भारताशी वारंवार कुरापत काढणारे शेजारी राष्ट्र म्हणजे पाकिस्तान. याच देशाच्या हवाई दलाचे प्रमुख झहीर अहमद बाबर सिद्धू आणि बांगलादेश हवाई दलाचे प्रमुख हसन महमूद खान यांनी ही चर्चा केली. पाकिस्तानने जलद डिलिव्हरी आणि प्रशिक्षणाचे आश्वासन दिले आहे.
इस्लामाबाद: बांगलादेशने पाकिस्तानकडून लढाऊ विमाने खरेदी करण्यास स्वारस्य दाखवले आहे. यासंदर्भात पाकिस्तान आणि बांगलादेशच्या हवाई दल प्रमुखांनी चर्चा केल्याची माहिती पाक लष्कराने दिली. पाकिस्तान बांगलादेशला JF-17 लढाऊ विमाने विकणार आहे. JF-17 हे चीनसोबत संयुक्तपणे विकसित केलेले एक मल्टी-रोल लढाऊ विमान आहे. पाकिस्तान हवाई दलाचे प्रमुख झहीर अहमद बाबर सिद्धू आणि बांगलादेश हवाई दलाचे प्रमुख हसन महमूद खान यांनी ही चर्चा केली. पाकिस्तानने जलद डिलिव्हरी आणि प्रशिक्षणाचे आश्वासन दिले आहे.
"ही भेट पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील मजबूत ऐतिहासिक संबंध अधोरेखित करते. संरक्षण सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी आणि दीर्घकालीन सामरिक भागीदारी निर्माण करण्याच्या दृढनिश्चयाचा हा पुरावा आहे," अशी प्रतिक्रिया पाक लष्कराने दिली आहे. नोबेल पारितोषिक विजेते मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम प्रशासनांतर्गत, बांगलादेशात १२ फेब्रुवारी रोजी सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत.
बांगलादेश ते पाकिस्तान विमानसेवा
ऑगस्ट २०२४ मध्ये झालेल्या मोठ्या आंदोलनानंतर तत्कालीन बांगलादेशी पंतप्रधान शेख हसीना भारतात पळून गेल्याने भारत-बांगलादेश संबंधात तणाव निर्माण झाला होता. यानंतर बांगलादेश पाकिस्तानच्या अधिक जवळ आला. पाकिस्तान आणि बांगलादेशने थेट व्यापार पुन्हा सुरू केला. दोन्ही देशांच्या लष्करी अधिकाऱ्यांनी अनेकवेळा चर्चा केली. बांगलादेश ते पाकिस्तान थेट विमानसेवा देखील पुन्हा सुरू होणार आहे.
पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले की, शस्त्रास्त्र व्यापारातील यश पाकिस्तानची आर्थिक स्थिती बदलेल. "आमच्या विमानांची चाचणी झाली आहे. आम्हाला मोठ्या प्रमाणात ऑर्डर्स मिळत असल्याने, सहा महिन्यांत पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची (IMF) गरज भासणार नाही."
