एका व्यक्तीचा इयरबड खडीमध्ये हरवला होता. त्याने खडीचे फोटो काढून चॅटजीपीटीवर अपलोड केले आणि अवघ्या काही मिनिटांत एआयने तो शोधून काढला. या घटनेची रेडिटवर जोरदार चर्चा सुरू आहे.

नवी दिल्ली : एका व्यक्तीचा इयरबड खडीमध्ये हरवला होता. तो शोधून तो वैतागला होता, पण शेवटी त्याला चॅटजीपीटीची (ChatGPT) अनपेक्षित मदत मिळाली. खडीमध्ये दहा मिनिटे शोधूनही इयरबड न सापडल्याने, त्याने जमिनीचे फोटो काढून या एआय चॅटबॉटवर अपलोड करायचे ठरवले.

चॅटजीपीटीने अवघ्या काही मिनिटांतच तो हरवलेला इयरबड फोटोमध्ये अचूक शोधून काढला. हे पाहून तो माणूस थक्क झाला. त्याने हा अनुभव रेडिटवर (Reddit) शेअर केला असून, आता एआयच्या इमेज रेकग्निशन क्षमतेवर जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

या युजरने 'r/ChatGPT' या सबरेडिटवर आपली कहाणी सांगितली. शुक्रवारी संध्याकाळी तो आपल्या मुलासोबत एका पार्कमध्ये गेला होता. तिथून परत निघताना, थांबायला सांगूनही त्याचा मुलगा पार्किंगच्या दिशेने पळत सुटला.

मुलाला पकडण्यासाठी तो त्याच्या मागे धावला. याच गडबडीत त्याच्या हुडीच्या पुढच्या खिशातून इयरबडची केस खाली पडली. केस जमिनीवर पडताच उघडली आणि डावा इयरबड थेट खडीमध्ये जाऊन पडला. पांढऱ्या रंगाचा तो छोटा इयरबड तशाच रंगाच्या खड्यांमध्ये मिसळून गेला होता. त्यातच सूर्य मावळत असल्याने अंधार पडू लागला होता, त्यामुळे तो शोधणे आणखीनच कठीण झाले होते.

रेडिट युजरने सांगितले की, त्याने जवळपास दहा मिनिटे त्या जागेवर इयरबड शोधला, पण त्याला तो सापडला नाही. तो निराश झाला होता. तेव्हाच त्याच्या डोक्यात एक भन्नाट आयडिया आली. स्वतः जमिनीवर शोधत बसण्यापेक्षा चॅटजीपीटीची मदत का घेऊ नये, असा विचार त्याने केला.

हा युजर रोजच्या कामांसाठी नेहमीच एआय चॅटबॉट वापरतो. त्याने खडी असलेल्या जमिनीचे काही फोटो काढले आणि ते अपलोड करून चॅटजीपीटीला इयरबड शोधायला सांगितले. चॅटजीपीटीने अधिक बारकाईने पाहण्यासाठी त्याला फोटो थोडे क्रॉप करून पाठवायला सांगितले. क्रॉप केलेले फोटो पाठवल्यानंतर एका मिनिटाच्या आतच चॅटबॉटने इयरबड शोधला आणि फोटोमध्ये त्याची अचूक जागा मार्क करून दिली.

हा निकाल पाहून तो माणूस आश्चर्यचकित झाला. या संपूर्ण प्रक्रियेला पाच मिनिटांपेक्षाही कमी वेळ लागल्याचे त्याने सांगितले. चॅटबॉटची मदत नसती, तर आपल्याला तो इयरबड कधीच सापडला नसता, असेही त्याने प्रामाणिकपणे कबूल केले.

त्याची ही पोस्ट इंटरनेटवर लगेच व्हायरल झाली. हरवलेल्या वस्तू शोधण्यासाठी आणि रोजच्या समस्या सोडवण्यासाठी एआय इमेज ॲनालिसिसचा कसा फायदा होऊ शकतो, यावर रेडिट युजर्स चर्चा करू लागले. एका युजरने जुनी पद्धत सुचवली. तो म्हणाला की, मोबाईलची फ्लॅशलाईट जमिनीच्या जवळ धरल्यास खडी आणि प्लास्टिकवरून परावर्तित होणारा प्रकाश वेगळा दिसतो, ज्यामुळे हरवलेली वस्तू शोधणे सोपे जाते.

दुसऱ्या एका युजरने सांगितले की, गेल्या काही वर्षांत इमेज रेकग्निशन तंत्रज्ञान खूप प्रगत झाले आहे. पण आता सर्वात मोठा फायदा हा आहे की, चॅटजीपीटी क्लाउडवर फोटो उघडून तो झूम करू शकते, वेगवेगळ्या भागांची स्वतंत्रपणे तपासणी करू शकते आणि बारकावे शोधण्यासाठी फिल्टर्सही लावू शकते.