केरळ लॉटरीच्या इतिहासातील सर्वात मोठी, म्हणजेच ३० कोटी रुपयांची 'थिरुवोणम बंपर' लॉटरीची सोडत आज तिरुवनंतपुरममध्ये होणार आहे. छापलेली सर्व ९० लाख तिकीटे विकली गेली आहेत.

तिरुवनंतपुरम : वर्षभराच्या प्रतीक्षेनंतर अखेर आज 'थिरुवोणम बंपर BR 111' लॉटरीची सोडत निघणार आहे. दुपारी २ वाजता तिरुवनंतपुरमच्या गोर्की भवनमध्ये हा ड्रॉ होईल. पहिल्या विजेत्याला तब्बल ३० कोटी रुपये मिळतील. केरळ लॉटरीच्या इतिहासातली ही सर्वात मोठी बक्षीस रक्कम आहे. गेल्या वर्षी हे बक्षीस २५ कोटी रुपये होतं. आता सोडतीला काही तास उरले असताना, ३० कोटी जिंकणाऱ्या भाग्यवानाच्या हातात टॅक्स कापून नक्की किती पैसे पडतील ते पाहूया.

जर ३० कोटींची लॉटरी लागली, तर त्यातून १० टक्के रक्कम एजन्सी कमिशन म्हणून कापली जाते. ही रक्कम साधारण ३ कोटी रुपये होते. उरलेल्या २७ कोटी रुपयांवर टॅक्स लागतो. यात ३० टक्के टीडीएस (TDS) कापला जातो, जो ८.१० कोटी रुपये होतो. या टॅक्सवर पुन्हा २५ टक्के (२,०२,५०,००० रुपये) सरचार्ज लागतो. याशिवाय हेल्थ आणि एज्युकेशन सेस (उपकर) सुद्धा द्यावा लागतो. हे सगळं वजा जाता, ३० कोटी जिंकणाऱ्या विजेत्याला हातात साधारण १६.४७ कोटी रुपये मिळतील.

यंदा थिरुवोणम बंपरची तब्बल ९० लाख तिकीटे छापण्यात आली होती. लॉटरी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ही सगळी तिकीटे विकली गेली आहेत. सर्वात जास्त तिकीट विक्री पलक्कड जिल्ह्यात (२०,९५,३०० तिकीटे) झाली आहे. त्रिशूर जिल्हा (१०,६२,०००) दुसऱ्या, तर तिरुवनंतपुरम जिल्हा (८,६४,१००) तिसऱ्या क्रमांकावर आहे. सर्वात कमी विक्री कासारगोड जिल्ह्यात (२,७१,४००) झाली आहे.

ओणम बंपर लॉटरीच्या बक्षिसांचे स्वरूप खालीलप्रमाणे:

  • पहिले बक्षीस: ३० कोटी रुपये
  • दुसरे बक्षीस: १ कोटी रुपये (२० जणांना)
  • तिसरे बक्षीस: २५ लाख रुपये (२० जणांना)
  • चौथे बक्षीस: ५ लाख रुपये (१० जणांना)
  • पाचवे बक्षीस: २ लाख रुपये (१० जणांना)
  • सहावे बक्षीस: ५,००० रुपये (५४,००० जणांना)
  • सातवे बक्षीस: २,००० रुपये (८१,००० जणांना)
  • आठवे बक्षीस: १,००० रुपये (१,२४,२०० जणांना)
  • नववे बक्षीस: ५०० रुपये (२,७५,४०० जणांना)
  • सांत्वनपर बक्षीस: ५ लाख रुपये (९ जणांना)
  • एकूण बक्षीस रक्कम १२५.५४ कोटी रुपये आहे.