पुढच्या महिन्यात लाँच होणाऱ्या आयफोन 18 प्रो सीरिजच्या किंमतीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. रॅममुळे (RAM) भारतात या फोनची किंमत तब्बल १,५०,००० रुपयांपर्यंत पोहोचू शकते, जी M5 मॅकबुक एअर इतकी आहे. वाढीव किंमतीत मिळणारे अपग्रेड्स तेवढे फायदेशीर ठरतील का, हा प्रश्न निर्माण झाला आहे.

मुंंबई : पुढच्या महिन्यात अॅपलची नवी आयफोन 18 प्रो सीरिज बाजारात दाखल होण्याची शक्यता आहे. सध्याच्या चर्चेनुसार, यात एक मोठा बदल दिसू शकतो. सूत्रांच्या माहितीनुसार, भारतात आयफोन 18 प्रो मॉडेलसाठी तब्बल १,५०,००० रुपये मोजावे लागू शकतात. भारत आणि इतर देशांमध्ये आयफोन 18 प्रो सीरिजच्या किंमतीत वाढ होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

ही दरवाढ लक्षणीय असेल, कारण आयफोन 17 प्रो मॉडेल १,३४,९०० रुपयांना लाँच झालं होतं. आतापर्यंत फक्त मोठ्या 17 प्रो मॅक्स मॉडेलची किंमत या घरात असायची. खरं तर, या नव्या किंमतीत आयफोन 18 प्रो देशात M5 मॅकबुक एअरच्या 13-इंच मॉडेलइतकाच महागडा ठरेल.

या दरवाढीमागे एक कारण सांगितलं जातंय, ते म्हणजे रॅमची (RAM) कमतरता. यामुळे फोन बनवण्यासाठी लागणारे इतर सुटे भागही महाग झाले आहेत. एकीकडे वनप्लससारख्या कंपन्यांनी त्यांच्या वनप्लस 15 फ्लॅगशिप मॉडेलसाठी ८५,००० रुपयांपेक्षा जास्त किंमत आकारली आहे, तर दुसरीकडे अॅपलने M5 मॅकबुक एअर 13-इंच मॉडेलसाठी अतिरिक्त ३०,००० रुपये आकारायला सुरुवात केली आहे.

काही जणांच्या मते, आयफोन 17, 17 प्रो आणि 17 प्रो मॅक्सच्या किंमती सध्या तरी स्थिर राहतील. पण हा दिलासा फार काळ टिकणार नाही, असं दिसतंय. कारण पुढच्या महिन्यात आयफोन 18 प्रो लाँच झाल्यावर अॅपल आयफोन 17 सीरिजच्या किंमतीही वाढवू शकतात.

सध्या अॅपल लोकांना आयफोन 17 मॉडेल्सवर आकर्षक डिस्काउंट आणि एक्सचेंज ऑफर्स देत आहे. किंमतवाढ होण्याआधीच लोकांनी फोन अपग्रेड करावा, हा त्यामागचा हेतू दिसतोय.

तुम्ही आयफोन 18 प्रो ची वाट पाहावी का?

आयफोन 18 प्रो सीरिजमध्ये अॅपल नक्की काय नवीन देणार, हे सांगणं सध्या तरी घाईचं ठरेल. पण डिझाइनच्या बाबतीत हा फोन सध्याच्या टॉप आयफोनपेक्षा खूप वेगळा नसेल, असा अंदाज आहे. वाढीव किंमत योग्य ठरवण्यासाठी कंपनीला फीचर्समध्ये मोठे बदल करावे लागतील. विशेषतः कॅमेऱ्यांमध्ये काहीतरी जबरदस्त सुधारणा अपेक्षित आहेत. जर फोन घ्यायचा असेल, तर ग्राहकांनी लवकरच होणाऱ्या आयफोन लाँचवेळी कंपनीकडून येणाऱ्या अधिकृत माहितीची वाट पाहावी.