JBL Earbuds : पारदर्शक डिझाइनसह JBL चे नवे इयरबड्स लाँच; ४८ तास चालणार बॅटरी!
आकर्षक ट्रान्सलुसंट (Translucent) डिझाईन, ANC फीचर आणि 48 तासांच्या बॅटरी लाईफसह नवीन JBL Tune Buds 3 इयरबड्स लाँच झाले आहेत. याची किंमत आणि संपूर्ण डिटेल्स पाहूया.

जेबीएल ट्यून बड्स 3 लाँच
ऑडिओ उपकरणांमध्ये आघाडीवर असलेल्या जेबीएल (JBL) ने आपल्या लोकप्रिय 'ट्यून बड्स 3' (Tune Buds 3) वायरलेस इयरबड्सची नवीन आवृत्ती चीनमध्ये लाँच केली आहे. आतील पार्ट्स स्पष्ट दिसतील अशा 'ट्रान्सलुसंट' (Translucent) डिझाईन हे या नवीन मॉडेलचे मुख्य आकर्षण आहे.
किंमत आणि विक्री डिटेल्स
नवीन ट्रान्सलुसंट डिझाईन असलेल्या JBL Tune Buds 3 इयरबड्सची किंमत अंदाजे 10,100 रुपये निश्चित करण्यात आली आहे. याची विक्री 3 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. हे इयरबड्स डीप ब्लॅक (Deep Black), मून व्हाईट (Moon White) आणि जेड (Jade) अशा 3 रंगांमध्ये उपलब्ध आहेत. यामध्ये मून व्हाईट मॉडेलमध्ये चमकदार चार्जिंग केस कव्हर दिले आहे. जेड कलर इयरबड्स आणि केस या दोन्हीला आकर्षक हिरवा ट्रान्सलुसंट लूक देतो. चीनव्यतिरिक्त भारत आणि इतर आंतरराष्ट्रीय बाजारात हे कधी लाँच होणार याबाबत जेबीएलने अद्याप अधिकृत घोषणा केलेली नाही.

डिझाईन आणि फीचर्स
इयरबड्स आणि त्याची चार्जिंग केस या दोन्हींचे बाह्य कव्हर ट्रान्सलुसंट असल्याने, आतील हार्डवेअरचे (Hardware) पार्ट बाहेरूनच पाहता येतात. यूजर्सच्या सोयीसाठी हे इयरबड्स अत्यंत हलके बनवण्यात आले आहेत. प्रत्येक इयरबडचे वजन अवघे 5.9 ग्रॅम आणि चार्जिंग केसचे वजन 40 ग्रॅम आहे. याशिवाय, धूळ आणि पाण्यापासून संरक्षणासाठी याला IP54 रेटिंग देण्यात आले आहे.
उत्कृष्ट ऑडिओ आणि ANC तंत्रज्ञान
उत्तम म्युझिक अनुभवासाठी यामध्ये ड्युअल-लेअर कंपोझिट पॉलिमर डायफ्राम्स (Dual-layer composite polymer diaphragms) असलेले 10 मिमी डायनॅमिक ड्रायव्हर्स दिले आहेत. हे हार्मन (Harman) सोबत मिळून डिझाईन केल्यामुळे, यात म्युझिकमध्ये कोणताही अडथळा न येता स्पष्ट आवाज मिळेल, असा कंपनीचा दावा आहे. याशिवाय, 'Personi-Fi 3.0' फीचरच्या मदतीने यूजर्स त्यांच्या आवडीनुसार ऑडिओ कस्टमाईझ करू शकतात.
बाहेरचा आवाज कमी करण्यासाठी 'अॅक्टिव्ह नॉईज कॅन्सलेशन' (ANC) फीचरसाठी यात 4 मायक्रोफोन्स दिले आहेत. हे मायक्रोफोन्स कमी, मध्यम आणि जास्त फ्रिक्वेन्सी असलेला आवाज प्रभावीपणे कमी करतात. प्रत्येक मायक्रोफोनची सेन्सिटिव्हिटी 1kHz वर -38 dBV/Pa आहे. वेगात आणि विनाअडथळा कनेक्टिव्हिटीसाठी यात ब्लूटूथ 6.0 (Bluetooth 6.0) तंत्रज्ञान देण्यात आले आहे.
दमदार बॅटरी लाईफ
बॅटरी लाईफचा विचार केल्यास, हे इयरबड्स एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर 12 तासांपर्यंत वापरता येतात. ANC फीचर ऑन असल्यास 10 तासांपर्यंत बॅटरी टिकते. चार्जिंग केससह हे इयरबड्स एकूण 48 तासांचा प्लेबॅक टाईम देतात. इमर्जन्सीसाठी फक्त 10 मिनिटे चार्ज केल्यावर 4 तासांपर्यंत गाणी ऐकता येतात. हे पूर्ण चार्ज होण्यासाठी सुमारे 2 तास लागतात.
आकर्षक डिझाईन, आधुनिक ब्लूटूथ 6.0 तंत्रज्ञान आणि दमदार बॅटरी लाईफ यामुळे म्युझिक प्रेमींमध्ये JBL Tune Buds 3 ची मोठी उत्सुकता पाहायला मिळत आहे.

