- Home
- Utility News
- PM Kisan 21st Installment 2025: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! या आठवड्यातच खात्यात 2000 रुपये येणार का?, जाणून घ्या ताजं अपडेट
PM Kisan 21st Installment 2025: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! या आठवड्यातच खात्यात 2000 रुपये येणार का?, जाणून घ्या ताजं अपडेट
PM Kisan 21st Installment: देशातील 9.7 कोटी शेतकरी PM किसान योजनेच्या 21व्या हप्त्याची वाट पाहतायत. काही राज्यांत हा हप्ता आधीच जमा झाला असला तरी, महाराष्ट्र, इतर राज्यांतील शेतकऱ्यांना नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात ₹2000 मिळण्याची शक्यता आहे.

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी!
मुंबई: देशातील जवळपास 9.7 कोटी शेतकरी आता ‘प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 21व्या हप्त्याची’ आतुरतेने वाट पाहत आहेत. दर चार महिन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात ₹2000 जमा होतात, मात्र यावेळी हप्ता उशिरा मिळाल्याने अनेकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. केंद्र सरकारकडून अद्याप अधिकृत घोषणा झालेली नसली, तरी विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची पूर्ण शक्यता आहे.
काही राज्यांना आधीच मिळाला हप्ता
पीएम किसान योजनेअंतर्गत काही राज्यांतील शेतकऱ्यांना आधीच 21वा हप्ता मिळाल्याचं समोर आलं आहे. हिमाचल प्रदेश, पंजाब आणि उत्तराखंड या राज्यांमध्ये अलीकडील अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं होतं. त्यामुळे केंद्र सरकारने या राज्यांतील लाभार्थ्यांना प्राधान्याने 2000 रुपयांचा हप्ता वितरित केला आहे. तसेच, जम्मू-काश्मीरमधील शेतकऱ्यांना 7 ऑक्टोबर रोजीच हा हप्ता जमा झाला आहे. मात्र महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, बिहार आणि इतर राज्यांतील शेतकऱ्यांच्या खात्यात अजूनही रक्कम जमा झालेली नाही.
हप्ता कधी मिळणार?
मिळालेल्या माहितीनुसार, 21वा हप्ता नोव्हेंबरच्या पुढच्या आठवड्यात देशभरातील सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल. मुळात हा हप्ता ऑक्टोबरच्या अखेरीस देण्याची तयारी होती, पण काही तांत्रिक कारणं आणि राज्यांमधील पडताळणी प्रक्रियेच्या विलंबामुळे तो पुढे ढकलण्यात आला.
सध्या केंद्र सरकारकडून अंतिम यादी तयार केली जात आहे. मंजुरी मिळाल्यानंतर निधी थेट DBT (Direct Benefit Transfer) पद्धतीने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल.
KYC पूर्ण करणे का गरजेचे आहे?
सरकारने स्पष्ट केलं आहे की, e-KYC पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांनाच हप्ता मिळेल.
ज्यांनी अद्याप ही प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, त्यांना रक्कम थांबू शकते.
शेतकरी pmkisan.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन OTP आधारित KYC करू शकतात किंवा जवळच्या CSC केंद्रावर बायोमेट्रिक पडताळणी करून प्रक्रिया पूर्ण करू शकतात.
कोण आहेत पात्र शेतकरी?
21वा हप्ता खालील शेतकऱ्यांनाच मिळणार आहे.
ज्यांनी याआधीचे सर्व हप्ते नियमित घेतले आहेत.
ज्यांची जमीन व लाभार्थी माहिती पोर्टलवर योग्यरीत्या सत्यापित आहे.
ज्यांच्या बँक खात्याची आणि आधार क्रमांकाची माहिती जुळते.
चुकीची माहिती दिलेल्या किंवा खात्याच्या तपशीलात विसंगती असलेल्या शेतकऱ्यांचा हप्ता थांबवला जाऊ शकतो.
शेतकऱ्यांची मागणी
दरवर्षी शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत ₹6,000 रुपये (तीन हप्त्यांमध्ये) मिळतात. सध्या रब्बी हंगामाची सुरुवात असल्याने बियाणे, खतं आणि सिंचनासाठी निधीची गरज वाढली आहे. त्यामुळे शेतकरी वर्गाने केंद्र सरकारकडे हप्ता लवकर जारी करण्याची मागणी केली आहे.

