भारतीय रेल्वेच्या वेबसाईटवर PNR स्टेटस चेक करणं एका प्रवाशाला चांगलंच महागात पडलं. त्याला कॅप्चा म्हणून चक्क गणिताचा एक अवघड प्रश्न सोडवायला आला.
मुंबई : भारतीय रेल्वेच्या वेबसाईटवर PNR स्टेटस किंवा तिकीट चेक करणं एका प्रवाशाला चांगलंच अवघड पडलं. त्याच्यासमोर अचानक गणिताचा एक अवघड प्रश्न आला आणि यावर आता सोशल मीडियावर भन्नाट प्रतिक्रिया येत आहेत.
IRCTC वेबसाईट वापरणाऱ्या प्रवाशांना कॅप्चा (captcha) माहितीच असेल. PNR माहिती पाहण्यापूर्वी बेरीज किंवा वजाबाकीचं साधं गणित सोडवावं लागतं. पण एका युजरच्या वाट्याला इतकं अवघड गणित आलं की तो चक्रावूनच गेला.
या कॅप्चामध्ये चक्क (9876 × 543 − 2468) ÷ 4 = ? असं गणित विचारण्यात आलं होतं.
हा प्रवासी फक्त त्याचं PNR स्टेटस चेक करत होता, तेव्हाच हा अवघड प्रश्न स्क्रीनवर आला. IRCTC वर कॅप्चा रिफ्रेश करून दुसरा प्रश्न घेण्याचा पर्याय असतो, पण हे गणित पाहून तो चांगलाच गोंधळला.
या कॅप्चाचा स्क्रीनशॉट शेअर करत त्याने गमतीत तक्रार केली. "मी फक्त PNR स्टेटस चेक करत होतो, मला माफ करा," असं त्याने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं.
त्यानंतर त्याने आणखी एक ट्विट करत IRCTC ची खिल्ली उडवली. "IRCTC कॅप्चाचे गणिताचे प्रश्न आता खूप कठीण यायला लागले आहेत," असं त्याने लिहिलं.
यावर सोशल मीडिया युजर्सनीही मजेशीर कमेंट्स केल्या. रेल्वेची माहिती देण्याआधी भारतीय रेल्वे आता प्रवाशांची गणिताची परीक्षा घेत आहे, अशी मस्करी अनेकांनी केली.
काहींनी तर असंही म्हटलं की, आता तिकीट बुक करताना किंवा PNR चेक करताना प्रवाशांना कॅल्क्युलेटर घेऊनच बसावं लागेल.
एका युजरने कमेंट केली, “कदाचित IRCTC तुम्हाला JEE Advanced साठी तयार करू पाहत आहे.”


