नायकीने भारतातील फिटनेस प्रेमींसाठी 'वेगम रन' हे खास रनिंग शूज लाँच केले आहेत. उत्तम कुशनिंग आणि हवा खेळती राहणाऱ्या या शूजची किंमत किती आहे? सध्या हे शूज फ्लिपकार्ट आणि निवडक स्टोअर्सवर उपलब्ध आहेत.
मुंबई : भारतातील फिटनेस प्रेमी आणि रनर्ससाठी जागतिक दर्जाच्या नायकी (Nike) ब्रँडने आपले पहिले खास रनिंग शूज बाजारात आणले आहेत. 'वेगम रन' (Vegam Run) असं या शूजचं नाव असून, यात उत्तम कुशनिंग, हवा खेळती राहण्याची सोय आणि टिकाऊपणाची खात्री मिळते. भारतीय मार्केट डोळ्यांसमोर ठेवून नायकीने पहिल्यांदाच असे शूज तयार केले आहेत. रोजच्या वापरासाठी आणि धावण्यासाठी हे शूज एकदम परफेक्ट आहेत. याची किंमत ३,७९५ रुपये ठेवण्यात आली आहे.
डिझाईन
भारतातील वेगवेगळ्या भागांतील रनर्सशी थेट चर्चा करून, त्यांच्या ट्रेनिंगच्या पद्धती आणि जीवनशैली समजून घेऊन या शूजचं डिझाईन तयार करण्यात आलं आहे. या शूजचा वरचा भाग वजनाला हलका असून त्यात हवा खेळती राहते. पायांना झटके बसू नयेत म्हणून प्लश फोम बेड दिला आहे. शूज जास्त काळ टिकावेत यासाठी पेरिमीटर रबर आणि स्टॅक्ड टेक्स्चर्ड आऊटसोलचा वापर केला आहे. शूज सहज घालता आणि काढता यावेत यासाठी टॅब सिस्टीमही दिली आहे. या शूजचं डिझाईन अतिशय आधुनिक आणि सिम्पल असून ते आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध आहेत.
रेकॉर्ड वेळेत निर्मिती
नायकीने या शूजच्या डिझाईनपासून ते प्रत्यक्ष निर्मितीपर्यंतचा टप्पा अवघ्या ५५ दिवसांत पूर्ण केला. हे शूज बाजारात आणण्यासाठी त्यांना फक्त पाच महिने लागले. नायकीचे हे 'वेगम रन' शूज १ नोव्हेंबरपासून भारतात मिळायला सुरुवात झाली आहे. सध्या तुम्ही हे शूज फ्लिपकार्ट (Flipkart) आणि काही निवडक रिटेल स्टोअर्समधून खरेदी करू शकता. पुढच्या वर्षाच्या सुरुवातीला नायकीच्या इतर भागीदारांमार्फत हे शूज संपूर्ण भारतात उपलब्ध होतील. विशेष म्हणजे, २०२७ मध्ये 'वेगम रन' जगभरातील इतर मार्केटमध्येही लाँच केले जातील.






