडताना जो व्याजदर होता तोच पूर्ण ५ वर्षांसाठी स्थिर राहतो. मुदत संपल्यानंतर तुमची मूळ जमा रक्कम तुम्हाला पूर्णपणे परत केली जाते.









