इलेक्ट्रिक वाहन बाजारात आपला दबदबा निर्माण करण्यासाठी मारुती सुझुकी नवीन ७ सीटर इलेक्ट्रिक एमपीव्ही (MPV) लाँच करण्याच्या तयारीत आहे. 'YMC' या कोडनेमने ओळखल्या जाणाऱ्या या कारमध्ये ५०० किलोमीटरहून अधिक रेंज आणि भन्नाट फीचर्स मिळण्याची शक्यता आहे. कमी बजेटमध्ये येणारी ही कार प्रामुख्याने फॅमिली ग्राहकांना डोळ्यासमोर ठेवून डिझाइन केली आहे.
इलेक्ट्रिक वाहन (EV) मार्केटमध्ये मारुती सुझुकी आता जोरदार एन्ट्री करणार आहे. येत्या तीन वर्षांत कंपनी अनेक नवीन मॉडेल्स बाजारात आणणार आहे. यात ७ नवीन एसयूव्ही (SUV) गाड्यांचा समावेश असेल. हायब्रिड, इलेक्ट्रिक, सीएनजी (CNG) आणि आयसीई (ICE) अशा विविध इंजिन पर्यायांसह मारुती आपला पोर्टफोलिओ वाढवणार आहे. सध्या मारुती सुझुकीची 'ई-वितारा' (e-Vitara) ही एकमेव इलेक्ट्रिक कार आहे. यानंतर आता तीन रांगा असलेली (३-रो) नवीन ७ सीटर इलेक्ट्रिक एमपीव्ही बाजारात येईल. 'YMC' या कोडनेमने ओळखल्या जाणाऱ्या या मॉडेलची या वर्षाच्या अखेरीस झलक पाहायला मिळू शकते. तर, पुढच्या वर्षाच्या सुरुवातीला या कारची विक्री सुरू होण्याची शक्यता आहे.
मारुतीची सर्वात स्वस्त ७ सीटर कार
भारतीय बाजारात मारुती सुझुकीची ही सर्वात छोटी आणि स्वस्त ७ सीटर कार असू शकते. याच्या बेस व्हेरियंटची किंमत साधारण १४ लाख रुपयांच्या आसपास असण्याची शक्यता आहे. यामुळे जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचा कंपनीचा प्रयत्न असेल. 'बॅटरी-अॅज-अ-सर्व्हिस' (BaaS) या बॅटरी रेंटल प्लॅनमुळे कार खरेदीचा सुरुवातीचा खर्च आणखी कमी होऊ शकतो. विशेष म्हणजे, YMC च्या प्लॅटफॉर्मवर आधारित टोयोटा (Toyota) देखील भविष्यात आपली नवीन कार लाँच करू शकते, असे रिपोर्ट्स आहेत.
५०० किलोमीटरहून अधिक रेंज
मारुतीच्या या नवीन ७ सीटर इलेक्ट्रिक एमपीव्हीची अधिकृत तांत्रिक माहिती अद्याप समोर आलेली नाही. पण, ई-वितारामध्ये वापरलेले ४९ kWh आणि ६१ kWh चे बॅटरी पॅक YMC मध्येही दिले जाऊ शकतात. हे दोन्ही बॅटरी पर्याय फ्रंट-माउंटेड इलेक्ट्रिक मोटरसह फ्रंट-व्हील ड्राइव्ह सिस्टीममध्ये येऊ शकतात. ही कार सिंगल चार्जवर ५०० किलोमीटरहून अधिक धावेल, असा अंदाज वर्तवला जात आहे.
ई-वितारावरून घेतली प्रेरणा
मारुतीची ही नवीन ७ सीटर इलेक्ट्रिक एमपीव्ही सध्या टेस्टिंगच्या टप्प्यात आहे. टेस्टिंगदरम्यान ही कार अनेकदा कॅमेऱ्यात कैद झाली आहे. यातून कारच्या डिझाइनबद्दल काही महत्त्वाचे अपडेट्स समोर आले आहेत. या कारला उंच आणि बॉक्सी डिझाइन मिळेल. ई-वितारावरून प्रेरणा घेतलेला फ्रंट बंपर, एअर इनटेक आणि एरोडायनॅमिक डिझाइनचे अलॉय व्हील्स या कारमध्ये पाहायला मिळतील. तसेच, मागच्या विंडस्क्रीनच्या आजूबाजूला उभे टेल लॅम्प्स दिले आहेत, जे मारुती अर्टिगा (Ertiga) मधून घेतल्यासारखे वाटतात.
फीचर्सवरही विशेष लक्ष
फीचर्सच्या बाबतीतही ही नवीन इलेक्ट्रिक एमपीव्ही एकदम भारी असेल. यात १०.२५ इंचाचा डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले आणि १०.१ इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय, प्रीमियम साउंड सिस्टीम, ऑटो-डिमिंग IRVM, फ्रंट आणि रिअर पार्किंग सेन्सर्स, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम (TPMS), मल्टिपल एअरबॅग्ज आणि हिल होल्ड कंट्रोल यांसारखे भन्नाट फीचर्सही यात मिळू शकतात. फॅमिली ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी मारुतीची ही नवीन इलेक्ट्रिक ७ सीटर एमपीव्ही बाजारात धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज होत आहे.


