मेटा आणि रे-बॅनच्या स्मार्ट ग्लासेसद्वारे रेकॉर्ड केलेले व्हिडिओ केनियातील कंत्राटी कामगार 'डेटा लेबलिंग'साठी पाहत असल्याचे समोर आले आहे. या कामगारांनी वापरकर्त्यांचे अत्यंत खाजगी क्षण, अगदी नग्नता आणि आर्थिक तपशीलही पाहिल्याचे उघड केले आहे. 

जर तुम्ही 'मेटा'चे (Meta) हाय-टेक स्मार्ट ग्लासेस वापरत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी धोक्याची घंटा आहे. तुम्ही तुमच्या वैयक्तिक आयुष्यातील ज्या क्षणांना 'खाजगी' समजता, ते क्षण प्रत्यक्षात हजारो किलोमीटर दूर असलेल्या केनियातील कामगार चक्क पडद्यावर पाहत आहेत!

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

नेमकं प्रकरण काय?

मेटा (Meta) आणि रे-बॅन (Ray-Ban) यांच्या भागीदारीतून तयार झालेल्या एआय स्मार्ट चष्म्यांनी जगभरात धुमाकूळ घातला आहे. पण स्विडिश वृत्तपत्रे 'गोटेबॉर्ग्स-पोस्टन' आणि 'स्वेन्स्का डॅगब्लाडेट'च्या एका खळबळजनक अहवालानुसार, या चष्म्याने रेकॉर्ड केलेले तुमचे व्हिडिओ केनियामधील 'Sama' या कंत्राटी कंपनीतील कामगारांकडे 'डेटा लेबलिंग'साठी पाठवले जातात.

कामगारांचे धक्कादायक खुलासे

या कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी जे काही सांगितलंय, ते ऐकून तुमचे डोळे विस्फारतील.

नको तेवढी गुप्तता: "आम्ही लोकांच्या लिव्हिंग रूमपासून ते त्यांच्या नग्न शरीरापर्यंत सगळं पाहतो. चष्मा घालून समागम करतानाचे सीनही रेकॉर्ड होऊन आमच्याकडे येतात," असं एका कामगाराने सांगितलं.

वॉशरूम आणि बेडरुममधील फुटेज: लोक कपडे बदलताना किंवा टॉयलेटला गेलेले असतानाचे व्हिडिओही यात असतात. वापरकर्त्यांना याची कल्पनाही नसते की त्यांचं रेकॉर्डिंग सुरू आहे.

आर्थिक धोका: अनेक व्हिडिओंमध्ये लोकांचे बँक कार्ड्स आणि पिन नंबरही स्पष्ट दिसतात. जर हे व्हिडिओ लीक झाले, तर मोठा आर्थिक घोटाळा होऊ शकतो.

"गप्प बसा नाहीतर नोकरी जाईल!"

तिथल्या कामगारांनी असंही सांगितलं की, कोणाचं खाजगी आयुष्य पाहणं त्यांना चुकीचं वाटतं, पण जर त्यांनी प्रश्न विचारले तर त्यांना नोकरीवरून काढून टाकण्याची धमकी दिली जाते.

मेटा (Meta) काय म्हणते?

मेटाने त्यांच्या 'प्रायव्हसी पॉलिसी'मध्ये अत्यंत अस्पष्ट शब्दांत हे मान्य केलं आहे की, "काही प्रकरणांमध्ये एआयमधील संवादांचे आणि मजकुराचे 'मॅन्युअल रिव्ह्यू' (मानवी पुनरावलोकन) केले जाऊ शकतात." कंपनीने वापरकर्त्यांना असा सल्ला दिला आहे की, "तुम्हाला जी माहिती खाजगी ठेवायची आहे, ती एआयसोबत शेअर करू नका."

२०२५ मध्ये विक्रीचा उच्चांक

आश्चर्य म्हणजे, २०२५ मध्ये मेटाने या चष्म्यांचे तब्बल ७० लाख युनिट्स विकले आहेत. पण वाढत्या विक्रीसोबतच गोपनीयतेचा हा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे.