LPG e-KYC : एलपीजी गॅस सिलेंडर वापरत असाल, तर महत्त्वाची गोष्ट करावी लागेल. १६ ऑगस्टपर्यंत तुम्हाला ई-केवायसी पूर्ण करावं लागेल. जर ई-केवायसी केलं नाही, तर सिलेंडर मिळण्यास अडचण येऊ शकते. सिलेंडरसाठी अधिकचे पैसे मोजावे लागू शकतात.
मुंबई : एलपीजी कनेक्शनबाबत महत्त्वाची बातमी आहे. आधार-आधारित ई-केवायसी (चेहरा प्रमाणीकरण/Face Authentication) करणं अनिवार्य आहे. ई-केवायसी पूर्ण करण्याची १६ ऑगस्ट २०२६ ही अंतिम मुदत आहे. जर तुम्ही अद्याप ही ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलं नसेल, तर यात उशीर करणं महागात पडू शकतं. ई-केवायसी पूर्ण न केल्यास घरगुती दराने गॅस सिलेंडर मिळवण्यात अडचणी येऊ शकतात.
जर एखाद्या ग्राहकाने ई-केवायसी पूर्ण केलं नसेल, तर जवळपास ९४० रुपयांना मिळणारा सिलेंडर तब्बल २,७०० रुपयांपेक्षाही अधिक महाग विकत घ्यावा लागू शकतो. १६ ऑगस्टपर्यंत ई-केवायसी केलं नाही, तर एलपीजी कंपन्यांच्या नियमानुसार, तुमच्या कनेक्शवर परिणाम होऊ शकतो. ई-केवायसी केलं नाही, तर सिलेंडर अधिक किमतीत घ्यावा लागेल.
ई-केवायसी महत्त्वाचं का आहे?
सरकार आणि गॅस कंपन्याकडून ई-केवायसी करण्यामागे, गॅसच्या काळ्या बाजाराला आळा घालण्याचा उद्देश आहे. घरगुती गॅस सिलिंडरचा वापर अनेकदा व्यावसायिक कारणांसाठी (उदा. हॉटेल्स किंवा दुकानांमध्ये) केला जातो. बायोमेट्रिक (फेस स्कॅन) ई-केवायसीमुळे (e-KYC) हे निश्चित होईल की, ज्या व्यक्तीच्या नावे गॅस कनेक्शन नोंदणीकृत आहे, त्याच व्यक्तीला गॅस सिलेडर दिला जाईल.
e-KYC करताना काय काळजी घ्याल?
- जर एखाद्या अनोळखी व्यक्तीने ई-केवायसीच्या (e-KYC) नावाखाली तुमचा ओटीपी (OTP), बँक पीन, एटीएम पीन, यूपीआय (UPI) पीन किंवा बँकिंग पासवर्ड मागितला, तर कोणत्याही परिस्थितीत ही माहिती त्यांना देऊ नका.
- आधार आणि एलपीजी संबंधित ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करताना केवळ ऑफिशिअल ॲप्स आणि वेबसाइट्सचाच वापर करा किंवा प्रत्यक्ष गॅस एजन्सीला भेट द्या.
- अनोळखी लिंक्सवर क्लिक करून ई-केवायसी पूर्ण करण्याचा प्रयत्न करू नका. जर तुम्हाला एसएमएसद्वारे एखादी लिंक मिळाली, तर त्यावर बेसावधपणे क्लिक करू नका.


