Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचा जुलै महिन्याचा हप्ता ९ ऑगस्ट रोजी बँक खात्यात जमा होणार आहे. मात्र, ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती नाही. ४२ लाख महिला या योजनेतून अपात्र ठरल्या आहेत.
मुंबई : लाडकी बहीण योजनेच्या महिलांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या जुलै महिन्याचा हप्ता आता रक्षाबंधनाच्या शुभ मुहूर्तावर, म्हणजेच ९ ऑगस्ट रोजी थेट बँक खात्यात जमा होणार आहे. बहिणींना रक्षाबंधनाची ही एक खास भेट ठरणार आहे. काही महिन्यांपासून या योजनेच्या हप्त्यांमध्ये थोडा उशीर होत आहे, आणि या महिन्यातही तोच प्रकार घडला. जुलैचे पैसे आता ऑगस्टमध्ये मिळत आहेत. पण या घोषणेनंतर एक नवा प्रश्न समोर आला आहे: ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार?
जुलैचा हप्ता ९ ऑगस्टला येत असला तरी, ऑगस्टच्या हप्त्याबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र, सामान्यतः या योजनेचे पैसे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जमा होतात. त्यामुळे, ऑगस्टचा हप्ता या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजेच २५ ते ३१ ऑगस्टच्या दरम्यान जमा होण्याची शक्यता आहे. यासंदर्भात लवकरच सरकारकडून अधिकृत घोषणा अपेक्षित आहे.
४२ लाख महिला अपात्र
या योजनेतील पात्रतेच्या निकषांची तपासणी करताना एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. तब्बल ४२ लाख महिलांना या योजनेतून वगळण्यात आले आहे. या महिलांनी योजनेच्या अटी पूर्ण केल्या नव्हत्या. अनेक महिलांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त होते, तर काही सरकारी कर्मचारी असल्याचे आढळून आले. तसेच, ज्या महिला इतर सरकारी योजनांचा लाभ घेत आहेत, त्यांनाही या योजनेतून वगळण्यात आले आहे. त्यामुळे, आता केवळ पात्र महिलांनाच या योजनेचा लाभ मिळत आहे.


