YouTube Monetization Rules : यूट्यूबने आपल्या मॉनेटायझेशन पॉलिसीमध्ये मोठे बदल केले आहेत. यामुळे आता कंटेंट क्रिएटर्सना पैसे कमावण्यासाठी पूर्वीपेक्षा जास्त मेहनत करावी लागणार आहे. आता कमाईसाठी किती व्ह्यूज आणि वॉच अवर्सची गरज असेल?

नवी दिल्ली : आजकाल अनेकजण यूट्यूबवर कंटेंट तयार करून चांगली कमाई करत आहेत. तर अनेकजण नवीन चॅनल सुरू करून पैसे कमावण्याच्या तयारीत आहेत. पण आता यूट्यूबने एक नवीन पॉलिसी आणून सगळ्यांनाच मोठा धक्का दिला आहे. यापुढे यूट्यूबवरून पैसे कमवण्यासाठी नियम अधिक कडक करण्यात आले आहेत. नवीन नियमांनुसार, यूट्यूब पार्टनर प्रोग्राम (YPP) अंतर्गत जाहिराती आणि यूट्यूब प्रीमियममधून कमाई करण्यासाठी लागणारे व्ह्यूज आणि वॉच अवर्स (व्हिडिओ पाहण्याचा वेळ) दोन्ही वाढवण्यात आले आहेत.

नवीन क्रिएटर्ससाठी मोठा अडथळा

नवीन कंटेंट क्रिएटर्सना आता यूट्यूबवरून पैसे कमवण्यासाठी सध्याच्या नियमांपेक्षा जवळपास दुप्पट व्ह्यूज आणि वॉच अवर्स मिळवावे लागतील. त्यामुळे आता यूट्यूबवरून कमाई करणं तितकं सोपं आणि कमी वेळेत शक्य होणार नाही.

  • ८००० वॉच अवर्स - एका वर्षात तब्बल ८००० वॉच अवर्स पूर्ण करावे लागतील. सध्या ही मर्यादा ४००० वॉच अवर्सची होती.
  • २० मिलियन शॉर्ट्स व्ह्यूज - ९० दिवसांत १० मिलियन (१ कोटी) शॉर्ट्स व्ह्यूजचा नियम आता २० मिलियन (२ कोटी) करण्यात आला आहे.
  • १००० सबस्क्राइबर्स - या मूळ नियमात कोणताही बदल केलेला नाही. चॅनलवर कमीत कमी १००० सबस्क्राइबर्स असण्याची अट कायम ठेवण्यात आली आहे. फक्त व्ह्यूज आणि वॉच अवर्समध्ये मोठी वाढ करण्यात आली आहे.

आधीपासून पैसे कमावणाऱ्या क्रिएटर्सनाही नियम लागू?

हे नवीन नियम फक्त नवीनच नाही, तर जुन्या क्रिएटर्सनाही लागू होतील. शॉर्ट्स व्हिडिओमधून जाहिरात आणि सबस्क्रिप्शनद्वारे कमाई करण्यासाठी, दर ९० दिवसांत कमीत कमी १० मिलियन (१ कोटी) शॉर्ट्स व्ह्यूज मिळवणं बंधनकारक असेल. ही मर्यादा पूर्ण न केल्यास, शॉर्ट्समधून होणारी कमाई थांबवली जाईल. मात्र, लॉंग व्हिडिओमधून पैसे मिळत राहतील. जेव्हा शॉर्ट्सचे व्ह्यूज पुन्हा १० मिलियनच्या पुढे जातील, तेव्हा कमाई आपोआप सुरू होईल.

याआधी २०१८ मध्ये यूट्यूबने आपल्या मॉनेटायझेशन पॉलिसीमध्ये मोठा बदल केला होता. त्यानंतर छोटे-मोठे बदल झाले, पण इतका मोठा बदल झाला नव्हता. सध्या ३० लाखांपेक्षा जास्त क्रिएटर्स यूट्यूब पार्टनर प्रोग्राममध्ये सक्रिय आहेत. यूट्यूबवर दररोज २००० कोटींपेक्षा जास्त शॉर्ट्स पाहिले जातात. या नवीन नियमातून यूट्यूबने ओरिजनल कंटेंटला अधिक महत्त्व देण्याचे संकेत दिले आहेत.

१० ऑगस्टला घोषणा, पुढच्या महिन्यापासून धावपळ

यूट्यूबने १० ऑगस्ट रोजी ही नवीन मॉनेटायझेशन पॉलिसी जाहीर केली आहे. त्यामुळे पुढच्या महिन्यापासून कंटेंट क्रिएटर्सना कमाईसाठी मोठी धावपळ करावी लागणार आहे. सध्या अनेकजण कंटेंट क्रिएशनकडे एक करिअर म्हणून पाहत आहेत आणि प्रत्येकजण यूट्यूबर बनू इच्छितो. याच पार्श्वभूमीवर यूट्यूबने आपले नियम अधिक कडक केले आहेत.