New Telecom Rule : १ नोव्हेंबरपासून नवा नियम.. कॉलिंगचे नियम बदलणार!
New Telecom Rule: १ नोव्हेंबरपासून आणखी एक नवा नियम लागू होणार आहे. फोन आल्यावर स्क्रीनवर कॉलरचं खरं नाव दिसणार आहे. फेक कॉल्सना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने हा मोठा निर्णय घेतलाय. जाणून घ्या सविस्तर माहिती.

१ नोव्हेंबरपासून कॉलिंगचे नियम बदलणार
तुमच्या फोनवर कुणाचाही कॉल आला, तर आता नंबरसोबत त्यांचं खरं नावही स्क्रीनवर स्पष्ट दिसेल. तुम्ही सिम कार्ड घेताना जे आयडी प्रूफ दिलं होतं, त्यावर असलेलंच नाव समोरच्या व्यक्तीच्या फोनवर दिसेल. सायबर फसवणूक आणि फेक कॉल्स सहज ओळखता यावेत, यासाठी केंद्र सरकारने हा नवा नियम आणला आहे.
दूरसंचार विभागाने टेलिकॉम ऑपरेटर्सना स्पष्ट आदेश दिले आहेत. १ नोव्हेंबरपासून कंपन्यांनी ही नवी सेवा सुरू करणं बंधनकारक आहे. ही सेवा वापरण्यासाठी युजर्सना कोणतंही ॲप डाऊनलोड करण्याची गरज नाही. तसंच फोनमध्ये कोणतेही सेटिंग्स बदलण्याची गरज नाही. हे सगळं ऑटोमॅटिक काम करेल.

CNAP टेक्नॉलॉजी कशी काम करते?
सरकारने टेलिकॉम कंपन्यांसाठी 4G आणि 5G नेटवर्कवर 'कॉलिंग नेम प्रेझेंटेशन' अनिवार्य केलं आहे. यालाच शॉर्टकटमध्ये CNAP म्हणतात. यामुळे कोणत्याही अनोळखी नंबरवरून फोन आला, तरी तो नंबर ज्याच्या नावावर रजिस्टर आहे, त्याचं नाव स्क्रीनवर झळकेल.
जर तो नंबर तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये सेव्ह असेल, तर तुम्ही सेव्ह केलेलंच नाव दिसेल. पण नंबर सेव्ह नसेल, तर सिम घेताना दिलेलं मूळ नाव स्क्रीनवर दिसेल. जर परदेशातून म्हणजेच इंटरनॅशनल कॉल्स आले, तर मात्र कोणतीही नावं दिसणार नाहीत. स्क्रीनवर फक्त 'इंटरनॅशनल कॉल' असं लिहून येईल.
प्रायव्हसी आणि बिझनेस युजर्ससाठी नियम
युजर्सची प्रायव्हसी सुरक्षित राहावी यासाठी सरकारने योग्य ती काळजी घेतली आहे. कॉल कट होताच, टेलिकॉम सिस्टीमच्या मेमरीमधून ते नाव ऑटोमॅटिक डिलीट होईल. यामुळे तुमचा पर्सनल डेटा कुठेही लीक होणार नाही. जर कुणी CLIR सर्व्हिस घेऊन आपलं नाव लपवलं असेल, तर त्यांचं नाव स्क्रीनवर दिसणार नाही.
बिझनेस आणि बल्क कनेक्शन वापरणाऱ्यांसाठी काही खास सवलती दिल्या आहेत. व्यावसायिक संस्था आपला ट्रेडमार्क किंवा रजिस्टर बिझनेस नाव स्क्रीनवर दाखवू शकतात. यासाठी त्यांना GST पोर्टल किंवा ट्रेडमार्क रजिस्ट्रीचे डॉक्युमेंट्स टेलिकॉम ऑपरेटर्सना देऊन व्हेरिफाय करावं लागेल. सध्या हा नियम फक्त 4G आणि 5G नेटवर्कलाच लागू आहे. 2G, 3G आणि लँडलाईनवर लवकरच निर्णय घेतला जाईल.
लोकांसाठी फायदे आणि महत्त्वाच्या टिप्स
ही नवी सिस्टीम आल्यामुळे खूप फायदे होणार आहेत. ट्रायने (TRAI) गेल्या काही महिन्यांपासून यावर ट्रायल्स घेतल्या आणि ऑक्टोबर २०२५ मध्ये याला मंजुरी दिली. यामुळे सायबर फ्रॉड, स्पॅम कॉल्स आणि धमकीच्या कॉल्सना पूर्णपणे आळा बसेल. लोकांना आता ट्रूकॉलरसारख्या थर्ड पार्टी ॲप्सवर अवलंबून राहावं लागणार नाही.
युजर्सनी एक छोटी गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. तुमचं सिम कार्ड तुमच्या किंवा कुटुंबातील सदस्याच्या नावावर असेल, तर १ नोव्हेंबरपासून तीच नावं इतरांना दिसतील. त्यामुळे तुमच्या सिमचे KYC डिटेल्स वेळोवेळी अपडेट ठेवणं फायद्याचं ठरेल. बिझनेस ओनर्सनीही आपल्या GST डॉक्युमेंट्ससोबत ब्रँड नेम लगेच अपडेट करून घ्यावं.







