- Home
- Utility News
- UPI SMS Alert : 500 रुपयांच्या आत युपीआय ट्रान्झॅक्शन केल्यास आता SMS येणार नाही.. १ जानेवारीपासून नवा नियम!
UPI SMS Alert : 500 रुपयांच्या आत युपीआय ट्रान्झॅक्शन केल्यास आता SMS येणार नाही.. १ जानेवारीपासून नवा नियम!
UPI SMS Alert: 1 जानेवारी 2027 पासून HDFC बँकेत ₹500 किंवा त्याहून कमी रकमेच्या UPI ट्रान्झॅक्शनसाठी SMS अलर्ट येणार नाही. ₹500 पेक्षा जास्त रकमेच्या ट्रान्झॅक्शनसाठी SMS सुरू राहतील. सर्व ट्रान्झॅक्शनचे ई-मेल नोटिफिकेशन मात्र मिळत राहील.

UPI New Rules 2027: युपीआयचे नवे नियम
Google Pay, PhonePe, Paytm सारख्या UPI ॲप्सवरून पैसे पाठवल्यावर आता बँकेकडून SMS येणार नाही, अशी माहिती समोर आली आहे.
विशेषतः छोट्या व्यवहारांवर SMS अलर्ट थांबवण्याची परवानगी बँकांना देण्यात आली आहे. त्यामुळे दिवसातून अनेकदा UPI ने पेमेंट करणाऱ्या लोकांचे लक्ष या घोषणेने वेधून घेतले आहे.
पण, याचा अर्थ असा नाही की सर्वच UPI व्यवहारांसाठी SMS बंद होतील. 500 रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या व्यवहारांसाठी SMS पाठवण्याची पद्धत सुरूच राहील.
हा बदल कधी लागू होईल, कोणत्या बँकांना लागू होईल आणि पैसे पाठवल्याचा तपशील आता कसा जाणून घ्यायचा हे सविस्तर पाहूया.

RBI चा नियम
RBI चा नवा नियम काय आहे?
भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) च्या नव्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, इलेक्ट्रॉनिक बँकिंग व्यवहारांसाठी SMS सूचनांसंदर्भात बदल करण्यात आला आहे.
500 रुपयांपर्यंत SMS नाही
यानुसार, 1 जानेवारी 2027 पासून 500 रुपये किंवा त्यापेक्षा कमी रकमेच्या छोट्या व्यवहारांसाठी SMS अलर्ट थांबवले जातील. त्यामुळे 500 रुपये किंवा त्यापेक्षा कमी रकमेच्या UPI व्यवहारांसाठी आता बँकेकडून SMS येणार नाहीत.
रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे की, छोट्या व्यवहारांसाठी SMS पाठवण्याचा निर्णय बँका त्यांच्या अंतर्गत धोरणाच्या आधारे घेऊ शकतात.
500 रुपयांपेक्षा जास्त रकमेवर SMS मिळेल
पण, 500 रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या सर्व UPI व्यवहारांसाठी नेहमीप्रमाणे तत्काळ SMS अलर्ट मिळणे सुरूच राहील. RBI ने स्पष्ट केले आहे की केवळ 500 रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या इलेक्ट्रॉनिक व्यवहारांसाठी SMS पाठवणे अनिवार्य आहे.
HDFC बँक
HDFC बँकेत काय बदल झालाय?
RBI च्या नव्या मार्गदर्शक तत्त्वानंतर, HDFC बँकेने आपल्या ग्राहकांसाठी एक नवी घोषणा केली आहे. त्यानुसार, 1 जानेवारी 2027 पासून HDFC बँकेचे ग्राहक 500 रुपये किंवा त्यापेक्षा कमी रकमेचे UPI पेमेंट करतील तेव्हा बँकेकडून SMS अलर्ट येणार नाही, असे सांगण्यात आले आहे.
HDFC बँकेच्या घोषणेनुसार, सर्व UPI व्यवहारांसाठी ईमेल सूचना पाठवणे सुरूच राहील. म्हणजेच SMS आला नाही तरीही ईमेलद्वारे व्यवहाराची माहिती मिळू शकेल.
इतर बँकांनाही हा नियम लागू होईल का?
RBI ने जारी केलेली ही मार्गदर्शक तत्त्वे बँकांसाठी सामान्य नियम आहेत. त्यामुळे, इतर बँकाही त्यांच्या अंतर्गत धोरणानुसार 500 रुपये किंवा त्यापेक्षा कमी रकमेच्या इलेक्ट्रॉनिक व्यवहारांसाठी SMS पाठवणे थांबवू शकतात. त्यामुळे प्रत्येक बँकेच्या घोषणेकडे ग्राहकांनी लक्ष द्यावे.
व्यवहार
व्यवहाराचा तपशील कसा जाणून घ्यायचा?
SMS सूचना आल्या नाहीत तरीही ग्राहक त्यांच्या पैशांच्या व्यवहाराची माहिती अनेक मार्गांनी मिळवू शकतात.
UPI ॲपद्वारे तपासू शकता
आता Google Pay, PhonePe सारख्या UPI ॲप्सवरून आणि बँकेच्या अधिकृत मोबाईल बँकिंग ॲपद्वारे इन्स्टंट नोटिफिकेशन्स मिळू शकतात.
ईमेल (Email) सूचना
जर ग्राहकाने ईमेल पत्ता दिला असेल, तर रक्कम कितीही असो, सर्व UPI व्यवहारांसाठी नोंदणीकृत ईमेल आयडीवर ईमेल सूचना पाठवली पाहिजे. त्यामुळे बँकेत नोंदणी केलेला ईमेल आयडी बरोबर आणि वापरात असल्याची खात्री करा.
बँक खाते स्टेटमेंट
Net Banking किंवा बँक खाते स्टेटमेंट (Bank Statement) द्वारे पैसे कधी पाठवले, किती रक्कम पाठवली हे जाणून घेता येते.
ग्राहकांनी लक्ष द्याव्यात अशा महत्त्वाच्या गोष्टी
- बँकेत नोंदवलेला मोबाईल क्रमांक आणि ईमेल पत्ता बरोबर असल्याची खात्री करा.
- UPI ॲप्समध्ये व्यवहाराचा इतिहास वेळोवेळी तपासा.
- छोट्या रकमेचे SMS न आल्यास घाबरून जाऊ नका.
- बँक खात्यात संशयास्पद पैशांचा व्यवहार दिसल्यास तातडीने बँकेशी संपर्क साधा.
- OTP, UPI PIN, बँक पासवर्ड कोणाशीही शेअर करू नका.
नवा नियम का?
हा नवा नियम का आणला जात आहे?
छोट्या रकमेच्या प्रत्येक व्यवहारासाठी SMS पाठवण्याची सक्ती बँकांना राहणार नाही. यात लक्ष देण्यासारखी गोष्ट म्हणजे, 500 रुपयांपेक्षा कमी रकमेच्या व्यवहारांवर SMS पाठवण्यास RBI ने बंदी घातलेली नाही.
बँकांना वाटल्यास त्या SMS पाठवणे सुरू ठेवू शकतात. पण त्यासाठी ग्राहकांकडून कोणतेही शुल्क आकारले जाऊ नये, हेही नियमावलीत स्पष्ट करण्यात आले आहे.

