Cashew Capital : भारताची काजू राजधानी कोणती माहितीये का? इथूनच जगभरात होते निर्यात
लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच काजू खायला आवडतात. मिठाई, बिर्याणी, खीर अशा अनेक पदार्थांमध्ये काजूचा वापर होतो. आपण एवढ्या आवडीने खातो, त्या काजूची राजधानी आपल्याच देशात आहे. ती नेमकी कुठे आहे?

भारताची काजू राजधानी
आपण अनेक पदार्थांमध्ये काजू वापरतो. यामुळे जेवणाची चव वाढते. काजूला फक्त देशातच नाही, तर आंतरराष्ट्रीय बाजारातही मोठी मागणी आहे. या काजूमागे एक मोठा उद्योग आहे आणि आपल्या देशात त्याची एक खास राजधानी आहे. ती म्हणजे केरळमधील कोल्लम शहर. याला भारताचे काजू केंद्र आणि जगाची काजू राजधानी असंही म्हणतात. इथे अनेक दशकांपासून काजूवर प्रक्रिया, गुणवत्ता तपासणी, पॅकिंग आणि निर्यातीचं काम मोठ्या प्रमाणावर चालतं.

कोल्लमची खास ओळख
केरळमधील कोल्लम शहराचं आणि काजू उद्योगाचं खूप जुनं नातं आहे. इथे १९२० च्या सुमारास काजू उद्योगाचा वेगाने विकास झाला. एकेकाळी इथे शेकडो प्रोसेसिंग युनिट्स सुरू होते. परदेशी बाजारात दर्जेदार काजू पुरवण्यात कोल्लमने आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. म्हणूनच या शहराला जगाची काजू राजधानी म्हटलं जातं.
काजू प्रोसेसिंग म्हणजे काय?
बागेतून आणलेल्या काजूच्या बोंडातून बी वेगळी केली जाते. ती स्वच्छ करून, वाळवून आणि वाफेवर शिजवून त्यावर प्रक्रिया करतात. त्यानंतर कडक टरफल काढून आतला काजू बाहेर काढतात. त्यावरचा पातळ पापुद्रा काढून आकार, रंग आणि दर्जानुसार त्यांची विभागणी होते. शेवटी पॅकिंग करून ते बाजारात पाठवले जातात.
कोल्लम परिसरातील अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह याच उद्योगावर चालतो. हा काजू उद्योग केवळ व्यवसायापुरता मर्यादित नसून, त्याने स्थानिक लोकांची आर्थिक स्थिती, महिलांना रोजगार आणि कुटुंबांचे जीवनमान सुधारण्यात मोठी भूमिका बजावली आहे.
या देशांमध्ये आहे मोठी मागणी
आपल्या देशातून अनेक देशांमध्ये काजूची निर्यात होते. संयुक्त अरब अमिराती (UAE), नेदरलँड्स, जपान, स्पेन आणि सौदी अरेबियासारख्या देशांमध्ये भारतीय काजूला मोठी मागणी आहे. या व्यवसायातून देशाला परकीय चलन मिळतं. शिवाय शेतकरी, व्यापारी आणि प्रोसेसिंग उद्योगांनाही चांगला फायदा होतो. म्हणूनच भारताच्या काजू उद्योगाच्या इतिहासात कोल्लम शहराचं स्थान नेहमीच खास राहील.

