सध्या हिवाळा सुरू आहे. सकाळी कडाक्याची थंडी असते. त्यामुळे अनेकजण सायंकाळी चालण्याचा व्यायाम करतात.  वजन कमी करण्यासाठी सकाळची की संध्याकाळची वेळ जास्त फायदेशीर आहे. जाणून घ्या. 

केवळ वजन कमी करण्यासाठीच नाही, तर संपूर्ण आरोग्यासाठी चालणे हा एक उत्तम व्यायाम समजला जातो. वजन कमी करण्यासाठी काहीजण सकाळी चालतात, तर काहीजण संध्याकाळी. सकाळी चालण्यामुळे शरीर आणि मनाला ताजेपणा मिळतो. दिवसभर चांगला मूड टिकवून ठेवण्यासही मदत होते. रोगप्रतिकारशक्तीसाठी आवश्यक असलेले व्हिटॅमिन डी शरीराला मिळवण्यासाठीही हे योग्य आहे. त्यामुळे त्यामुळे सकाळ व संध्याकाळ, दोन्ही वेळी चालणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.

सकाळी चालण्याचा चयापचय क्रिया आणि वर्तनावर सकारात्मक परिणाम होतो. एका अभ्यासात असे आढळून आले आहे की, सकाळी चालण्यामुळे शरीरातील चरबी वेगाने कमी होते आणि कार्डिओमेटाबोलिक मार्कर्समध्ये काही सुधारणा होतात.

सकाळी चालण्यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती मोठ्या प्रमाणात सुधारते आणि ऊर्जा व ताकद मिळण्यास मदत होते. हृदयाचे ठोके आणि रक्तदाब नियंत्रणात ठेवून हृदयाचे आरोग्य जपण्यासाठी सकाळी चालणे उपयुक्त ठरते.

सकाळी चालणे, विशेषतः रिकाम्या पोटी केल्यास, चयापचय क्रिया वाढवून आणि कॅलरीज बर्न करून वजन कमी करण्यास मदत करते. नियमितपणे सकाळी चालल्याने पोटावरील चरबी कमी होण्यासही मदत होते.

परंतु केवळ सकाळीच नाही, तर संध्याकाळी चालण्याचेही काही आरोग्यदायी फायदे आहेत. संध्याकाळी चालण्यामुळे तणाव कमी होण्यास मदत होते. चालण्यामुळे एंडोर्फिन नावाचा 'हॅपी हार्मोन' स्रवतो. यामुळे तणाव दूर होतो आणि मूड सुधारतो. कामाच्या तणावातून किंवा थकव्यातून आराम मिळवण्यासाठी संध्याकाळी चालणे फायदेशीर ठरते.