जिओ ग्राहकांनी दीर्घकाळ सिम रिचार्ज न केल्यास त्यांचा नंबर कायमचा बंद होऊ शकतो. सिम सुरू ठेवण्यासाठी कंपनी फक्त ११ रुपयांचा एक खास रिचार्ज प्लॅन ऑफर करत आहे. या प्लॅनमध्ये १ तासाच्या व्हॅलिडिटीसह १० जीबी डेटा मिळतो, जो नंबर ॲक्टिव्ह ठेवायला मदत करतो.

आजकाल अनेकांकडे दोन सिम असतात. त्याची कारणं वेगवेगळी असू शकतात. पण आता रिचार्जचा खर्च खूप वाढला आहे. त्यामुळे लोक फक्त महत्त्वाच्याच नंबरवर रिचार्ज करतात आणि दुसरा तसाच पडून राहतो. अशा ग्राहकांना आता जिओने मोठा इशारा दिला आहे. आता जर तुम्ही रिचार्ज केलं नाही, तर तुमचा नंबर कायमचा बंद होऊ शकतो. होय, जे ग्राहक दीर्घकाळ सिम रिचार्ज करत नाहीत, त्यांना कंपनीकडून वॉर्निंग मेसेज पाठवले जात आहेत. मेसेजमध्ये सांगितलं जातंय की, तुम्ही तुमच्या नंबरवर रिचार्ज करायला हवं. नाहीतर इनकमिंग कॉल आणि एसएमएस सेवा बंद केली जाईल. जास्त काळ रिचार्ज न केल्यास तुमचा मोबाईल नंबर कायमचा बंद होऊ शकतो.

मग तुम्ही काय करायला हवं?

जर तुम्हाला दोन्ही सिमची गरज असेल, तर दोन्ही रिचार्ज करणं महत्त्वाचं आहे. एका सिममध्ये तुम्ही तुमचा नेहमीचा प्लॅन टाकू शकता. तर दुसरा नंबर सुरू ठेवण्यासाठी ग्राहकांसाठी कंपनीने एक खास रिचार्ज ऑफर आणली आहे. ती म्हणजे फक्त ११ रुपयांचा रिचार्ज प्लॅन!

जिओच्या या कडक निर्णयामागचं कारण काय?

टेलिकॉम कंपन्यांना आता कडक नियमांचं पालन करावं लागतं.

त्याचप्रमाणे जिओही या गाईडलाईन्स फॉलो करतं.

रिचार्जची मुदत संपल्यावर ठराविक काळापर्यंतच सेवा सुरू राहते.

मेसेज आणि कॉल्स फक्त काही दिवसांसाठीच येतात.

काही आठवडे रिचार्ज न केल्यास तुम्हाला कोणतीही सेवा मिळणार नाही.

सिम बंद होण्याआधीच कंपनी मेसेज करून रिचार्ज करण्याची आठवण करून देते. वॉर्निंग दिल्यावरही जर तुम्ही सिम रिचार्ज केलं नाही, तर ट्राय (TRAI) च्या नियमांनुसार ९० दिवसांनंतर तो नंबर बंद केला जाऊ शकतो. किंवा तोच नंबर दुसऱ्या कोणालातरी दिला जाऊ शकतो.

काय अडचणी येऊ शकतात?

मोबाईल नंबर बहुतांश वेळा बँक अकाऊंट, आधार कार्ड आणि सोशल मीडियाला लिंक केलेले असतात. जर नंबर बंद झाला, तर मोठी अडचण होण्याची शक्यता असते. म्हणूनच जिओने सल्ला दिलाय की फक्त ११ रुपयांचा रिचार्ज करून नंबर सुरू ठेवा. हा जिओच्या सर्वात स्वस्त प्रीपेड प्लॅन्सपैकी एक आहे. ११ रुपयांनी तुमचा नंबर रिचार्ज करताच, तुम्हाला एक मेसेज मिळेल की तुमचं सिम कार्ड सिस्टीममध्ये ॲक्टिव्ह आहे.

११ रुपयांचा रिचार्ज केल्यावर तुम्हाला १ तासाच्या व्हॅलिडिटीसह १० जीबी हाय-स्पीड डेटा मिळेल. डेटाची मुदत फक्त १ तासाची असली तरी, तुमचा नंबर ॲक्टिव्ह ठेवण्यासाठी हा एक उत्तम मार्ग आहे. ज्यांना कमी खर्चात आपला जुना नंबर सुरक्षित ठेवायचा आहे, त्यांच्यासाठी हा पर्याय एकदम योग्य आहे.